पाकिस्तानच्या सर्वात मोठ्या धर्मगुरूंचा भारताला पाठिंबा, म्हणाले जर युद्ध झालं तर आम्ही..
पाकिस्तानमधील लाल मशिदीच्या मौलानांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यांनी युद्धाबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.

पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला, या हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान दोन्ही देशांमध्ये तणावाची परिस्थिती आहे. भारत कधीही हल्ला करू शकतो अशी भीती पाकिस्तान सरकारला वाटत आहे. त्यामुळे आता पीओकेमध्ये पाकिस्तानी सैन्याच्या हालचाली वाढल्या आहेत. दुसरीकडे आता पाकिस्तानला त्यांच्याच देशातील धर्मगुरूंनी घरचा आहेर दिला आहे. इस्लामाबादमधल्या जगप्रसिद्ध लाल मशिदीमधील मौलवींनी मोठं वक्तव्य केलं आहे, हे युद्ध धार्मिक नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. ते एवढ्यावरच थांबले नाहीत तर हे युद्ध धार्मिक नसल्यामुळे पाकिस्तानमधील जनतेनं या युद्धापासून दूर राहावं असं आवाहनही त्यांनी केलं आहे. या मौलानांपूर्वी पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान सारख्या नेत्यानं देखील सरकारवर हल्लाबोल केला होता.
पाकिस्तानमधील लाल मशिदीच्या मौलानांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये मौलाना अब्दुल गाझी हे मशिदीमध्ये आलेल्या लोकांना विचारत आहे की, तुम्ही भारताविरोधात लढणार का? जे भारताविरोधात लढणार आहेत, त्यांनी हात वर करावा, मात्र तिथे असलेली एकही व्यक्ती आपला हात वर करत नाही, त्यानंतर मौलाना या लोकांना उद्देशून म्हणतात की तुम्ही समजदार आहात.
ही सरकारची लढाई आहे
पुढे बोलताना या मौलानांनी म्हटलं की, हे युद्ध धर्माचं युद्ध नाही, ही दोन देशांमधली लढाई आहे. त्यामुळे हे युद्ध सरकारच लढेल. धर्मासाठी लढाई आवश्यक आहे. मात्र दोन्ही देशांमधील या लढाईतून कोणताही फायदा होणार नाही. भारतामध्ये जेवढा मुस्लिमांचा छळ होत नाही, तेवढा पाकिस्तानमध्ये सुरू असल्याचा आरोपही या मौलानानं केला आहे.
दरम्यान दुसरीकडे पाकिस्तानच्या आणखी एका धर्मगुरूंनी भारताला पाठिंबा दिला आहे.खैबर पख्तनख्वामधील इस्लामिक धर्मोपदेशकानं मोठं वक्तव्य केलं आहे. जर भारतानं पाकिस्तानवर हल्ला केला तर आम्ही पश्तून लोक भारतासोबत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता पाकिस्तानला त्यांच्याच देशातून विरोध होत असल्याचं समोर आलं आहे. दुसरीकडे बलुचिस्थानमधील बंडखोर देखील विरोध करत आहेत.
