Independence Day 2024 : लाल किल्ल्याभोवती 7 लेयर सुरक्षा, दिल्लीत 10 हजार पोलीस तैनात, पंतप्रधान मोदी यांच्या स्वातंत्र्य दिनाच्या भाषणाकडे देशाचं लक्ष
देशाचा 78 वा स्वातंत्र्य दिवस आज साजरा केला जातोय. देशाला खूप परिश्रम आणि यातना सोसून, संघर्ष करुन हे स्वातंत्र्य मिळालेलं आहे. देशाच्या लाखो नागरिकांना अतिशय संघर्ष करुन हे स्वातंत्र्य मिळवलं आहे. त्यामुळे आजचा स्वातंत्र्य दिवस संपूर्ण देशासाठी जास्त महत्त्वाचा आहे. स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने राज्यात 'हर घर तिरंगा' मोहीम शिंदे सरकारकडून राबवली जात आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून या स्वातंत्र्य दिनी 11 व्या वेळा राष्ट्रीय ध्वज फडकला जाणार आहे. नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावरुन देशाला संबोधित करणार आहेत. मोदी यावेळी काय बोलणार? याकडे राज्याचं विशेष लक्ष असणार आहे. कारण मोदी यांच्या नेतृत्वात देशात तिसऱ्यांदा एनडीएचं सरकार देशात स्थापन झालं आहे. स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. देशाचा प्रत्येक नागरिक या स्वातंत्र्य दिनाच्या आनंदोत्सवात न्हाऊन निघणार आहे.

देशासाठी आज खूप मोठा दिवस आहे. आजच्याच दिवशी 78 वर्षांपूर्वी भारताला स्वातंत्र्य मिळालं होतं. ब्रिटिशांनी आजच्याच दिवशी भारत देश सोडून पलायन केलं होतं. ब्रिटश सरकारने भारतीय नागरिकांवर खूप जुलूम आणि अत्याचार केले होते. त्या अत्याचारांच्या विरोधात भारताच्या शूर स्वातंत्र्य सैनिकांनी लढा दिला होता. त्यामुळे आपण आज देशात मोकळा श्वास घेऊ शकत आहोत. आजचा दिवस देशासाठी प्राणाची आहुती दिलेल्या अशा लाखो स्वातंत्र्य सैनिकांना वंदन करण्याचा दिवस आहे. स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने दिल्लीत लाल किल्ल्यावर भव्य ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज लाल किल्ल्यावर ध्वजारोहण होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी ध्वजारोहणानंतर देशाला संबोधित करणार आहेत. यावेळी मोदी आपल्या भाषणात देशासाठी काही मोठी घोषणा करतात का? याकडे संपूर्ण देशाचं लक्ष असणार आहे.
स्वातंत्र्य दिन सोहळ्याचा कार्यक्रम कसा असेल?
राजधानी दिल्लीतील लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या स्वातंत्र्यदिन सोहळ्याचे अध्यक्षस्थानी असतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रध्वज फडकावून देशाला संबोधित करणार आहेत. नरेंद्र मोदी सकाळी 7.17 वाजता लाल किल्ल्यावर पोहोचतील. यावेळी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ आणि संरक्षण सचिव कृतार अरमाने पंतप्रधान मोदींचे लाल किल्ल्यावर स्वागत करतील.
संरक्षण सचिव लेफ्टनंट जनरल भवनीश कुमार, जनरल कमांडिंग दिल्ली एरिया यांची पंतप्रधानांशी ओळख करून देतील. नंतर दिल्ली एरिया जनरल कमांडिंग ऑफिसर मोदींना परेड ग्राउंडवर घेऊन जातील. नरेंद्र मोदी परेडला भेट दिल्यानंतर ते लाल किल्ल्याच्या तटबंदीला भेट देतील. तिथे दिल्लीचे जनरल कमांडिंग ऑफिसर पंतप्रधान मोदींना ध्वजारोहणासाठी व्यासपीठावर घेऊन जातील. नंतर राष्ट्रध्वज फडकावल्यानंतर पंतप्रधान देशाला संबोधित करतील.
कार्यक्रमासाठी 6 हजार विशेष पाहुण्यांना आमंत्रण
स्वातंत्र्य दिनाच्या या सोहळ्यासाठी 6 हजार विशेष पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी तरुण, आदिवासी समाज, शेतकरी आणि महिला अशा विविध क्षेत्रातील सुमारे 6,000 विशेष पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आले आहे. नुकत्याच पार पडलेल्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या भारतीय संघालाही आमंत्रित करण्यात आले आहे. विविध राज्ये/केंद्रशासित प्रदेशातील सुमारे 2,000 लोक पारंपारिक पोशाख परिधान करून या भव्य कार्यक्रमात सहभागी होतील. संरक्षण मंत्रालयाने आयोजित केलेल्या विविध ऑनलाइन स्पर्धांचे तीन हजार विजेते सहभागी होणार आहेत. या समारंभात बालकल्याण कर्मचारी, जिल्हा बाल संरक्षण कर्मचारी आदी सहभागी होतील.
लाल किल्ल्याभोवती 7 लेयर सुरक्षा
स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने राजधानी दिल्लीत पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. निमलष्करी दल आणि सुरक्षा एजन्सीचे कर्मचारी लाल किल्ल्याभोवती विशेषतः लाल किल्ल्याच्या आत आणि बाहेर सुरक्षेसाठी तैनात आहेत. तसेच दिल्ली पोलीस दलातील 10 हजार पोलीस आणि 3500 वाहतूक पोलीस संपूर्ण दिल्लीत तैनात करण्यात आले आहेत.
स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम जिथे होणार आहे त्या लाल किल्ल्याभोवती 7 लेयर सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. लाल किल्ल्याच्या आत 4 ड्रोन कॅमेरे सुरक्षेसाठी नजर ठेवून असणार आहेत. तसेच एनएसजीचे संघ लाल किल्ल्याभोवती विविध ठिकाणी केंद्रीत आहेत. लाल किल्ल्याच्या 5 किमी परिघावर सीसीटीव्हीद्वारे लक्ष ठेवले जात आहे. व्हीव्हीआयपी मार्गावर एआय तंत्रज्ञानाने सुसज्ज 500 हून अधिक कॅमेरे लावण्यात आले आहेत.
स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला सुरक्षा दलातील जवानांसाठी शौर्य पुरस्कार जाहीर
स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शस्त्र दल आणि केंद्रीय पोलीस सुरक्षा दलातील जवानांसाठी 103 शौर्य पुरस्काराची घोषणा केली आहे. 18 कीर्ति चक्राशिवाय 4 मरणोपरांत शौर्य चक्र, 63 सैन्य पदक, 11 नौदल पदक आणि 6 हवाई पदकांचा यात समावेश आहे.
