भाजपला पुन्हा धक्का, गोव्याच्या सत्तेतील भागीदार पक्ष NDA मधून बाहेर

| Updated on: Apr 13, 2021 | 1:19 PM

गोव्यात मार्च 2017 मध्ये भारतीय जनता पक्षाला सत्तेत परत येण्यामध्ये गोवा फॉरवर्ड पार्टीने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. (Goa Forward Party out of NDA)

भाजपला पुन्हा धक्का, गोव्याच्या सत्तेतील भागीदार पक्ष NDA मधून बाहेर
अमित शाह, नरेंद्र मोदी
Follow us on

पणजी : भारतीय जनता पक्ष प्रणित एनडीएला गोव्यातून मोठा धक्का बसला आहे. गोवा फॉरवर्ड पक्षाने (Goa Forward Party) राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षाचे अध्यक्ष विजय सरदेसाई (Vijay Sardesai) यांच्या नेतृत्वात गोवा फॉरवर्डची राज्य कार्यकारिणी बैठक झाली. यामध्ये एनडीएबाहेर पडण्याचा ठराव एकमताने संमत झाला. (Goa Forward Party decides to move out of NDA in meeting led by Vijay Sardesai)

गोवा फॉरवर्ड पार्टी (जीएफपी) हा गोवा राज्यातील स्थानिक राजकीय पक्ष आहे. त्याचे नेतृत्व विजयी सरदेसाई करत आहेत. 25 जानेवारी 2016 रोजी सरदेसाईंनी गोवा फॉरवर्ड पार्टीची स्थापना केली होती. 2017 च्या गोवा विधानसभा निवडणुकीत जीएफपीने चार उमेदवार उभे केले होते. विशेष म्हणजे यापैकी तीन जागांवर पक्षाला विजय मिळाला.

गोव्यात मार्च 2017 मध्ये भारतीय जनता पक्षाला सत्तेत परत येण्यामध्ये गोवा फॉरवर्ड पार्टीने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. खरं तर पक्षाची स्थापना करताना झालेल्या पत्रकार परिषदेत गोवा फॉरवर्ड पार्टीचे तत्कालीन अध्यक्ष प्रभाकर टिंबळे यांनी भाजप वगळता कोणत्याही पक्षाशी आघाडी करण्याची भूमिका जाहीर केली होती.

भाजपविरोधी भूमिकेतून पक्षाची स्थापना

2017 च्या विधानसभा निवडणुकांमध्ये पक्षाचे कॅम्पेनही भाजपविरोधी होते. भाजपला सत्तेबाहेर खेचण्यासाठीच गोवा फॉरवर्ड पार्टीने रणशिंग फुंकले होते. काँग्रेस-भाजपमधील अनेक नेत्यांनी गोवा फॉरवर्ड पार्टीत पक्षप्रवेशही केला होता. 2017 मध्ये तत्कालीन अपक्ष आमदार विजय सरदेसाई यांनीही पक्षाचा झेंडा हाती धरला. त्यानंतर गोवा फॉरवर्ड पार्टीच्या तिकीटावर निवडणूक लढवून विजय मिळवला.  (Goa Forward Party decides to move out of NDA in meeting led by Vijay Sardesai)

भाजपच्या यशात वाटा

2017 च्या विधानसभा निवडणुकीत गोव्यात त्रिशंकू अवस्था निर्माण झाली होती. 40 पैकी 21 हा बहुमताचा आकडा गाठण्यात कुठल्याही पक्षाला यश आलं नाही. अखेर 17 जागांसह मोठा पक्ष असलेला काँग्रेस सत्तास्थापनेचा दावा करण्याच्या तयारीत होती. त्याआधीच 13 जागांसह भाजपने गोवा फॉरवर्ड पार्टी, महाराष्ट्रवादी गोमांतक पार्टी (मगो) आणि अपक्षांच्या साथीने सत्ता स्थापन केली. त्यानंतर गोवा फॉरवर्ड पार्टीचे तत्कालीन अध्यक्ष प्रभाकर टिंबळे यांनी पदाचाही राजीनामा दिला.

शिवसेना-अकाली दलही एनडीएबाहेर

याआधी, मोदी सरकारने आणलेल्या कृषी विधेयकाचा विरोध म्हणून शिरोमणी अकाली दलाने सप्टेंबर महिन्यात थेट राष्ट्रीय लोकशाही आघाडीतूनच बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. दुसरीकडे, शिवसेना भाजप 28 वर्ष एनडीएत एकत्र नांदत होती. मात्र 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्रीपदावरुन शिवसेना-भाजपमध्ये दरी निर्माण झाली. याचं रुपांतर युती तुटण्यात झालं. अखेर महाविकास आघाडी सरकार स्थापन होण्याअगोदर केंद्रीय मंत्री अरविंद सावंत यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर सेनेने आपण एनडीमधून बाहेर पडत असल्याचं जाहीर केलं

संबंधित बातम्या :

‘एनडीए’बाहेर पडलेल्या दोन पक्षांची भेट, अकाली दलाचे नेते उद्धव ठाकरेंच्या भेटीला

(Goa Forward Party decides to move out of NDA in meeting led by Vijay Sardesai)