इंदिरा गांधींच्या सरकारमध्ये मंत्री राहिलेले माजी काँग्रेस नेता संघाच्या व्यासपीठावर, मोहन भागवत यांच्यासोबत दिसणार
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा नागपुरात कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमात काँग्रेसचे वरिष्ठ नेता राहिलेले अरविंद नेताम यांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलवले आहे. संघाच्या कार्यक्रमात सहभागी होणारे ते दुसरे माजी काँग्रेसी असणार आहे.

काँग्रेसचे माजी नेते आणि इंदिरा गांधी यांच्या सरकारमध्ये मंत्री राहिलेले अरविंद नेताम राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या व्यासपीठावर दिसणार आहेत. ५ जून रोजी संघाच्या होणाऱ्या कार्यक्रमात ते सहभागी होतील. या कार्यक्रमात संघप्रमुख मोहन भागवत यांच्यासोबत ते व्यासपीठावर दिसणार आहेत. काँग्रेसचे वरिष्ठ नेता राहिलेले अरविंद नेताम यांना संघाने प्रमुख पाहुणे म्हणून बोलवले आहे.
काँग्रेसचे हे नेतेही आले होते संघाच्या व्यासपीठावर
काँग्रेस नेता राहिलेले अरविंद नेताम संघाच्या व्यासपीठावर येणार असल्यामुळे चर्चेचा विषय बनले आहे. यापूर्वी जून २०१८ मध्ये काँग्रेसचे मंत्री राहिलेले दिग्गज नेता आणि माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी संघाच्या व्यासपीठावर आले होते. त्यांना संघाच्या तिसऱ्या संघ शिक्षा वर्गात प्रमुख अतिथी म्हणून बोलवले होते. आता अरविंद नेताम संघाच्या व्यासपीठावर येत आहे. ते छत्तीसगडमध्ये आणि देशातही काँग्रेसचे मोठे नेते म्हणून ओळखले जात होते.
नवीन पक्षाची केली होती स्थापना
९ ऑगस्ट २०२३ रोजी त्यांनी पक्ष सोडला. त्यानंतर त्यांनी आदिवासी समाजासाठी ‘हमर राज पार्टी’ ची स्थापना केली होती. अरविंद नेताम संघाच्या ज्या कार्यक्रमात सहभागी होत आहे, तो ५ जून रोजी संघ मुख्यालयात होणार आहे. या कार्यक्रमात सरसंघचालक डॉ.मोहन भागवतसुद्धा सहभागी होणार आहेत. हा कार्यक्रम द्वितीय वर्ष प्रशिक्षण शिबीर समारोपाचा आहे.
सन २०२३ मध्ये काँग्रेस सोडताना व्यासपीठावरुनच अरविंद नेताम घोषणा केली होते. ते म्हणाले होते, मी शेवटच्या क्षणापर्यंत समाजाची लढाई लढणार आहे. माझी पूर्ण शक्ती आणि वेळ समाजासाठी आहे. मी कोणत्याही पक्षात जाणार नाही. तसेच कोणासोबत युती करणार नाही. मी इंदिरा गांधी यांनाही म्हटले होते, आधी मी आदिवासी आहे, नंतर काँग्रेसी, असे नेताम यांनी म्हटले होते. काँग्रेसने आदिवासींची उपेक्षा केली, असा आरोप त्यांनी पक्ष सोडताना केला होता. काँग्रेस नेते राहिलेले अरविंद नेताम चार वेळा खासदार राहिले आहेत. तसेच इंदिरा गांधी, पी.व्ही.नरसिंहराव यांच्या सरकारमध्ये मंत्री राहिले होते.
