Heavy Rain Alert : नवरात्रीपर्यंत कोसळणार मुसळधार पाऊस,IMD चा कोणत्या राज्यांना हाय अलर्ट? महाराष्ट्रात स्थिती काय?
भारतीय हवामान विभागाने (IMD) देशभरात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. अनेक राज्यांना हाय अलर्ट देण्यात आला आहे. १६ ते २० सप्टेंबर दरम्यान उत्तराखंड, बिहार, आसाम, मेघालय, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि गुजरात यासारख्या राज्यांमध्ये जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. आंध्र प्रदेश आणि रायलसीमामध्ये वादळी वाऱ्यांचाही अंदाज आहे.

गेल्या 4 महिन्यांपासून देशाला धारांनी भिजवून काढणारा नैऋत्य मान्सून आता हळूहळू निरोप घेत आहे. भारतीय हवामान विभागाच्या (IMD) मते, मान्सून आता राजस्थान, गुजरात, पंजाब आणि हरियाणाच्या काही भागातून माघार घेत आहे. मात्र असं असलं तरीही त्याचा परिणाम उर्वरित राज्यांमध्ये अजूनही दिसून येत असून येत्या काही दिवसांतही अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. IMD ने हा अंदाज वर्तवला असून अनेक राज्यांना हाय अलर्ट देण्यात आला आहे. नवरात्री पर्यंत काही राज्यांत पावसाचा जोर कायम राहणार असल्याचे हवामाना विभागातर्फे सांगण्यात आले आहे. जाणून घेऊया सविस्तर माहिती
उत्तर भारत
16 आणि 17 सप्टेंबर रोजी उत्तराखंड आणि पूर्व उत्तर प्रदेशात मुसळधार पाऊस पडू शकतो. तसेच हिमाचल प्रदेश आणि पश्चिम उत्तर प्रदेशात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसासह मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
पूर्व आणि मध्य भारत
16 आणि 17 सप्टेंबर रोजी बिहार, उप-हिमालयीन पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्ये मुसळधार पावसाचा अंदाज आहे. झारखंड, छत्तीसगड, पश्चिम मध्य प्रदेश, ओडिशा आणि विदर्भातही हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो आणि काही ठिकाणी जोरदार पाऊस पडू शकतो. तर 17 ते 20 सप्टेंबर दरम्यान अंदमान आणि निकोबार बेटांवर सतत पाऊस पडेल.
पूर्वोत्तर भारत
आसाम आणि मेघालयमध्येतर आठवडाभर सातत्यान पाऊस पडण्याची शक्यता आहे. नागालँड, मणिपूर, मिझोरम आणि त्रिपुरामध्येही 16 सप्टेंबर ते 19 ते 22 सप्टेंबर पर्यंत पाऊस सुरू राहू शकतो. अरुणाचल प्रदेशला सध्या तरी यापासून दिलासा मिळेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
दक्षिण भारत
तर तामिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक आणि केरळच्या अनेक भागात 16 ते 19 सप्टेंबर दरम्यान हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुढील पाच दिवस आंध्र प्रदेश आणि रायलसीमामध्ये ताशी 30-40 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.
पश्चिम भारत
मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण आणि गोव्यात 16 ते 18 सप्टेंबरदरम्यान मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तसेच गुजरातच्या अनेक भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
