भारताकडून ब्राह्मोसपेक्षा घातक हायपरसोनिक क्षेपणास्त्राची चाचणी, चीन-पाकिस्तानचे टेन्शन वाढणार
hypersonic missile: ईटी एलडीएचसीएम क्षेपणास्त्र स्क्रॅमजेट इंजिनद्वारे चालवले जाते. ते वातावरणातील ऑक्सिजन वापरते. यामुळे ते प्रचंड वेग आणि लांब पल्ल्याचे अंतर कपाता येते. तसेच कमी उंचीवर उड्डाण करण्याची त्याची क्षमता देखील रडारपासून वाचण्यास मदत करते

भारताच्या ऑपेरशन सिंदूरमध्ये ब्राह्मोस क्षेपणास्त्राने आपली कमाल दाखवली. त्यानंतर जगभरात ब्राह्मोस क्षेपणास्त्राची मागणी वाढली. आता भारताने आणखी एक यश मिळवले आहे. भारताने नवीन हायपरसोनिक क्रूझ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली आहे. या नवीन क्षेपणास्त्राचे नाव एक्सटेंडेड ट्राजेक्टरी लॉन्ग ड्यूरेशन हायपरसोनिक क्रूझ मिसाइल ( ET-LDHCM) आहे. प्रोजेक्ट विष्णू अंतर्गत हे क्षेपणास्त्र तयार करण्यात आले आहे. आवाजाच्या वेगापेक्षा आठ पट जास्त वेगाने 1,500 किलोमीटरपर्यंत मारा हे क्षेपणास्त्र करु शकणार आहे.
ब्राह्मोस क्षेपणास्त्राचे अपग्रेडिंग
जगभरात तणाव वाढत आहे. भारत आणि पाकिस्तान दरम्यान पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर मे महिन्यात संघर्ष झाला होता. त्यावेळी भारताच्या ब्राह्मोस क्षेपणास्त्राने आपली ताकद दाखवून दिली. त्यानंतर भारत आपली लष्करी सामर्थ्य अधिक वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहे. डीआरडीओने हे क्षेपणास्त्र बनवले आहे. हे क्षेपणास्त्र गोपनीयता, अचूकता आणि लवचिकता या तिन्ही बाबतीत अत्यंत प्रगत मानले जाते. भारत आणि पाकिस्तानमधील बिघडलेल्या संबंधांच्या पार्श्वभूमीवर भारत आपली क्षेपणास्त्र प्रणाली आणखी मजबूत करत आहे. यामध्ये ब्राह्मोस, अग्नी-५ आणि आकाश प्रणालींचे अपग्रेडिंगचा समावेश आहे.
काय आहे ईटी एलडीएचसीएमचे वैशिष्ट्ये
नवीन हायपरसोनिक क्षेपणास्त्र ब्राह्मोस क्रूझ क्षेपणास्त्रापेक्षा जास्त वेग आणि अंतर कापण्यास सक्षम आहे. सध्याच्या ब्राह्मोसचा वेग मॅक ३ (सुमारे ३,६७५ किमी/तास) आहे, तर ईटी-एलडीएचसीएम मॅक ८ च्या वेगाने, सुमारे ११,००० किमी/तास वेगाने उड्डाण करू शकतो. ब्राह्मोसची सुरुवातीची मारक क्षमता २९० किलोमीटर होती. त्यानंतर ती वाढवून ४५० किलोमीटर झाली आहे. परंतु ईटी-एलडीएचसीएमची क्षमता १५०० किलोमीटर आहे. त्याच्या टप्प्यात संपूर्ण पाकिस्तान असणार आहे.
ईटी एलडीएचसीएम क्षेपणास्त्र स्क्रॅमजेट इंजिनद्वारे चालवले जाते. ते वातावरणातील ऑक्सिजन वापरते. यामुळे ते प्रचंड वेग आणि लांब पल्ल्याचे अंतर कपाता येते. तसेच कमी उंचीवर उड्डाण करण्याची त्याची क्षमता देखील रडारपासून वाचण्यास मदत करते. हे क्षेपणास्त्र एक हजार ते दोन हजार किलोग्रॅमपर्यंत पेलोड घेऊन जाऊ शकते. तसेच अण्वस्त्र घेऊन जाण्यासाठी ते सक्षम आहे. जमीन, समुद्र आणि हवा या तिन्ही ठिकाणांवरुन ते लॉन्च करता येते. युद्धाच्या वेळी तो आपली दिशासुद्धा बदलू शकतो, ज्यामुळे शत्रूची फसगत होते.
