
गुजरातमधील अहमदाबाद येथे एअर इंडियाचे प्रवासी विमान कोसळल्याची घटना घडली आहे. हे विमान अहमदाबादहून लंडनला जात होते. या विमानात २४२ प्रवासी आणि क्रू मेंबर्स होते. यात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही समावेश होता. ते अहमदाबादवरून लंडनला जात होते अशी माहिती समोर आली आहे. ते १२ व्या क्रमांकाच्या सीटवरून प्रवास करत होते. मात्र या अपघातात त्यांचे निधन झाले आहे. त्यांच्या राजकीय कारकीर्दीविषयी माहिती जाणून घेऊयात.
म्यानमारमध्ये जन्म
विजय रुपाणी यांचा जन्म २ ऑगस्ट १९५६ रोजी म्यानमारमधील यांगून येथे झाला होती. त्यांच्या आईचे नाव मायाबेन आणि वडिलांचे नाव रमणिकलाल रुपाणी आहे. ते ७ भावंडांमध्ये सर्वात लहान होते.म्यानमारमधील राजकीय अस्थिरतेमुळे त्यांचे कुटुंब १९६० मध्ये राजकोटमध्ये स्थायिक झाले. त्यानंतर विजय रुपाणी याचे शालेय शिक्षण राजकोटमध्ये झाले. कालांतराने त्यांनी गुजरातच्या सौराष्ट्र विद्यापीठातून बीए आणि एलएलबीचे शिक्षण घेतले.शिक्षणादरम्यान ते भाजपच्या विद्यार्थी संघटनेत एबीव्हीपीमध्ये सामील झाले त्यानंतर १९७१ मध्ये संघात सामील झाले. त्यानंतर भाजपच्या स्थापनेपासून ते पक्षाशी जोडले गेले.
आणीबाणीच्या काळात तुरुंगवास
विजय रुपाणी हे १९७६ च्या आणीबाणीच्या काळात ते ११ महिने तुरुंगात होते. यानंतर ते सक्रीय राजकारणात उतरले. १९९६ ते १९९७ दरम्यान ते राजकोटचे महापौर होते. १९९८ मध्ये त्यांना भाजपच्या गुजरात युनिटचे सचिव बनवण्यात आले. २००६ ते २०१२ दरम्यान ते राज्यसभेचे सदस् होते. २०१३ मध्ये नरेंद्र मोदींच्या कार्यकाळात ते गुजरात महानगरपालिका वित्त मंडळाचे अध्यक्ष होते.
दोनदा गुजरातचे मुख्यमंत्री
विजय रुपाणी यांनी २०१४ मध्ये राजकोट पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडणूक जिंकत विधानसभा गाठली. त्यानंतर लगेच २०१४ मध्ये आनंदीबेन पटेल सरकारमध्ये त्यांना परिवहन मंत्री बनवण्यात आले.२०१६ मध्ये ते गुजरात भाजपचे अध्यक्ष बनले आणि ७ ऑगस्ट २०१६ रोजी ते गुजरातचे मुख्यमंत्री बनले. २०१७ मध्ये भाजपने गुजरातमध्ये विधानसभा निवडणुक जिंकली आणि रुपाणी दुसऱ्यांदा मुख्यमंत्री बनले.
कौटुंबिक जीवन
विजय रुपाणी यांनी भाजपच्या महिला शाखेच्या सदस्या अंजली यांच्याशी लग्न केले. त्यांना एक मुलगा असून तो इंजिनिअर आहे, तसेच त्यांना एक मुलगी आहे. त्यांना आणखी होता ज्याचा कार अपघातात मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार विजय रुपाणी यांची पत्नी सध्या लंडनमध्ये आहे, त्यांना आणण्यासाठी ते लंडनाचा जात होते अशी माहिती समोर आली आहे.