मुंबई : फक्त 150 पानांच्या एका रिपोर्टनं अदानी साम्राज्याच्या घोडदौडीला ब्रेक लावला. त्यामुळे फक्त काही तासांत गौतम अदानी (Gautam Adani) जगातल्या सर्वात श्रीमंतांच्या यादीतून दुसऱ्या स्थानावरुन सात व्या स्थानी घसरले. उपलब्ध माहितीनुसार, हिंडेनबर्गच्या रिपोर्टमुळे गेल्या शुक्रवारच्या 6 तासांतच अदानी समूहाचं मार्केट कॅप म्हणजे बाजार भांडवलात ४.२ लाख कोटींचं नुकसान झालं. आणि खुद्द अदानींच्या संपत्तीत १ लाख ६६ हजार कोटींचा घाटा झाला. घाटा नेमका किती झालाय याची तुलना जर पाकिस्तानच्या परकीय मुद्रेशी करायची झाली तर या पैशांतून अख्खा पाकिस्तान तब्बल ८ महिने दोन वेळचं जेऊ शकतो. हे सारं घडलं ते हिंडेनबर्ग या अमेरिकन कंपनीच्या एका रिपोर्टमुळे. ही कंपनी बड्या कंपन्यांची वाढ आणि व्यवहारांवर देखरेखीचं काम करते. नेमकी ही कंपनी काय आहे? तिनं हा रिपोर्ट आत्ताच का जारी केला? आणि ही कंपनी नेमकं काय काम करते? हे जाणून घेणंही महत्वाचं आहे.