
लोकसभा निवडणुकीचा मतदानाचा पहिला टप्पा पार पडला. या टप्प्यात देशभरात जवळपास ६०टक्के मतदान झाले. आता दुसऱ्या टप्यासाठी २६ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. राजकीय पक्षांकडून उमेदवारांचा प्रचार सुरु आहे. तसेच तिसऱ्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल केले गेले आहे. त्यात गुजरातमधून केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप नेते अमित शाह यांनी आपला उमदेवारी अर्ज दाखल केला आहे. ते गांधीनगर लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवणार आहेत. या ठिकाणी सात मे रोजी मतदान होणार आहे. त्यांनी उमदेवारी अर्जासोबत शपथपत्र दिले आहे. त्यात संपत्ती, दाखल गुन्हे याची माहिती दिली. त्यानुसार त्यांच्याकडे स्वत:ची कारसुद्ध नाही, कॅश केवळ 24 हजार रुपये आहे.
केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप नेते अमित शाह यांनी शुक्रवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर त्याचे प्रतिज्ञापत्र चर्चेत आले आहे. अमित शहा यांनी त्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे की, त्यांच्याकडे स्वतःची गाडी नाही. व्यवसाय म्हणून ते शेती करतात आणि सामाजिक कार्यकर्तेही आहेत. त्यांच्या उत्पन्नाच्या स्त्रोतांमध्ये खासदारांचा पगार, घर-जमीन भाड्याचे उत्पन्न, शेतीचे उत्पन्न आणि शेअर लाभांश आहे. त्यांच्यावर 3 गुन्हे दाखल असल्याचीही नोंद आहे.
अमित शाह यांच्यापूर्वी गुजरातमधील गांधीनगर लोकसभा मतदार संघातून भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी निवडणूक लढवली होती. लालकृष्ण अडवाणी या जागेवरून सहा वेळा विजयी झाले होते. अमित शाह यांनी 1991 मध्ये त्यांनी पहिल्यांदा या ठिकाणी निवडणूक लढवली आणि विजयी झाले. गेल्या पाचवेळा ते लोकसभेची ही जागा जिंकत होते. 2019 मध्ये, अमित शाह यांनी ही जागा 5 लाखांहून अधिक मतांच्या फरकाने जिंकून अडवाणींचा विक्रम मोडला होता.