
नवी दिल्ली : कोरोना संकटाने आपल्यापासून अनेक जवळची माणसं हिरावली. अनेक संसार उद्ध्वस्त झाले. अनेक जणांच्या नोकऱ्या गेल्या. अनेक जण देशोधडीला लागले. अनेकांना आपल्या जवळच्या माणसाला शेवटच्या क्षणी पाहताही आलं नाही. कोरोना संकटाच्यावेळी एक काळ असा होता की, अंत्यविधीसाठी मृतदेहांची स्मशानभूमी परिसरात रांग लागलेली असायची, देशातल्या स्मशानभूमी कमी पडत होत्या. इतकं भयानक ते वास्तव आहे. या संकटाचं स्मरण जरी झालं तरी अंगावर शहारे येतात. नको असलेली भयानक भीती मनात येऊन जाते. गेल्या तीन वर्षांपासून हे संकट देशात आहे. गेल्या काही दिवसांपासून परिस्थिती निवळली होती. पण आता पुन्हा कोरोना संकट गडद होताना दिसत आहे. विशेष म्हणजे देशातली आजची नव्या कोरोना रुग्णांची संख्या ही चिंताजनक आहे.
भारतात पुन्हा नव्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. देशात आज दिवसभरात तब्बल 4 हजार 435 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. कोरोनाबाधितांची संख्या पुन्हा वाढू लागल्यामुळे आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे. देशात सध्या एकूण 23 हजार सक्रीय रुग्ण असल्याची माहिती मिळत आहे.
मुंबईत दिवसभरात 221 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. मुंबईत दिवसभरात 138 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत सध्या 1 हजार 244 सक्रिय रुग्ण आहेत. मुंबईत दररोज 200 पेशा जास्त नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळत आहेत.
पुणे जिल्ह्यात दिवसभरात 98 कोरोना रुग्णसंख्येची नोंद झालीय. कोरोनामुळे दिवसभरात एका रुग्णाचा मृत्यू झालाय. पुणे मनपा हद्दीत 63 कोरोना रुग्णांची नोंद झालीय. जिल्ह्यात अजूनही 756 सक्रीय रुग्णसंख्या असल्याची माहिती मिळत आहे.