
India Pakistan War : भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध जास्तच बिघडले आहेत. दोन्ही देशांत आता कोणत्याही क्षणी युद्ध भडकण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. असे असतानाच आता भारताने आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. यानंतर आता कोणतीही दहशतवादी कारवाई थेट भारताविरोधात युद्धाची कारवाई मानले जाईल, असे भारताने ठरवले आहे.
भारताच्या ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानने भारतावर अनेक हल्ले केले आहेत. पाकिस्तानने भारताच्या राजस्थान, पंजाब, जम्मू यासारख्या सीमावर्ती प्रदेशांना लक्ष्य केलंय. त्यानंतर आता भारत सरकारने आणखी कडक पवित्रा घेतला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार भारताने दहशतवादाविरोधात आणखी कठोर भूमिका घेण्याचं ठरवलं आहे. आता भविष्यातील कोणतेही दहशतवादी कृत्य हे भारताविरोधातील युद्धाची कारवाई समजले जाईल, असे भारताने ठरवले आहे. दहशतवादाच्या कारवाईला उत्तरही त्याच पद्धतीने दिले जाणार आहे.
गेल्या तीन दिवसांपासून भारत आणि पाकिस्तान यांच्यात संघर्ष वाढत चालला आहे. तिकडून पाकिस्तानही प्रत्युत्तरादाखल हल्ले करत आहे. या सर्व घडामोडींत आम्ही करत असलेले हल्ले हे पाकिस्तानच्या हल्ल्यामुळे आहेत, अशी भूमिका भारताने घेतली आहे.
पाकिस्तान भारतावर सातत्याने हल्ले करत आहे. सीमेवर ड्रोन, लांब पल्ल्यांची शस्त्र, लढाऊ विमाने यांच्या माध्यमातून पाकिस्तान भारताला डिवचत असून या हल्ल्यांना अयशस्वी करण्यात आलं आहे, असं भारतानं सांगितलं आहे. यासह पाकिस्तान सीमाभागात त्यांचे सैन्य तैनात करत आहे, असेही भारताने सांगितले आहे. पाकिस्तानच्या भूमिकेमुळे भविष्यातील स्थिती आणखी बिघडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, 22 एप्रिलपासून भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध कमालीचे ताणले गेले आहेत. 22 एप्रिल रोजी पहलगाम येथे सशस्त्र दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. या हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानी हद्दीतील 9 दहशतवादी तळं उद्ध्वस्त केली. भारताच्या याच कारवाईला उत्तर म्हणून 9 मे रोजी पाकिस्तानने भाराताच्या सीमाभागातील राज्यांवर हवाई हल्ले केले. त्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात सध्या युद्धजन्य स्थिती निर्माण झाली आहे.