गुजरातच्या प्रचारतोफा थंडावल्या, या दिवशी चित्र स्पष्ट होणार…

महादेव कांबळे, Tv9 मराठी

Updated on: Nov 29, 2022 | 11:56 PM

गुजरातमध्ये पाटीदारांची मतं अप्रत्यक्षपणे 40 जागांचा फैसला ठरवतात. 2017 च्या निवडणुकीत पाटीदारांचं आंदोलन उभं राहिलं होतं. ज्याचा फटका भाजपला आणि फायदा काँग्रेसला झाला.

गुजरातच्या प्रचारतोफा थंडावल्या, या दिवशी चित्र स्पष्ट होणार...

नवी दिल्लीः गुजरात निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातल्या निवडणुकांसाठीच्या प्रचारतोफा थंडावल्या आहेत. 1 आणि 5 डिसेंबर असं दोन टप्प्यात मतदान होत आहे. त्यानंतर 8 डिसेंबर रोजी गुजरातचा निकालही लागणार आहे. गुजरात निवडणुकीचा निकाल 8 डिसेंबरला समोर येणार आहे. आणि त्याच वेळी गुजरातमधील चित्रही स्पष्ट होणार आहे. गुजरात विधानसभेत एकूण 182 जागा आहेत, त्यापैकी 1 डिसेंबर रोजी 89 जागांसाठी आणि 5 डिसेंबर रोजी 93 जागांसाठी मतदान होणार आहे. आणि 8 डिसेंबरला राज्यातील निकाल स्पष्ट होणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भाजप, राहुल गांधींच्या नेतृत्वात काँग्रेस आणि केजरीवालांच्या नेतृत्वाखाली आप अशी तिरंगी लढत होण्याचा अंदाज आहे.

मात्र भाजप म्हणतंय की गुजरातमध्ये 182 पैकी 150 जागांवर त्यांचाच विजय होणार असल्याचा विश्वास त्यांना आतापासूनच लागून राहिला आहे.

केजरीवालांनी आपचीच सत्ता येईल हे कागदावर सहीनिशी लिहूनही दिलं आहे, तर काँग्रेसच्या दाव्यानुसार आपऐवजी गुजराती लोक आता पुन्हा काँग्रेसवर विश्वास दाखवतील असा विश्वास काँग्रेसला लागून राहिला आहे.

1995 पासून गुजरातमध्ये भाजप सत्तेत आहे. म्हणजेच मागच्या 27 वर्षांपासून काँग्रेसला गुजरातच्या सत्तेत कमबॅक करता आलेलं नाही.

गेल्या निवडणुकीत काँग्रेसच्या मुसंडीमुळे भाजपची धाकधूक मात्र वाढवली होती हेही तितकच खरं आहे. 182 जागांपैकी गुजरातच्या सत्तेसाठी 92 जागा लागतात.

त्यामुळे 2017 मध्ये भाजपनं 99 तर काँग्रेसनं 77 जागा मिळवल्या होत्या. तेव्हा केजरीवालांच्या आपनं 27 जागा लढवल्या होत्या.

मात्र एकही जागेवर त्यांना विजय मिळवता आला नव्हता. आणि 2017 मध्ये आपच्या मतांची टक्केवारी फक्त 0.10 टक्के होती. मात्र यावेळी या दोघांच्या स्पर्धेत केजरीवालांचा आप काय भूमिका निभावणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे.

जसा महाराष्ट्रात कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भ असे पाच प्रशासकीय विभाग आहेत… तसंच गुजरातमध्येही सौराष्ट्र, कच, उत्तर गुजरात, मध्य गुजरात आणि दक्षिण गुजरात असे पाच भाग आहेत.

यापैकी सर्वाधिक 61 जागा मध्य गुजरातमधून येतात, त्यानंतर सौराष्ट्रमधून 54, उत्तर गुजरातमधून 32 आणि दक्षिण गुजरातमधून 35 आमदार निवडून जातात.

गुजरातचे 52 टक्के मतदार ओबीसी आहेत. ज्यामध्ये कोळी आणि ठाकूर या दोन मोठ्या जाती आहेत. यानंतर पाटीदारांची मतांची टक्केवारी 18 ते 19 टक्के तर दलित 12 ते 16 टक्के, आदिवासी 15 टक्के आणि मुस्लिम मतदार 10 टक्के आहेत. यापैकी पाटीदारांची टक्केवारी कमी असली तरी स्थानिक यंत्रणा, संस्था, व्यवसायांवर पाटीदारांचं वर्चस्व असल्याचेही सांगण्यात येत आहे.

म्हणून गुजरातमध्ये पाटीदारांची मतं अप्रत्यक्षपणे 40 जागांचा फैसला ठरवतात. 2017 च्या निवडणुकीत पाटीदारांचं आंदोलन उभं राहिलं होतं. ज्याचा फटका भाजपला आणि फायदा काँग्रेसला झाला. मात्र यावेळी पाटीदार समाज आमच्याकडे असल्याचा दावा भाजपचा आहे.

गेल्या निवडणुकीत भाजपविरोधात रान उठवणारे पाटीदार नेते हार्दिक पटेल यावेळी भाजपमध्ये आहेत. त्याला शह देण्यासाठी आपने पाटीदार आंदोलनाचा दुसरा चेहरा गोपाल इटालिया यांना राज्य संयोजक बनवलं आहे.

प्रत्येक राज्याप्रमाणेच गुजरातमध्येही यंदाचा प्रचार मुलभूत मुद्द्यांऐवजी तात्कालीक मुद्यांनी मोठा झाला आहे. आधी केजरीवालांनी नोटांवर गांधींसोबतच लक्ष्मीचा फोटो छापण्याची मागणी केली होती तर त्यानंतर भाजपनं समान नागरी कायद्याबाबत हालचाली सुरु केल्या होत्या. तर काँग्रेसनं मोदींसाठी वापरलेला औकात या शब्दावरुन प्रचारसभा तापल्या होत्या.

त्याला उत्तर म्हणून भाजपच्या हेमंत बिस्वा शर्मांनी राहुल गांधींच्या वाढलेल्या दाढीची तुलना इराकच्या सद्दाम हुसैनशी केली होती.

नंतर आपच्या उत्तरांवर भाजपनंही दहशतवादाचा मुद्दा पुढे करत हिंदुत्वाला धार दिली होती. यंदा गुजरातमध्ये पाटीदार आणि आदिवासी समाजाची मतं निर्णायक ठरणार असल्याचं बोललं जातंय.

गुजरातच्या सौराष्ट्रमध्ये पाटीदारांची संख्या जास्त असल्यामुळे केजरीवालांच्या आपनं सौराष्ट्रात भर दिलाय. मुस्लिम मतदार काँग्रेसकडे जाण्याची शक्यता असली तरी एमआयएम त्यात किती विभागणी करेल., हे पाहणंही महत्वाचं आहे

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI