
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजे आरएसएस ही एक हिंदू समाजासाठी काम करणारी संघटना आहे असे म्हटले जाते. तसेच ही संघटना मुस्लिमविरोधी आहे असाही प्रचार केला जातो. मात्र आरएसएसचे प्रमुख मोहन भागवत यांनी आता मुस्लिम लोकांबाबत केलेले एक विधान आता चर्चेत आले आहे. आरएसएसच्या 100 वर्षांच्या पूर्ततेनिमित्त आयोजित एका कार्यक्रमात बोलताना मोहन भागवत यांनी एक किस्साही सांगितला आहे याबाबत माहिती जाणून घेऊयात.
मोहन भागवत यांनी एक किस्सा सांगताना म्हटले की,’1948 मध्ये जयप्रकाश बाबू हातात जळती मशाल घेऊन संघ कार्यालय जाळण्यासाठी गेले होते. मात्र आणीबाणीनंतर ते संघाच्या शिक्षा वर्गात आले त्यावेळी त्यांनी बदलाची आशा फक्त तुमच्याकडून आहे असं विधान केले आहे. पुढे धर्मांतर आणि बेकायदेशीर घुसखोरीबाबतच्या प्रश्नांवर बोलताना भागवत यांनी मोठं विधान केलं आहे.
पुढे बोलताना मोहन भागवत म्हणाले की, ‘भारतातील लोकसंख्या संतुलन बदलण्यासाठी तीन घटक जबाबदार आहेत. पहिला घटक म्हणजे धर्मांतर, जे परंपरेविरुद्ध आहे. काही मुस्लिम उलेमांनी मला असं सांगितलं की, इस्लाममध्ये जबरदस्तीने धर्मांतर करणे पाप आहे. दुसरा घटक म्हणजे बेकायदेशीर स्थलांतर, यामुळे रोजगार आणि सामाजिक तणाव निर्माण होतो. तिसरा घटक म्हणजे लोकसंख्या वाढीचा दर, यात संतुलन गरजेचे आहे. मुस्लिम लोकांनी कमीत कमी 3 मुले जन्माला घालावीत, यामुळे समाजात असंतुलन निर्माण होणार नाही.’
मोहन भागवत पुढे बोलताना म्हणाले की, ‘आम्ही कधीही म्हटले नाही की इस्लाम भारतात राहणार नाही. कारण जातीवाद हा आपल्या विकासात अडथळा आहे. त्यामुळे जातीवादाला महत्व न देता प्रत्येकाने एकमेकांच्या घरी येणे-जाणे करावे. कारण प्रत्येकाचा DNA सारखाच आहे. शोषणमुक्त समाज असावा अशी आमची भूमिका आहे. आमचे स्वयंसेवक कधीही अत्याचार करू शकत नाहीत असंही मोहन भागवत यांनी सांगितलं.