भाजपला मोठा धक्का; विद्यमान आमदार काळाच्या पडद्याआड, प्रकृती बिघडल्यानंतर रुग्णालयात होते दाखल
Chhote Lal Verma News: आग्रा जिल्ह्यातील फतेहाबादचे विद्यमान भारतीय जनता पक्षाचे आमदार छोटे लाल वर्मा यांचे निधन झाले आहे. त्यांना गेल्या दोन दिवसांपासून ताप येत होता.

उत्तर प्रदेशातील आग्रा येथील फतेहाबाद विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पक्षाचे आमदार छोटेलाल वर्मा यांचे निधन झाले आहे. आज संध्याकाळी उशिरा नोएडा येथील यथार्थ रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वर्मा गेल्या दोन दिवसांपासून आजारी होते आणि त्यांना खूप ताप होता. प्रकृती खालावल्यानंतर गुरुवारी दुपारी त्यांना नोएडाला आणण्यात आले होते. रुग्णालयात उपचार करूनही त्यांना वाचवता आले नाही. छोटेलाल वर्मा यांच्या निधनाने भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये शोककळा पसरली आहे. परिसरातील लोकही त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत आहेत.
आमदार छोटेलाल वर्मा यांच्या निधनावर प्रतिक्रिया देताना आग्राचे खासदार राजकुमार चहर म्हणाले की, त्यांना गेल्या दोन दिवसांपासून ताप येत होता. प्रकृती खालावल्यानंतर त्यांना राजपूर चुंगी येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृतीत सुधारणा न झाल्याने आणि ती अधिकच खालावल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना दिल्लीला नेले. वाटेत त्यांची प्रकृती अधिकच खालावली. त्यानंतर त्यांना नोएडा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले.
अति ताप आल्यानंतर छोटेलाल वर्मा यांना आग्रा येथील उपाध्याय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयाच्या म्हणण्यानुसार, आमदारांना खूप ताप होता. प्रकृती नियंत्रणात न आल्याने गुरुवारी त्यांना दिल्लीतील गंगा राम रुग्णालयात हलवण्यात आले. कुटुंबीय आमदारांना रुग्णवाहिकेने दिल्लीला घेऊन जात होते. वाटेत त्यांची प्रकृती अधिकच खालावली. आमदारांची प्रकृती खालावत असल्याचे पाहून कुटुंबीयांनी त्यांना नोएडा येथील यथार्थ रुग्णालयात दाखल केले. पण, त्यांचा जीव वाचवता आला नाही.
आमदारांचे पुत्र महेंद्र वर्मा यांच्या म्हणण्यानुसार, नोएडा रुग्णालयात आमदारांना सीपीआर देण्यात आला, असे करूनही डॉक्टरांना यश आले नाही. छोटेलाल वर्मा यांचा जन्म ७ जुलै १९५३ रोजी आग्रा येथील नागला देवहंस गावात झाला. त्यांनी सहावीपर्यंत जनता इंटरमीडिएट कॉलेजमध्ये शिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी शिक्षण अर्धवट सोडले. नंतर ते राजकीय कार्यात सहभागी होऊ लागले. त्यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात १९९३ च्या विधानसभा निवडणुकीत झाली. भाजपने त्यांना फतेहाबाद विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आणि ते जिंकले. नंतर त्यांनी भाजप सोडून बसपामध्ये प्रवेश केला.
