
सध्या महाराष्ट्रासह देशाच्या अनेक भागांत जोरदार पावसाचा कहर सुरु आहे. नद्या-नाले भरून वाहत आहेत, आणि हवामान विभाग सतत पावसाच्या आकड्यांची नोंद देत आहे. तुम्हीही वारंवार ऐकता “६ इंच पाऊस पडला”, “५० मिमी पावसाची नोंद झाली” वगैरे. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की पावसाचं प्रमाण इतकं अचूकपणे मोजलं जातं तरी कसं? हवामान विभाग यासाठी कोणती यंत्रणा वापरतो? याचं उत्तर आहे वैज्ञानिक आणि अत्याधुनिक पद्धतीने वापरली जाणारी वर्षामापन यंत्रणं.
हवामान वैज्ञानिकांच्या नुसार, जगभरात पावसाचं प्रमाण मोजण्यासाठी जवळपास एकसारखी उपकरणं वापरली जातात आणि भारतातही याच मानक उपकरणांचा उपयोग केला जातो. आजच्या घडीला भारतात पावसाचं प्रमाण मोजण्यासाठी तीन प्रमुख प्रकारची यंत्रं वापरली जातात :
1. साधारण वर्षामापन यंत्र (Ordinary Rain Gauge)
हे पारंपरिक यंत्र हवामान वेधशाळांमध्ये मोठ्या प्रमाणात वापरलं जातं. यामध्ये एक टाकी (फनेल) असते, जिच्यातून पावसाचे थेंब एका कलेक्शन जारमध्ये गोळा होतात. हा जार सुमारे 400 मिलीलीटर क्षमतेचा असतो. यामध्ये जमा झालेलं पाणी एक परखनळीच्या साहाय्याने मोजलं जातं. दिवसातून तीन वेळा नोंद घेण्यात येते, ज्यावरून त्या परिसरातील २४ तासांत पडलेला पाऊस नोंदवला जातो.
2. स्वयंचलित वर्षामापन यंत्र (Self-recording Rain Gauge)
हे यंत्र अधिक अद्ययावत असून, यामध्ये देखील पावसाचे थेंब फनेलमधून एका ड्रममध्ये जमा होतात. मात्र, यामध्ये एक घड्याळ प्रणाली (क्लॉक ड्रम) आणि सुई असते, जी एक ग्राफ काढते. या ग्राफच्या साहाय्याने पावसाचं प्रमाण आणि कालावधी दोन्ही आपोआप मोजलं जातं. म्हणजेच, पावसाचा प्रत्येक टप्पा आणि त्याची तीव्रता वेळेनुसार रेकॉर्ड होते.
3. टिपिंग बकेट वर्षामापन यंत्र (Tipping Bucket Rain Gauge)
ही यंत्रणा पूर्णतः ऑटोमेटेड असून, त्यामध्ये फनेलद्वारे पावसाचे थेंब एका बकेटमध्ये जमा होतात. ठरावीक पाण्याचं प्रमाण जमा झालं की बकेट झुकतं आणि प्रत्येक वेळेस एक टिपची नोंद होते. ही माहिती इलेक्ट्रॉनिक डाटा लॉगरकडे पाठवली जाते. यंत्र दर १५ मिनिटांनी पावसाची आकडेवारी अपडेट करतं. यामुळे जवळपास थेट थेंबागणिक माहिती मिळते.
या अत्याधुनिक यंत्रांच्या मदतीने हवामान विभाग देशभरात विविध ठिकाणी पावसाचं नेमकं प्रमाण मोजतो आणि हवामान अंदाज देतो. हे आकडे शेती, पूर नियंत्रण, जलसाठा नियोजन आणि आपत्ती व्यवस्थापनासाठी अत्यंत उपयुक्त ठरतात. पावसाची मोजणी हा केवळ आकड्यांचा खेळ नसून त्यामागे वैज्ञानिक परिश्रम आणि अचूक डेटा संकलनाचं महत्त्व असतं.
या माहितीचा उपयोग काय?
पावसाचं प्रमाण मोजणं म्हणजे अंदाज नाही, तर पूर्णपणे अचूक विज्ञान आहे. हवामान विभागाच्या प्रयत्नांमुळेच आपल्याला हवामानाशी संबंधित योग्य आणि वेळेवर माहिती मिळते, जी शेतीपासून आरोग्यापर्यंत अनेक गोष्टींसाठी महत्त्वाची असते.