पाकिस्तानला उघडपणे पाठिंबा देणं तुर्कीला भोवलं, आर्थिक नाड्या आवळल्या, व्यापाऱ्यांनी घेतला मोठा निर्णय

तुर्कीनं पाकिस्तानला उघड पाठिंबा दिल्यानंतर आता भारतामध्ये 'बॉयकॉट तुर्की' अभियानाला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्राच्या पुण्यापासून ते राजस्थानच्या उदयपूरपर्यंतच्या व्यापाऱ्यांनी तुर्कीमधून आयात होणाऱ्या वस्तुंवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे.

पाकिस्तानला उघडपणे पाठिंबा देणं तुर्कीला भोवलं, आर्थिक नाड्या आवळल्या, व्यापाऱ्यांनी घेतला मोठा निर्णय
| Updated on: May 14, 2025 | 8:33 PM

पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं ऑपरेशन सिंदूर राबवलं, पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानवर एअर स्ट्राईक करण्यात आला. भारताच्या या हल्ल्यामध्ये 9 दहशतवाद्यांची ठिकाणं उद्ध्वस्त झाले, तसेच 100 पेक्षा अधिक दहशतवादी ठार झाले, भारताच्या या एअर स्ट्राईकनंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव चांगलाच वाढला. पाकिस्तानने भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, मात्र भारतानं हा हल्ला परतून लावला, भारतानं प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानवर केलेल्या हल्ल्यामध्ये त्यांचं मोठं नुकसानं झालं.

दरम्यान पाकिस्तानने भारतावर जो ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न केल्या त्यामध्ये वापरण्यात आलेले जे ड्रोन होते, ते तुर्कीचे असल्याचं समोर आलं आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या हल्ल्यामध्ये पाकिस्तानने 350 हुन जास्त तुर्कीच्या ड्रोनचा वापर केला. याच काळात तुर्कीचं सैन्य देखील पाकिस्तानात होतं, यावरून तुर्कीनं भारत -पाकिस्तान वादात पाकिस्तानला उघड पाठिंबा दिल्याचं स्पष्ट झालं आहे, त्यानंतर आता तुर्कस्थानला धडा शिकवण्यासाठी भारताकडून बहिष्काराचं अस्त्र उगारण्यात आलं आहे.

तुर्कीनं पाकिस्तानला उघड पाठिंबा दिल्यानंतर आता भारतामध्ये ‘बॉयकॉट तुर्की’ अभियानाला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्राच्या पुण्यापासून ते राजस्थानच्या उदयपूरपर्यंतच्या व्यापाऱ्यांनी तुर्कीमधून आयात होणाऱ्या वस्तुंवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे आता तुर्कस्थानची मोठी आर्थिक कोंडी होणार आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार भारतातील व्यापाऱ्यांनी तुर्कस्थानामधून येणाऱ्या सफरचंदावर पूर्णपणे बहिष्कार घातला आहे. दरवर्षी पुण्याच्या फळबाजारात तुर्की सफरचंदांचा वाटा सुमारे 1000 ते 1200 कोटी रुपयांचा असतो, परंतु आता हा व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाला आहे. सफरचंदासोबत तुर्कस्थानमधील इतर वस्तुंवरही भारतीय व्यापाऱ्यांनी बहिष्कार घातला आहे. तुर्कीमधून संगमरवराची आयात देखील थांबली आहे.

तुर्कीने भारत पाकिस्तान वादामध्ये उघडपणे पाकिस्तानला पाठिंबा दिला, याचा त्यांना पर्यटन क्षेत्रात देखील मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. दरवर्षी लाखो भारतीय पर्यटक तुर्कीला भेट देत असतात, मात्र यानंतर आता पर्यटनावर देखील बहिष्कार घातला जाण्याची शक्यता आहे. तुर्कीला व्यापार आणि पर्यटन अशा दोन्ही आघाड्यांवर आता जबरदस्त फटका बसण्याची शक्यता आहे.