पाकिस्तानचा ‘नापाक’ हेतू, सुवर्ण मंदिरावरील हल्ला असा केला निकामी, भारतीय लष्कराने दाखवला लाईव्ह डेमो

भारताने ऑपरेशन सिंदूर राबवले. त्यानंतर पाकिस्तानची हल्ले भारताच्या हवाई संरक्षण प्रणालीने परतवून लावले. पाकिस्तानने सुवर्ण मंदिराला लक्ष्य केलेले सर्व ड्रोन आणि क्षेपणास्त्र नष्ट केले. सुवर्ण मंदिरापर्यंत त्यांची शस्त्रे पोहचू दिली नाही.

पाकिस्तानचा नापाक हेतू, सुवर्ण मंदिरावरील हल्ला असा केला निकामी, भारतीय लष्कराने दाखवला लाईव्ह डेमो
india air defence system
Image Credit source: टीव्ही 9 भारतवर्ष
| Updated on: May 19, 2025 | 11:06 AM

भारताच्या ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानकडून 8 मे रोजी ड्रोन हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला. भारतीय लष्कराने हा हल्ला निकामी केला. पाकिस्तानने अमृतसरमधील सुवर्ण मंदिरावर (गोल्डन टेंपल) हल्ला करण्याची योजना आखली होती. परंतु भारतीय सैन्याने सुवर्ण मंदिर आणि देशातील इतर शहरांवर पाकिस्तानकडून झालेले हल्ले निकामी केले. या शहरांच्या दिशेने सोडलेले क्षेपणास्त्र आणि ड्रोन निकामी केले.

पंजाबमधील अमृतसरमध्ये भारतीय लष्कराने एक डेमो दाखवला. भारताच्या आकाश क्षेपणास्त्र प्रणाली, एल-70 एअर डिफेन्स गनसह भारतीय हवाई संरक्षण प्रणालीने सुवर्ण मंदिर आणि पंजाबमधील इतर शहरांवर झालेले हल्ले परतवून लावले. हे हल्ले कसे परतवून लावले त्याचा लाईव्ह डेमो दाखवण्यात आला. तसेच पाकिस्तानकडून सोडण्यात आलेले क्षेपणास्त्राचे अवशेष दाखवण्यात आले. हे क्षेपणास्त्र भारताच्या हवाई संरक्षण प्रणालीने हवेतच नष्ट केले.

मेजर जनरल कार्तिक सी. शेषाद्री यांनी सांगितले की, पाकिस्तान सैन्याकडे निश्चित लक्ष्य नव्हते. पाकिस्तान भारताची शहरे, धार्मिक स्थळ आणि लष्करी तळ यांना लक्ष्य करेल, असा आमचा अंदाज होता. त्यात सुवर्ण मंदिर पाकिस्तानच्या टार्गेटवर होते. त्यामुळे या मंदिराच्या संरक्षणसाठी आम्ही अत्याधुनिक शस्त्र या ठिकाणी तैनात केली. 8 मे रोजी रात्री पाकिस्तानचे मानवरहीत ड्रोन आणि क्षेपणास्त्राने हल्ला केला.

पाकिस्तानकडून झालेल्या या हल्ल्यास तोंड देण्यासाठी आम्ही तयार होतो, असे मेजर जनरल शेषाद्री यांनी सांगितले. आमची सतर्क असलेल्या आर्मी एअर डिफेन्स गनर्सने पाकिस्तानी सैन्याचे हल्ले परतवून लावले. सुवर्ण मंदिराला लक्ष्य केलेले सर्व ड्रोन आणि क्षेपणास्त्र नष्ट केले. आमच्या सुवर्ण मंदिरापर्यंत त्यांची शस्त्रे पोहचू दिली नाही, असे शेषाद्री यांनी म्हटले.

मेजर जनरल शेषाद्री म्हणाले, पाकिस्तान सैन्याने प्रायोजित केलेला पहलगाम दहशतवादी हल्लात निरपराध पर्यटकांची हत्या करण्यात आली. या हल्ल्यामुळे संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली होती. त्यामुळे भारताच्या लष्कराने ऑपरेशन सिंदूर राबवून पाकिस्तानमधील दहशतवाद्यांना धडा शिकवला. त्यामध्ये दहशतवादी लपण्याच्या ठिकाणांवर हल्ले करण्यात आले.