
नवी दिल्लीतील ग्रेटर नोएडातील रबुपुरा येथे राहणाऱ्या पाकिस्तानी नागरिक सीमा हैदरच्या घरात एका अज्ञात व्यक्ती जबरदस्ती घुसल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या व्यक्तीने जबरदस्ती घुसून तिचा गळा दाबण्याचा प्रयत्न केला. त्यासोबतच तिला मारहाण केल्याचा आरोप तिने केला आहे. मात्र तिने वेळी अलार्म वाजवल्याने आरोपीला पकडण्यात यश आले. सध्या हा व्यक्ती पोलिसांच्या ताब्यात आहे.
पहलगाम हल्ल्यानंतर भारत सरकारने देशात वास्तव्य करणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांना बाहेरचा रस्ता दाखवला. यानतंर पाकिस्तानातून भारतात आलेली सीमा हैदर ही सातत्याने चर्चेत आहे. त्यातच आता नोएडामधील रबुपुरा परिसरात राहणाऱ्या सीमा हैदरवर हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे. शनिवारी एका अज्ञात तरुण जबरदस्ती घुसला. त्याने सीमाचा गळा दाबण्याचा प्रयत्न केला. तिला मारहाण केली, मात्र सीमाने वेळीच अलार्म वाजवल्याने कुटुंबातील सदस्य आणि परिसरातील लोकांनी त्याला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. तेजस झाणी असे या आरोपीचे नाव आहे
तेजस झाणी हा गुजरातच्या सुरेंद्रनगर जिल्ह्यातील असून तो शनिवारी ट्रेनने दिल्लीत आला. त्यानंतर विविध मार्गांनी रबुपुरा येथे पोहोचला. तो सीमा हैदरच्या घरी पोहोचल्यानंतर त्याला तिच्या घराचा दरवाजा बंद असल्याचे आढळले. त्याने दरवाजाला लाथा मारल्या. सीमाने दार उघडताच आरोपीने तिच्यावर हल्ला करत तिचा गळा दाबण्याचा प्रयत्न केला. तिने विरोध केल्यावर तिला मारहाण केली.
यानंतर तिने आवाज केल्याने तिचे कुटुंबिय आणि शेजारी जमा झाले. त्यांनी आरोपीला पकडून बेदम मारहाण करत पोलिसांना बोलावले. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन आरोपीला अटक केली असून, या प्रकरणाचा तपास सुरू आहे. प्राथमिक तपासात आरोपी मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असल्याचे समोर आले आहे, अशी माहिती एसीपी सार्थक सेंगर यांनी दिली. तसेच चौकशीदरम्यान त्या आरोपी सीमा हैदर आणि तिचा पती सचिनवर विविध आरोप केले आहेत. सीमा हैदर आणि सचिनने माझ्यावर काळी जादू केली आहे, असा आरोप आरोपीकडून केला जात आहे.
दरम्यान पहलगाम हल्ल्यानंतर सीमा हैदरच्या सुरक्षेसाठी कडक उपाययोजना केल्याचा दावा पोलिसांनी केला होता. मात्र या घटनेमुळे पोलिसांच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. पोलीस या प्रकरणाची कसून चौकशी करत आहेत.