इंदिरा गांधी संविधान बदलणार होत्या…, भाजप प्रवक्ते प्रदीप भंडारी यांचा आरोप

माजी पंतप्रधान इंदिरा गांधी संविधानात मूलभूत बदल करणार होत्या. भारतातील लोक आणि लोकशाहीला धन्यवाद, आपण काँग्रेसच्या नेतृत्वाखालील पूर्ण हुकूमशाहीतून थोडक्यात बचावलो, असे भाजपने म्हटले आहे.

इंदिरा गांधी संविधान बदलणार होत्या..., भाजप प्रवक्ते प्रदीप भंडारी यांचा आरोप
Indira Gandhi
| Updated on: Jun 28, 2025 | 12:13 PM

भारतीय जनता पक्षाकडून माजी पंतप्रधान आणि काँग्रेस नेत्या इंदिरा गांधी यांच्यावर टीका करण्यात येत आहे. दोन दिवसांपूर्वी इंदिरा गांधी यांना आणीबाणीवरुन घेरल्यानंतर पुन्हा भाजपने इंदिरा गांधी यांना निशाणा केला आहे. भाजप प्रवक्ते प्रदीप भंडारी यांनी सोशल मीडिया हँडल X वर जुन्या वर्तमानपत्रातील बातमी शेअर केला आहे. यासोबत त्यांनी लिहिले की, इंदिरा गांधींनी भारतीय संविधानाचा आत्मा पुन्हा लिहिण्याचा प्रयत्न केला.

माधव भंडारी यांनी टाइम्स ऑफ इंडियामधील जुनी बातमी शेअर केली आहे. त्या बातमीचा मथळा होता, इंदिरा गांधी यांना संविधानात मूलभूत बदल करायचे आहेत. ही अफवा नाही. ३० डिसेंबर १९७५ च्या टाइम्स ऑफ इंडियाचे हे पान आहे, असे भंडारी यांनी म्हटले आहे. पुढे त्यांनी म्हटले की, इंदिरा गांधी यांच्या हुकूमशाहीच्या महत्त्वाकांक्षा ही बातमी उघड करते. भारतातील लोक आणि लोकशाहीला धन्यवाद, आपण काँग्रेसच्या नेतृत्वाखालील पूर्ण हुकूमशाहीतून थोडक्यात बचावलो.

आणीबाणीवरुन टीका

यापूर्वी २५ जून १९७५ रोजी लावलेल्या आणीबाणीच्या ५० व्या वर्धापन दिनानिमित्त प्रदीप भंडारी यांनी इंदिरा गांधींवर जोरदार हल्ला चढवला होता. त्यांनी इंदिरा गांधींना राज्य घटना आणि लोकशाहीची जाणीवपूर्वक हत्या केल्याबद्दल जबाबदार धरले होते. त्यांनी म्हटले होते की, ५० वर्षांपूर्वी गांधी-वड्रा कुटुंबाने म्हणजेच काँग्रेस पक्षाने संविधानाची हत्या केली. सत्तेत राहण्यासाठी त्यांनी लोकशाहीचा नाश केला. गेल्या ५० वर्षांत काँग्रेसने आणीबाणी लादल्याबद्दल एकदाही देशातील जनतेची माफी मागितलेली नाही. हा असा काळ होता जेव्हा जनतेते काय बोलायचे आणि काय बोलायचे नाही, हे काँग्रेस पक्ष ठरवत होते.

भंडारी यांनी म्हटले होते की, ५० वर्षांपूर्वी इंदिरा गांधी यांनी आणीबाणी लावली. लोकशाहीची हत्या केली. लाखो लोकांना कारागृहात डांबले. त्यात शेकडो पत्रकार होते. त्या पत्रकारांनी सरकारविरोधात सत्य लिहिण्याचे धाडस केले होते. इतिहासातील हा अध्याय कोणताही भारतीय विसरणार नाही. त्या काळात लोकांची जबरदस्तीने नसबंदी केली जात होती. लोकांचा आवाज दाबला जात होता. संस्थांवर ताबा मिळवण्यात आला होता.