
इराण आणि इस्रायलमध्ये सुरू असलेल्या युद्धाचे तीव्र पडसाद आता जागतिक पातळीवर पडत असल्याचे पाहायला मिळत आहे. या युद्धामुळे जगभरातील विमान वाहतूक विस्कळीत झाली आहे. अमेरिका आणि इस्रायलने इराणवर संयुक्त लष्करी कारवाई केल्यानंतर अनेक आखाती देशांनी सुरक्षिततेच्या कारणास्तव आपले हवाई क्षेत्र (Airspace) तात्पुरते बंद केले आहे. यामुळे जगभरातील प्रमुख विमानतळांवरील १ हजाराहून अधिक उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. परिणामी सध्या विमानतळांवर हजारो प्रवासी अडकून पडले आहेत.
नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता प्रवाशांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे. काल शनिवारी अंदाजे ४४४ विमानांचे उड्डाणे रद्द करण्यात आले होते. सध्या ऑपरेशनल नियमांचे पालन सुनिश्चित करण्यासाठी नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (DGCA) विमान कंपन्यांशी समन्वय साधत आहे. आम्ही सध्या या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत.
भारतातील प्रमुख विमानतळांवर उड्डाणे रद्द झाल्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. दिल्ली विमानतळ अनेक प्रवासी १४ तासांहून अधिक काळ विमानतळावर अडकून पडले आहेत. सौदी अरेबियाला जाणारे प्रवासी विमान सेवा रद्द झाल्यामुळे हवालदिल झाले आहेत. तर दुसरीकडे मुंबई विमानतळावरुन अमेरिका आणि युरोपला जाणारी उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. बहरीनमार्गे अमेरिकेला जाणारे प्रवासी रीबुकिंगबाबत माहिती न मिळाल्याने संभ्रमात आहेत. तसेच मुंबईहून मक्का-मदीनाला उमरासाठी जाणारे प्रवासीही अडकले आहेत.
यासोबतच बेंगळुरूच्या केम्पेगौडा विमानतळावरून अबू धाबी, बहरीन आणि इटलीला जाणारे प्रवासी खोळंबले आहेत. तर कोलकाता विमानतळावरून दोहा, दुबई आणि अबू धाबीकडे जाणारी विमाने ठप्प झाली आहेत. त्यासोबतच दुबई विमानतळावर कर्नाटकचे आमदारही अडकले आहेत. अनेक विमानतळावरील वाहतूक ठप्प झाल्याचा थेट परिणाम तिकीट दरांवर झाला आहे. अनेक विमानांच्या तिकीटांचे दर हे विक्रमी पातळीवर पोहोचले आहेत. भारतातून लंडनला जाणाऱ्या विमानाचे तिकीट दीड लाख रुपयांवर पोहोचले आहे. त्यामुळे प्रवाशांना मोठा आर्थिक फटका बसत आहे.
दिल्ली, मुंबई आणि अमृतसरहून लंडन, न्यूयॉर्क, शिकागो, टोरंटो, फ्रँकफर्ट आणि पॅरिसला जाणारी आजची एअर इंडियाची सर्व उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. एअर इंडियाने अडकलेल्या भारतीय कर्मचाऱ्यांना सुखरूप बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. तर दुसरीकडे इंडिगोनेही पश्चिम आशिया आणि काही आंतरराष्ट्रीय क्षेत्रांतील उड्डाणे रद्द करण्यात निर्णय घेतला आहे. याचा परिणाम मुंबई-लंडन सेवेवरही झाला आहे.
इराण, इस्रायल, इराक, युएई, जॉर्डन आणि सीरियाने सुरक्षिततेसाठी हवाई क्षेत्र बंद केल्यामुळे दुबई, अबू धाबी आणि दोहा यांसारख्या जगातील सर्वात मोठ्या विमान वाहतूक केंद्रांमधील कामकाज थांबले आहे. यामुळे प्रवाशांनी घराबाहेर पडण्यापूर्वी विमान कंपनीशी संपर्क साधून आपल्या फ्लाइटची सद्यस्थिती तपासावी. त्यानंतरच घराबाहेर पडावे, असा सल्ला नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने दिला आहे.