
15 ऑगस्ट जवळ येत आहे आणि देशभरात स्वातंत्र्याचा उत्साह दिसत आहे. दरवर्षी स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी पंतप्रधान दिल्लीतील लाल किल्ल्यावर (Red Fort) तिरंगा फडकवतात. पण तुम्हाला कधी प्रश्न पडला आहे का, की तिरंगा फक्त लाल किल्ल्यावरच का फडकवला जातो? मुघलांनी बांधलेल्या ताजमहाल किंवा फतेहपूर सिक्रीसारख्या इतर इमारतींवर का नाही? चला, यामागचं ऐतिहासिक आणि प्रतीकात्मक कारण जाणून घेऊया.
लाल किल्ल्यावरच तिरंगा का फडकवला जातो?
1. स्वातंत्र्याचा पहिला क्षण: 15 ऑगस्ट, 1947 रोजी, जेव्हा भारत स्वतंत्र झाला, तेव्हा देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून (प्राचीर) ब्रिटिशांचा युनियन जॅक (Union Jack) ध्वज उतरवून पहिल्यांदा भारताचा राष्ट्रीय ध्वज (तिरंगा) फडकवला. या घटनेने स्वतंत्र भारताची सुरुवात झाली. तेव्हापासून ही परंपरा प्रत्येक स्वातंत्र्यदिनी पाळली जाते. लाल किल्ला हा देशाच्या स्वातंत्र्याच्या पहिल्या क्षणाचा साक्षीदार आहे, त्यामुळे त्याला विशेष महत्त्व आहे.
2. सत्तेचं केंद्र: लाल किल्ला हा 17 व्या शतकात मुघल बादशाह शाहजहानने बांधला होता. हा किल्ला मुघल साम्राज्याचं अनेक वर्षं सत्तेचं आणि भव्यतेचं केंद्र होतं. 1857 पर्यंत लाल किल्ला मुघलांची राजधानी होता. त्यामुळे तो भारताच्या इतिहासाचं एक महत्त्वाचं प्रतीक बनला. लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवून, हे सत्ताकेंद्र आता लोकांच्या हातात आलं आहे, हे दाखवलं गेलं.
लाल किल्ल्याला राष्ट्रीय सन्मानाचे प्रतीक का मानतात?
राजधानीतील स्थान: स्वातंत्र्यानंतर लाल किल्ल्याला राष्ट्रीय गौरवाचे प्रतीक म्हणून निवडण्यात आले, कारण तो भारताची राजधानी असलेल्या दिल्लीमध्ये आहे आणि स्वातंत्र्यसंग्रामाच्या अनेक आठवणींशी जोडलेला आहे.
भव्य सोहळ्यासाठी योग्य: लाल किल्ल्याची भव्य तटबंदी आणि ‘दिवाण-ए-आम’ सारख्या मोठ्या जागा राष्ट्रीय कार्यक्रमांसाठी आणि जनसभेसाठी योग्य आहेत. इतर मुघल इमारती, जसे की ताजमहाल, स्मारक म्हणून ओळखल्या जातात. पण लाल किल्ला हा शासकीय आणि राष्ट्रीय एकात्मतेचं प्रतीक आहे.
लाल किल्ला ही फक्त एक इमारत नाही, तर तो भारताची एकता आणि स्वातंत्र्य यांचा गौरवशाली इतिहास दर्शवतो. म्हणूनच, लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवणे ही केवळ एक परंपरा नसून, देशाच्या स्वातंत्र्याचा सन्मान करण्याची एक कृती आहे.
लाल किल्ल्याबद्दल काही खास गोष्टी
मूळ नाव: लाल किल्ल्याचे मूळ नाव ‘किल्ला-ए-मुबारक’ आहे.
बांधकाम: या किल्ल्याचे बांधकाम 1638 मध्ये सुरू झाले आणि पूर्ण व्हायला 10 वर्षे लागली.
जागतिक वारसा: युनेस्कोने 2007 साली लाल किल्ल्याला जागतिक वारसा स्थळांच्या (World Heritage Site) यादीत समाविष्ट केले आहे.