भारताच्या त्या गोष्टीमुळे चीन झाला भलताच खूश, चायनाकडून कौतुकच कौतुक, थेट जगाला दिलं उदाहरण
अमेरिकेच्या टॅरिफनंतर भारताची रशिया आणि चीन सोबतची जवळीक वाढली आहे, भारताची चीनसोबत वाढत असलेली जवळीक अमेरिकेसाठी डोकेदुखीचा विषय बनली असतानाच आता मोठी बातमी समोर आली आहे.

अमेरिकेनं भारतावर लावलेल्या टॅरिफनंतर अमेरिका आणि भारतामधील संबंध प्रचंड ताणले गेले आहेत. मात्र दुसरीकडे या टॅरिफनंतर भारताची चीन आणि रशियासोबत जवळीक वाढत आहे. काही दिवसांपूर्वीच रशियाचे राष्ट्रपती व्लादीमीर पुतिन हे भारताच्या दौऱ्यावर आले होते. तर त्यापूर्वी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे चीनच्या दौऱ्यावर गेले होते. समोर आलेल्या आकडेवारीनुसार गेल्या काही महिन्यांपासून भारताची चीन आणि रशियासोबत निर्यात देखील वाढली आहे. दरम्यान अमेरिकेनं भारतावर लावलेल्या टॅरिफनंतर चीनने अमेरिकेचा निषेध देखील केला होता, भारतीय वस्तूंचं आमच्या देशात स्वागत आहे, असं चीनने म्हटलं होतं. दरम्यान त्यानंतर आता पुन्हा एकदा चीनकडून भारताचं जोरदार कौतुक करण्यात आलं आहे. चीनच्या दूतावासाकडून एक अधिकृत स्टेटमेंट जारी करण्यात आलं आहे. त्यामध्ये चीनने असं म्हटलं आहे की, आम्हाला हे पाहून खूप आनंद झाला, की भारत हा जपानला मागे टाकून जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला आहे. हीच भारताची खरी ताकद आहे, असं चीनने म्हटलं आहे.
भारत आता जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला आहे, भारतानं जपानला मागे टाकलं आहे, एका सरकारी प्रसिद्धी पत्रकानुसार भारताचा जीडीपी सध्या स्थितीमध्ये 4.18 ट्रिलियन अमेरीकन डॉलवर पोहोचली आहे. अमेरिका, चीन आणि जर्मनीनंतर आता भारत ही जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला आहे. दरम्यान असा देखील अंदाज लावला जात आहे की, भारत 2030 पर्यंत जर्मनीला मागे टाकून जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनू शकतो. दरम्यान यावरूनच आता चीनने भारताचं जोरदार कौतुक केलं आहे.
नेमकं काय म्हटलं?
चीनच्या दूतावासातील प्रवक्त यू जिंग यांनी यासंदर्भात एक ट्विट केलं आहे. हे ऐकून आनंद झाला की, भारत जपानला मागे टाकून जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला आहे. भारतानं संपूर्ण जगाला हे दाखवून दिलं आहे की, खरी ताकद ही प्रामाणिकपणाने इतिहासाचा सामना करून, त्यापासून बोध घेऊन आणि जबाबदारी घेऊन येते, असं चीनने म्हटलं आहे. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून तैवानवरून जपान आणि चीनमध्ये तणाव निर्माण झाला आहे, ही संधी साधून चीनने जपानला डिवचल्याचं बोललं जात आहे.
