Dharmendra Pradhan : अनिश्चितता आणि झपाट्याने बदलणाऱ्या जगात शिक्षण हाच जोडणारा सेतू – शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान

नवी दिल्ली येथे ‘स्टडी इन इंडिया’ कॉन्क्लेव्हमध्ये ५० हून अधिक देशांच्या प्रतिनिधींना संबोधित करताना, राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० प्रेरित भारतीय शिक्षण प्रणालीतील परिवर्तने स्पष्ट केली. गुणवत्ता, नवोपक्रम आणि परवडणाऱ्या शिक्षणावर भारताचा भर आहे. शिक्षण आंतरराष्ट्रीयीकरणाच्या माध्यमातून विद्यार्थी, संशोधकांसाठी जागतिक संधी निर्माण करत विकसित भारताच्या दिशेने भागीदारीचे आवाहन करण्यात आले.

Dharmendra Pradhan : अनिश्चितता आणि झपाट्याने बदलणाऱ्या जगात शिक्षण हाच जोडणारा सेतू - शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान
शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान
Image Credit source: twitter
| Updated on: Mar 02, 2026 | 2:33 PM

नवी दिल्ली येथे ‘स्टडी इन इंडिया’ एज्यु-डिप्लोमॅटिक कॉन्क्लेव्ह आयोजित करण्यात आलं आहे. या कनक्लेव्हमध्ये शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी 50 हून अधिक देशांतील मान्यवर, उच्चायुक्त आणि राजनैतिक प्रतिनिधींना संबोधित केलं.  राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 (National Education Policy 2020) प्रेरणेने भारतीय शिक्षण व्यवस्थेत घडत असलेल्या आमूलाग्र परिवर्तनाबाबत, शिक्षणाच्या आंतरराष्ट्रीयीकरणाच्या दिशेने घेतल्या जात असलेल्या भव्य झेपांविषयी, तसेच गुणवत्तेला, नवोपक्रमांना आणि परवडणाऱ्या शिक्षणाला भारत देत असलेल्या प्राधान्याविषयी त्यांनी त्यांचे विचार मांडले.

काय म्हणाले शिक्षणमंत्री ?

मा. पंतप्रधान Narendra Modi यांनी 2047 मध्ये स्वातंत्र्याच्या शताब्दी वर्षापर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनविण्याचा दूरदर्शी संकल्प मांडला आहे. आजच्या जागतिक आर्थिक परिदृश्यात भारत एक उज्ज्वल केंद्रबिंदू म्हणून उभा आहे आणि शिक्षण, संशोधन, नवोपक्रम व अंमलबजावणीसाठी व्यापक संधी उपलब्ध करून देत आहे. भारताची सर्वात मोठी ताकद म्हणजे त्याची सशक्त ज्ञानव्यवस्था, लोकसंख्येचा लाभ (Demographic Dividend) आणि वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था. राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 आणि ‘स्टडी इन इंडिया’ उपक्रमाच्या माध्यमातून आम्ही विद्यार्थी, संशोधक आणि शैक्षणिक संस्थांसाठी जागतिक संधींचे नवे मार्ग खुले करत आहोत,असं त्यांनी नमूद केलं.

 

 

कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), जैवतंत्रज्ञान (biotech), सेमीकंडक्टर्सपासून शाश्वत ऊर्जेपर्यंतच्या विविध क्षेत्रांत भारत विश्वासार्ह नवोपक्रम भागीदार म्हणून उदयास येत आहे — सहकार्य, क्षमतावृद्धी आणि ज्ञानसामायिकरणावर आधारित ‘ग्लोबल साउथ’ मॉडेलला पुढे नेत आहे, असंही ते म्हणाले.

शिक्षण हा समाजांना जोडणारा सर्वात टिकाऊ सेतू

अनिश्चितता आणि झपाट्याने होणाऱ्या बदलांनी व्यापलेल्या या जगात, शिक्षण हा समाजांना जोडणारा सर्वात टिकाऊ सेतू आहे असे म्हणत भारताला इतर देशांसोबत ज्ञानाचा सेतू उभारायचा आहे असं प्रधान यांनी नमूद केलं. तसेच उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांना, भारताच्या वेगाने प्रगती करणाऱ्या, नवोपक्रमप्रधान, बहुविषयक आणि सर्वांसाठी सुलभ अशा शिक्षण व्यवस्थेसोबत भागीदारी करण्याचे आवाहन त्यांनी केलं.

 

 

Follow Us