
इंडिगो विमानकंपनीचा सावळा गोंधळ अद्याप सुरूच असून देशातील अनेक विमानतळांवर IndiGo ची उड्डाणं पूर्ववत झालेली नाहीत. त्यामुळे अजूनही विमान उड्डाणांना विलंब आणि अनेक फ्लाईट्स रद्द होण्याचा सिलसिला कायम आहे. सलग सातव्या दिवशीही मोठ्या प्रमाणात उड्डाणे रद्द करण्याचे प्रकार सुरूच राहिले, ज्यामुळे इंडिगोचे प्रवासी प्रमुख विमानतळांवर अडकून पडल्याचे दिसत आहे. भारतातील हवाई प्रवासाच्या इतिहासात या संकटाची तीव्रता अभूतपूर्व असून अनेकांना मोठा फटका बसला आहे .
सोमवारी विविध विमानतळांवर इंडिगोच्या सुमारे 450 उड्डाणं रद्द करण्यात आली. दिल्ली विमानतळावर आज 134 उड्डाणे (75 निर्गमन आणि 59 आगमन) रद्द करण्यात आली. बेंगळुरू विमानतळावर 127 उड्डाणे रद्द झाली. तर अहमदाबादमध्ये 20 आणि विशाखापट्टणममध्ये 7 उड्डाणं रद्द झाली. मुंबई आणि कोलकातासह प्रमुख विमानतळांवरही मोठ्या प्रमाणात गोंधळ उडाला. सकाळी 9:30 वाजेपर्यंत एकूण 289 उड्डाणे रद्द झाल्याची माहिती समोर आली होती.
देशातील सर्वात मोठ्या विमान कंपनीन असलेल्या इंडिगोने रविवारी 650 हून अधिक उड्डाणे रद्द केली होती, मात्र दोन दिवसांपूर्वी रद्द झालेल्या 1000 उड्डाणांपेक्षा ही संख्या तशी कमीच आहे.
610 कोटींचा रिफंड
इंडिगोच्या या गोंधळामुळे अनेक प्रवाशांना मोठा पटका बसला असून अनेकांचे नुकसान झाले आहे. अधिकाऱ्यांच्या सांगण्यानुसार, बाधित प्रवाशांना 610 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचा तिकिट रिफंड देण्यात आला आहे.
दिल्ली एअरपोर्टची ॲडव्हायजरी जारी
दरम्यान, दिल्ली विमानतळाने (IGI) प्रवाशांना विमानतळावर येण्यापूर्वी त्यांच्या विमानांची लेटेस्ट स्थिती तपासण्याचा सल्ला दिला आहे. “इंडिगोच्या विमानांना अजूनही विलंब होऊ शकतो. प्रवाशांना विनंती आहे की कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी त्यांनी विमानतळावर येण्यापूर्वी त्यांच्या विमान कंपनीकडून ताजा फ्लाइट स्टेटस तपासावे. प्रवाशांना प्रवासात कमी व्यत्यय यावा यासाठी आणि सुरळीत प्रवास अनुभव सुनिश्चित करण्यासाठी आमची टीम सर्व संबंधितांशी जवळून काम करत आहे” असे विमानतळातर्फे सांगण्यात आलं .
मुंबई विमानतळावर आज सकाळी इंडिगोच्या रद्द झालेल्या विमानांची माहिती
आत्तापर्यंत रद्द झालेली उड्डाणं –
1. मुंबई ते गोवा
2. मुंबई ते दरभंगा
3. मुंबई ते हैदराबाद
4. मुंबई ते कोलकाता
5. मुंबई ते भुवनेश्वर
तथापि, कालच्या तुलनेत, आज जास्त उड्डाणे होत आहेत..
वेळेवर उडणारी, चेक इन होणारी विमानं –
1. मुंबई ते दिल्ली
2. मुंबई ते जबलपुर
3. मुंबई ते कोच्चि
4. मुंबई ते अहमदाबाद
5. मुंबई ते कन्नूर
6. मुंबई ते हिंडन
7. मुंबई ते चेन्नई
8. मुंबई ते कोईंबतूर
9. मुंबई ते प्रयागराज
10. मुंबई ते पाटणा
11. मुंबई ते कानपुर
12. मुंबई ते हैदराबाद
13. मुंबई ते बंगळुरू
14. मुंबई ते गोरखपुर
15. मुंबई ते कालीकट
इंडिगोच्या आंतरराष्ट्रीय उड्डाणे देखील जवळपास वेळेवर सुरू आहेत.