मोठ्या अपघातानंतरही जाग नाही, हैद्राबादला जाणाऱ्या फ्लाइट्स प्रचंड लेट, प्रवाशांचा संताप अनावर

या पार्श्वभूमीवर विमान कंपन्यांनी खबरदारी म्हणून अनेक उड्डाणे रद्द केली आहेत. तसेच काही विमानांच्या मार्गात बदल केला आहे. मात्र याचा परिणाम प्रवाशांवर झाला आहे. सध्या अनेक विमानतळांवर प्रवाशी ताटकळत बसले आहेत.

मोठ्या अपघातानंतरही जाग नाही, हैद्राबादला जाणाऱ्या फ्लाइट्स प्रचंड लेट, प्रवाशांचा संताप अनावर
airport
| Updated on: Nov 25, 2025 | 10:02 AM

इथिओपियातील हेले गुब्बी ज्वालामुखीचा मोठा उद्रेक झाला आहे. या ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे निर्माण झालेल्या राखेच्या मोठ्या ढगांमुळे देशातील विमान वाहतुकीवर याचा मोठा परिणाम झाला आहे. या ज्वालामुखीची राख मध्य पूर्व आणि मध्य आशिया ओलांडून आता भारताच्या पश्चिम भागाकडे सरकत आहेत. या पार्श्वभूमीवर भारताच्या पश्चिम भागातील विमान वाहतुकीवर परिणाम झाला आहे. अनेक विमान कंपन्यांनी खबरदारी म्हणून अनेक उड्डाणे रद्द केली आहेत. तसेच काही विमानांच्या मार्गात बदल केला आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून देशांतर्गत विमानसेवा वारंवार विस्कळीत होत असल्याने प्रवासी संतप्त झाले आहेत.

उड्डाणे रद्द झाल्याने प्रवाशांची गैरसोय

हैद्राबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर सध्या अनेक विमानांचे उड्डाण उशिराने होत आहेत. तसेच काही विमानांची उड्डाणे रद्द केली जात आहे. त्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत. काही दिवसांपूर्वी गुजरातमध्ये एअर इंडियाच्या विमानाचा अपघात झाला होता. या अपघातानंतर विमान प्राधिकरणावर अनेक सवाल उपस्थित करण्यात आले होते. इतका मोठा अपघात होऊन काही महिने उलटले नसताना अजूनही विमान प्राधिकरणाला जाग आली नाही का, असा संतप्त सवाल प्रवाशांकडून केला जात आहे.

हैद्राबाद विमानतळावर गेल्या काही दिवसांपासून विमानसेवेत मोठ्या प्रमाणात अडथळे येत आहेत. व्हिएतनाम एअरलाइन्सचे VN 984 हे हनोईसाठी जाणारे विमान रद्द करण्यात आले आहे. यामुळे या विमानातून प्रवास करणाऱ्या 194 प्रवाशांना प्रचंड गैरसोयीचा सामना करावा लागला. त्यांना रात्रभर विमानतळावर थांबावे लागले. विशेष म्हणजे हैद्राबाद विमानतळावर दर दोन तासांनी घोषणा बदलत होत्या. पण याबद्दल कोणतीही स्पष्ट माहिती दिली जात नव्हती. ज्यामुळे प्रवाशांमध्ये मोठा गोंधळ पाहायला मिळाला.

ताांत्रिक अडचणीमुळे फ्लाईट लेट

काही प्रवाशांनी तिकीट, व्हिसा आणि इतर गोष्टींसाठी लाखो रुपये खर्च केले होते. यापूर्वी हैद्राबाद विमानतळावर एअर इंडियाच्या एका विमानाचे टेकऑफ रद्द करण्यात आले होते. मोठा तांत्रिक बिघाड झाल्याने ही घटना घडली होती. या विमानाचे टेकऑफ रद्द झाल्याने मोठा अपघात टळला होता. फक्त ताांत्रिक अडचणीमुळे फ्लाईट लेट असल्याचं सांगितलं जात आहे. पण नेमकं काय झालं आणि फ्लाईट पुन्हा पूर्ववत कधी होणार याची कोणतीही अधिकृत सूचना प्रशासनाकडून दिली जात नाहीये. त्यामुळे प्रवाशांचा संताप वाढला आहे.

कोणकोणती विमाने उशिराने?

विमान क्रमांक मार्ग विलंबाचा कालावधी
6E-608 हैदराबाद-लखनऊ 1 तास 1 मिनिट
6E-453 हैदराबाद-लखनऊ 1 तास 23 मिनिटे
6E-7482 जयपूर-लखनऊ 1 तास 24 मिनिटे
6E-7422 इंदूर-लखनऊ 1 तास 8 मिनिटे
IX-1618 पुणे-लखनऊ 39 मिनिटे
6E-451 बेंगळूरू-लखनऊ 31 मिनिटे
6E-6811 गोवा-लखनऊ 1 तास 10 मिनिटे
6E-6751 चंदीगड-लखनऊ 44 मिनिटे
6E-196 बेंगळूरू-लखनऊ 44 मिनिटे
6E-935 अहमदाबाद-लखनऊ 44 मिनिटे
6E-6614 दिल्ली-लखनऊ 26 मिनिटे
6E-758 लखनऊ-दिल्ली 1 तास 45 मिनिटे
6E-7221 लखनऊ-इंदूर 1 तास 30 मिनिटे
6E-399 लखनऊ-गोवा 1 तास 42 मिनिटे
6E-6222 लखनऊ-मुंबई 1 तास 3 मिनिटे
6E-7027 लखनऊ-जयपूर 1 तास 15 मिनिटे
XC-6489 लखनऊ-दिल्ली 40 मिनिटे
6E-325 लखनऊ-बेंगळूरू 1 तास 17 मिनिटे
WY-266 लखनऊ-मस्कत 1 तास 34 मिनिटे

विमान वाहतुकीवर परिणाम होण्यामागे कारण काय?

इथिओपियातील हेले गुब्बी ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे सध्या आकाशात मोठ्या प्रमाणावर राख पसरली आहे. ही राख मध्य पूर्व आणि मध्य आशिया ओलांडून भारताच्या पश्चिम भागाकडे सरकत आहे. या धोक्यामुळे अनेक विमान कंपन्यांनी खबरदारीचा उपाय म्हणून काही आंतरराष्ट्रीय उड्डाणे रद्द केली आहेत. तसेच त्यांच्या मार्गात बदल केला आहे. डीजीसीएने विमान कंपन्यांना राखेचा धोका असलेल्या क्षेत्रांमध्ये आणि उंचीवर उड्डाणे टाळण्याचे निर्देश दिले आहेत. यामुळे अनेक विमानतळांवर प्रवासी ताटकळत थांबले आहेत. यामुळे अनेक प्रवाशांच्या पुढील प्रवासाचे नियोजन पूर्णपणे कोलमडले आहे.