
भारतानं पाकिस्तानमध्ये घुसून ऑपरेशन सिंदूर राबवलं, या एअर स्ट्राईकमध्ये पीओके आणि पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले आहेत. पीओकेमधील पाच तर पाकिस्तानातील चार दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर भारतानं हल्ला केला, तसेच त्यानंतर देखील भारतानं पाकिस्तामध्ये घुसून ड्रोन हल्ल्याच्या मदतीनं पाकिस्तानची रडार सिस्टिम उद्ध्वस्त केली आहे. यामध्ये पाकिस्तानला मोठा फटका बसला आहे, पाकिस्तानचं मोठं नुकसान झालं आहे. मात्र दुसरीकडे याचा फटका हा एका बाजुनं भारताला देखील बसल्याचं पाहायला मिळत आहे.
भारतानं पाकिस्तानवर केलेल्या हल्ल्यानंतर शेअर बाजारात कोणतीही घसरण दिसून आलेली नाहीये, मात्र दुसरीकडे भारताच्या करन्सी मार्केटला मात्र जोरदार फटका बसला आहे. विशेष म्हणजे पाकिस्तानी रुपयापेक्षाही डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाच्या किंमतीत घसरण झाली आहे. आकडेवारीवर नजर टाकली तर भारतीय रुपयामध्ये बुधवारी डॉलरच्या तुलनेमध्ये 45 पैशांची घसरण झाली आहे, तर पाकिस्तानी रुपयामध्ये डॉलरच्या तुलनेत 15 पैशांची घसरण झाली.
जाणकारांच्या मते आज रुपयामध्ये सुधारणा पाहायला मिळू शकते, मात्र जर पाकिस्तानने हल्ले सुरूच ठेवले तर रुपयामध्ये पुन्हा एकदा आणखी जास्त घसरण पाहायला मिळू शकते. दोन दिवसांपूर्वी देखील भारतीय रुपयामध्ये 50 पैशांची घसरण झाली होती. त्यानंतर पुन्हा 45 पैशांची घसरण झाली आहे, मात्र त्या तुलनेत पाकिस्तानच्या रुपयाची कमी घसरण झाली आहे. पाकिस्तानच्या रुपयामध्ये डॉलरच्या तुलनेत 13 पैशांची घसरण झाली आहे.
रुपयामध्ये घसरण
बुधवारी भारतीय रुपयामध्ये डॉलरच्या तुलनेत 45 पैशांची घसरण होऊन रुपयाचे मूल्य 84.80 रुपये प्रति डॉलरवर पोहोचले आहे. भारतानं पाकिस्तावर केलेल्या एअर स्ट्राईकनंतर देशांतर्गत चलनावर दबाव पडल्याचं दिसून येत आहे.
पाकिस्तानकडून कुरापती सुरूच
दरम्यान पाकिस्तानकडून कुरापती सुरूच आहेत, गुरुवारी पुन्हा एकदा पाकिस्तानने भारतावर हल्ल्याचा प्रयत्न केला. भारतातील तीन राज्य पंजाब, राजस्थान आणि जम्मू काश्मीर ही तीन राज्य पाकिस्तानच्या टार्गेटवर होती, मात्र भारतीय डिफेंस सिस्टिमनं हे हल्ले परतून लावले आहेत. पाकिस्तान पुन्हा एकदा तोंडावर पडला आहे.