नोकराकडूनच मुलीवर बलात्कार आणि हत्या, ‘त्या’ चुकीमुळे IRS अधिकाऱ्याचं आयुष्य उद्ध्वस्त !
दिल्लीतील IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर बलात्कार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेमुळे सुरक्षेबाबत गंभीर प्रश्निचिन्ह उपस्थित झालं आहे. एकेकाळी घारत काम करणाऱ्या नोकरानेच हा भयानक गुन्हा केला, ज्यामुळे IRS अधिकाऱ्याचा आयुष्य उद्ध्वस्त झालं. त्याची एक चूक भयानक महागात पडली.

Delhi News: घरात काम करणारे मदतनीस हे आपल्या दैनंदिन आयुष्याचा एक अविभाज्य भाग झाले आहेत. ते घरच्या कामात आपली मदत करत, ज्यामुळे आयुष्य सुकर होतं. पण कळत नकळत आपण त्यांच्यावर गरजेपेक्षा जास्त विश्वास ठेवायला लागतो आणि कधीकधी तर घरातील महत्वाची, गोपनीय माहितीही त्यांना सांगून बसतो, पण हेच पुढे अतिशय तापदायक ठरू शकतं.
चोरी, दरोडा किंना इतर गुन्हेगारी घटनांमध्ये अंतर्गत माहितीचा गैरवापर झाल्याचं अनेकदा दिसून येतं. आपल्या घरात कोण येतं-जातं, घर कधी रिकामं असते आणि मौल्यवान वस्तू कुठे ठेवल्या आहेत—ही सर्व माहिती जर चुकीच्या लोकांच्या हातात पडली, तर मोठा धोका निर्माण होऊ शकतो. दिल्लीतील अमर कॉलनी परिसरात राहणाऱ्या एका आयआरएस अधिकाऱ्यासोबत नेमकं हेच घडलं आणि काही क्षणात त्याचं आयुष्य उद्ध्वस्त झालं.
IRS अधिकाऱ्याला ती चूक पडली भारी
दिल्लीत राहणाऱ्या त्या आयआरएस अधिकाऱ्याच्या चुकीमुळे अख्खं आयुष्य पालटलं, त्याची सर्वात मौल्यवान गोष्ट, त्याच्या आयुष्याच्या अविभाज्य भाग असलेली त्याची लाडकी मुलगी काळाने हिरावून घेतली. जी आता त्याला कधीही परत मिळणार नाही. या अधिकाऱ्याच्या घरात काम करणारा, माजी नोकर, राहुल मीना याने त्याच अधिकाऱ्याच्या घरात घुसून त्याच्या 22 वर्षांच्या मुलीवर बलात्कार केला आणि नंतर चार्जर केबलने गळा दाबून तिचा खून केला. या घटनेआधी नोकर राहुल मीना हा जवळपास एक वर्ष त्या आयआरएस अधिकाऱ्यासोबत घरात राहत होता. मात्र अवघ्या दोन महिन्यांपूर्वीच त्याला नोकरीवरून काढून टाकण्यात आलं होतं.
मात्र वर्षभरापासून त्या अधिकाऱ्याच्या घरात राहिल्यामुळे, काम केल्यामुळे आरोपी राहुलला तिथली खडानखडा माहिती होती. घराच्या चाव्या कुठे ठेवलेल्या असतात, त्या अधिकाऱ्याच्या येण्या-जाण्याच्या वेळा, ते जोडपं बाहेर फिरायला कधी जातं, आणि कोणत्या वस्तू कुठे ठेवल्या होत्या… हे सगळं त्याला नीट माहीत होतं. सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे, आरोपी राहुल मीनाला नोकरीवरून काढून टाकल्यानंतर, त्याच्या गैरकृत्यांची पूर्ण कल्पना असूनही, त्या आयआरएस अधिकाऱ्याने कोणतीही खबरदारी घेतली नाही.
नोकरीवरून का काढलं ?
वर्षभर नोकरी करणाऱ्या राहुलला अचानक कामावरून का काढून टाकलं, तर त्याला कारण होतं त्याचा स्वभाव, त्याचे गुन्हे. त्या अधिकाऱ्याच्या घरी येणाऱ्या वस्तूंसाठीजे पैसै वापरले जायचे, त्यामध्ये राहुलने अफरातफरी केली होती. त्याच्या गैरकृत्यांबद्दल आयआरएस अधिकाऱ्याच्या कुटुंबीयांना समजल, आणि म्हणूनच त्यांनी त्याला कामावरून काढून टाकलं. मात्र नंतर त्यांनी कोणतीही काळजी घेतली नाही. त्या अधिकाऱ्याने जर अधिक खबरदारी घेतली असती, तर घरात घुसून मुलीवर अत्याचार आणि खून अशी गंभीर घटना कदाचित घडली नसती. त्या अधिकाऱ्यांने तर घरातील चाव्या जिथे ठेवण्यात येत होत्या, त्याची जागासुद्धा बदलली नव्हती.
चावीची जागा राहुलला माहीत होती
हीच गोष्ट राहुलच्या पथ्यावर पडली. कारण तो घरात का करत होता, तेव्हा घराच्या चाव्या कुठे ठेवतात हे त्याला माहीत होतं. राहुलला कामावरून काढून टाकल्यानंतरही चाव्यांची जागा न बदलता तीच ठेवण्यात आली आणि हीच त्या अधिकाऱ्याची सर्वात मोठी चूक ठरली. गेल्या बुधवारी सकाळी, राहुलने शू रॅकमध्ये ठेवलेल्या चावीने घर उघडले आणि तो आत शिरला. त्या अधिकाऱ्याची 22 वर्षीय मुलगी घरात एकटीच होती. राहुलने आधी तिच्यावर बलात्कार केला, त्यानंतर चार्जरने तिचा गळा दाबून खून केला. यानंतर, त्याच घरात ठेवलेले अडीच लाख रुपये घेऊन राहुल फरार झाला.
शिफारशीमुळे मिळाली नोकरी
या प्रकरणाचा तपास करताना असं समोर आलं की रोपी राहुल मीनाचे वडील हे पीडितेच्या वडिलांच्या (जे एक आयआरएस अधिकारी होते) कार्यालयात काम करत होते. याच ओळखीमुळे काही काळापूर्वी राहुलला त्या अधिकाऱ्याच्या घरी कामावर ठेवण्यात आले होते. मात्र, आर्थिक गैरव्यवहार आणि पैसे उधार घेतल्याच्या आरोपानंतर त्याला कामावरून काढून टाकण्यात आले.
ऑनलाइन लुडोचं व्यसन आणि कर्ज
नोकरीवरून काढून टाकण्यात आल्यानंतर गेल्या दीड महिन्यापासून राहुल त्याच्या गावात राहत होता आणि मित्रांसोबत ऑनलाइन लुडो खेळताना पैशांची पैज लावायचा. हा गुन्हा करण्यापूर्वी तो एका लग्नाला गेला होता आणि तिथे पैशांच्या व्यवहारावरून वाद निर्माण झाला. कर्ज आणि दबावामुळे तो चोरी करण्याच्या उद्देशाने दिल्लीला आला असावा, असं कुटुंबातील सदस्य आणि शेजाऱ्यांचं म्हणणं आहे.
हा गुन्हा केल्यानंतर आरोपी राहुल हा दिल्लीतील टॅक्सी चालक असलेल्या त्याच्या काकांकडे गेला असावा, असा पोलिसांना संशय आहे. सध्या या बाजूनेही पोलिसांकडून तपास सुरू आहे. दरम्यान, राहुल मीनाला गुरुवारी न्यायालयात हजर करण्यात आले, जिथे त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. आरोपीची चौकशी सुरू असून प्रकरणाच्या इतर पैलूंचाही सखोल तपास केला जात आहे. भविष्यात आणखी खुलासे होण्याची शक्यता आहे, असं दिल्ली पोलिसांचे म्हणणं आहे.