INS Karanj : कलवरी श्रेणीतील INS करंज पाणबुडी नौदलाच्या सेवेत दाखल

| Updated on: Mar 10, 2021 | 10:06 PM

फ्रान्सच्या मे.नेव्हल ग्रुप या कंपनीच्या संयुक्त सहभागाने भारतात माझगाव डॉक शिपबिल्डर्स (मर्या.) या मुंबईतील कंपनीतर्फे स्कॉर्पिन श्रेणीतील एकूण 6 पाणबुड्यांची निर्मिती केली जात आहे.

INS Karanj : कलवरी श्रेणीतील INS करंज पाणबुडी नौदलाच्या सेवेत दाखल
Follow us on

मुंबई : भारतीय नौदलासाठी स्कॉर्पिन प्रकारची तिसरी पाणबुडी आयएनएस करंज बुधवारी मुंबईच्या नौदल गोदीत झालेल्या औपचारिक कार्यक्रमात नौदलाच्या सेवेत दाखल झाली. फ्रान्सच्या मे.नेव्हल ग्रुप या कंपनीच्या संयुक्त सहभागाने भारतात माझगाव डॉक शिपबिल्डर्स (मर्या.) या मुंबईतील कंपनीतर्फे स्कॉर्पिन श्रेणीतील एकूण 6 पाणबुड्यांची निर्मिती केली जात आहे. आय.एन.एस. करंज ही पाणबुडी पश्चिमी नौदल कमांड ताफ्याचा भाग असेल आणि कमांडच्या शस्त्रास्त्रांचा आणखी एक अत्यंत शक्तिशाली विभाग म्हणून काम करेल.(INS Kalwari class INS Karanj submarine enlisted in Indian Navy)

नौदल प्रमुख अ‍ॅडमिरल करमबीर सिंग तसेच भारतीय नौदल आणि संरक्षण मंत्रालयाचे अनेक वरिष्ठ अधिकारी यांच्यासह अनेक मान्यवर या समारंभाला उपस्थित होते. 1971 च्या भारत- पाकिस्तान युद्धादरम्यान कमांडिंग ऑफिसर असलेले, माजी नौदलप्रमुख अ‍ॅडमिरल व्ही.एस.शेखावत , परम विशिष्ट सेवा पदक, अति विशिष्ट सेवा पदक, वीरचक्र , (निवृत्त) या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.

स्वदेशीकरण आणि आत्मनिर्भरता

यापूर्वीची करंज ही रशियन बनावटीची फॉक्सट्रॉट प्रकारची पाणबुडी 2003 साली सेवेतून निवृत्त करण्यात आली होती. त्या पाणबुडीचा सर्व कर्मचारीवर्ग या समारंभाला विशेष आमंत्रित म्हणून उपस्थित होता. स्वदेशीकरण आणि आत्मनिर्भरता ही भारतीय नौदलाच्या विकासाची आणि भविष्यकालीन कार्यशक्तीची मुलभूत तत्वे आहेत, असं नौदल प्रमुख अ‍ॅडमिरल करमबीर सिंग यांनी त्यांच्या भाषणात बोलताना सांगितलं.

प्रमुख पाहुणे माजी नौदलप्रमुख अ‍ॅडमिरल शेखावत यांनी भारताच्या आत्मनिर्भरतेच्या दिशेने सुरु असलेल्या प्रवासाचा देखील ठळकपणे उल्लेख केला. आपण आता अनेक उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण करणाऱ्या, आण्विक पाणबुड्यांची सक्षमतेने उभारणी करणाऱ्या आणि संपूर्ण जगासाठी लस निर्मिती करणाऱ्या भारतात राहतो. करंज ही नवी पाणबुडी हे त्याचे आणखी एक उदाहरण आहे, असं अ‍ॅडमिरल शेखावत म्हणाले.

कमांडर व्ही.एस.शेखावत यांना वीरचक्र

1971 साली झालेल्या भारत-पाकिस्तान युद्धाला 50 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त हे वर्ष ‘स्वर्णिम विजय वर्ष’ म्हणून साजरे केले जात आहे. पूर्वीच्या रशियन महासंघातील रिगा येथे 4 सप्टेंबर 1969 ला नौदलाच्या सेवेत रुजू झालेल्या जुन्या आयएनएस करंज पाणबुडीने देखील तत्कालीन कमांडर व्ही.एस. शेखावत यांच्या अधिपत्याखाली या युद्धात सक्रीय सहभाग घेतला होता. त्या पाणबुडीच्या अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी बजावलेल्या धाडसी कामगिरीबद्दल त्यांना अनेक सन्मान प्रदान करण्यात आले. तत्कालीन कमांडिंग अधिकारी कमांडर व्ही.एस.शेखावत यांना वीरचक्र देऊन सन्मानित करण्यात आले. विशेष म्हणजे, जुन्या आय.एन.एस. करंज या पाणबुडीचे कमांडिंग अधिकारी कमांडर एम.एन.आर. सामंत यांनी नंतरच्या काळात 1971 मध्ये नव्याने स्थापन झालेल्या बांगलादेश नौदलाचे प्रमुख पद भूषविले.

स्कॉर्पिन पाणबुड्यांचं वैशिष्ट्यं

स्कॉर्पिन प्रकारच्या पाणबुड्या जगातील पारंपरिक प्रकारच्या पाणबुड्यांतील सर्वात आधुनिक पाणबुड्या आहेत. या पाणबुड्यांमध्ये जगातील अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरले असून त्या याच प्रकारच्या याआधी कार्यरत असलेल्या पाणबुड्यांपेक्षा अत्याधिक घातक आणि उत्तम कामगिरी करणाऱ्या आहेत. समुद्राच्या पाण्यावरील तसेच पाण्याखालील कोणत्याही प्रकारच्या आव्हानाशी सामना करण्यासाठी या पाणबुड्या शक्तिशाली शस्त्रास्त्रे आणि संवेदकांनी सुसज्जित आहेत.

इतर बातम्या : 

Weather Forecast: राज्यात तापमानाचा पारा वाढणार; तर इतर काही राज्यांमध्ये अवकाळीची शक्यता

नॅशनल डिफेन्स अकॅडमीमध्ये महिलांना प्रवेश का नाही?, सुप्रीम कोर्टाची केंद्राला नोटीस

INS Kalwari class INS Karanj submarine enlisted in Indian Navy