
देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे वयाच्या 92 व्या वर्षी निधन झाले. गुरूवारी रात्री त्यांची तब्येत अचानक खालवली. त्यानंतर त्यांना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधानानंतर देशात सात दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी शोक व्यक्त केला. पाकिस्तानमधील पंजाब प्रांतात त्यांचे मूळ गाव होते. या गावी जाण्याची त्यांची इच्छा अपूर्णच राहिली.
फाळणीचे भोगले दु:ख
26 सप्टेंबर 1932 रोजी पाकिस्तानमधील पंजाब प्रांतात त्यांचा जन्म झाला होता. त्यांनी फाळणीच्या वेदना सहन केल्या आहे. हक्काची माणसं, हक्काची जमीन सोडून त्यांना अमृतसर येथे यावे लागले. फाळणीपूर्व दंगलीत त्यांना आजी आणि इतर नातेवाईकांचा विरह सहन करावा लागला. लालकृष्ण अडवाणी आणि त्यांची फाळणीने होरपळ केली होती.
गाह गावात जन्म
माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा जन्म पाकिस्तानातील पंजाब प्रांतात असलेल्या गाह या गावात झाला. हे गाव आता चकवाल जिल्ह्यात येते. 2004 मध्ये डॉ. मनमोहन सिंग देशाचे पंतप्रधान झाले होते. त्यावेळी पाकिस्तानमध्ये त्याची सर्वाधिक चर्चा झाली. 2007 मध्ये पाकिस्तानमधील तत्कालीन सरकारने गाह या गावाला आदर्श गाव करण्याचे धोरण जाहीर केले होते. इतकेच नाही तर तिथल्या सरकारी मुलांच्या शाळेला सुद्धा त्यांचे नाव देण्यात आले.
डॉ. मनमोहन सिंग सरकारी मुलांची शाळा
गाह गावात पाकिस्तान सरकारने त्यांच्या सन्मानार्थ शाळेला डॉ. मनमोहन सिंग सरकारी मुलांची शाळा असे नाव दिले. या गावात त्यांचे बालपण गेले होते. या ठिकाणच्या अनेक आठवणी त्यांनी उराशी घट्ट धरलेल्या होत्या. अनेकदा ते या गावातील आठवणीत रमून जात. पंतप्रधान असताना त्यांनी या गावात जाण्याची इच्छा सुद्धा बोलून दाखवली होती. त्यांचे मित्र राजा मोहम्मद अली हे भारतात त्यांना भेटण्यासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी गावी जाण्याची इच्छा व्यक्त केली होती.
गावाकरी देतात धन्यवाद
डॉ. मनमोहन सिंग हे पंतप्रधान झाल्यावर पाकिस्तान सरकारने गाह गावाला आदर्श गाव करण्याचे जाहीर केले. त्यानंतर या गावात अनेक सोयी-सुविधा आल्या. हे गाव आदर्श गाव म्हणून ओळखले जाऊ लागले. गावात पक्का रस्ता, पाण्याची सुविधा, वीज आली. मुला-मुलींसाठी स्वतंत्र शाळा झाली. अनेकांना पक्की घरं मिळाली. मशिदीचे बांधकाम पूर्ण झाले, या सर्वांचा उल्लेख करत गावकरी डॉ. मनमोहन सिंग यांचे आभार मानतात.