मोठ्या दहशतवादी हल्ल्याचा कट, ट्रेनिंगसाठी तरुणांना पाठवलं पाकिस्तानात; शहजादबद्दल धक्कादायक खुलासे
शहजाद हा भारतात मोठ्या दहशतवादी हल्ल्याचा कट रचत होता, असं तपासात उघड झालं आहे. त्याने अनेक तरुणांना पाकिस्तानमध्ये प्रशिक्षणासाठी पाठवलं होतं. एटीएसने या मोठ्या कटाचा पर्दाफाश केला आहे.

उत्तर प्रदेशच्या दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) एका मोठ्या कटाचा पर्दाफाश केला आहे. मुरादाबाद इथून अटक केलेल्या शहजाद नावाच्या व्यक्तीबद्दल त्यांनी खळबळजनक खुलासा केला आहे. शहजाद भारतात मोठ्या दहशतवादी हल्ल्याचा कट रचत होता, असं तपासात उघड झालं आहे. गुप्तचर यंत्रणांना याची माहिती मिळाल्यावर त्यांनी त्याच्यावर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली आणि अखेर त्याला अटक करण्यात आली आहे. एटीएसच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शहजाद या कटात एकटाच काम करत नव्हता. त्याने रामपूरमधील अनेक तरुणांना पाकिस्तानात पाठवलं होतं. तिथे त्यांना हेरगिरी आणि विध्वंसक कारवायांचं प्रशिक्षण देण्यात आलं होतं. सर्वांत धक्कादायक गोष्ट म्हणजे या तरुणांसाठी व्हिसाची व्यवस्था शहजादने स्वत: केली होती. त्यासाठी पाकिस्तानच्या गुप्तचर संस्थेच्या (ISI) एजंट्सची थेट मदत घेण्यात आली होती.
शहजाद ISI च्या संपर्कात
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे व्हिसा नवी दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्तालयामार्फत जारी करण्यात आले होते. शहजाद हा दानिश नावाच्या आयएसआय एजंटच्या संपर्कात होता. दानिश हा उच्चायुक्तालयात काम करत होता आणि व्हिसा मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावत होता. पाकिस्तानसाठी हेरगिरीच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या हरियाणाच्या ज्योती मल्होत्राला पाकिस्तानात पाठवण्याच्या प्रकरणातही दानिशचं नाव समोर आलं होतं. तपासात अशीही बाब समोर आली आहे की शहजाद यापूर्वी आयएसआयच्या संपर्कात आला होता. नंतर व्हॉट्सअॅपसारख्या एन्क्रिप्टेड माध्यमांद्वारे संभाषणं सुरू राहिली. आयएसआय एजंट्सनी शहजादला भारतातून संवेदनशील माहिती पाठविण्याची सूचना केली होती. जेणेकरून दहशतवादी घटना घडवून आणता येतील आणि देशात अशांतता पसरवता येईल.
तरुणांना पाठवलं पाकिस्तानात
शहजादने अत्यंत हुशारीने रामपूरमधील काही तरुणांना त्याच्या नेटवर्कमध्ये समाविष्ट केलं. सौंदर्यप्रसाधनं, बनावट दागिने आणि महिलांच्या कपड्यांच्या तस्करीसारख्या कामांमध्ये त्यांना सहभागी करून कायदेशील व्यवसाय चालवण्याचं नाटक केलं. हळूहळू त्यांना मानसिकदृष्ट्या तयार केल्यानंतर शहजादने त्यांना पाकिस्तानला पाठवण्याची व्यवस्था केली. या तरुणांना पाकिस्तानमध्ये कट्टरपंथी प्रशिक्षण देण्यात आलं होतं. भारतात माहिती आणि पैशाच्या व्यवहारासाठी त्यांचा वापर करण्यात आला होता, असा एटीएसला संशय आहे. पाकिस्तानमधून येणारा पैसा देशात फुटीरतावादी आणि विद्ध्वंसक कारवायांना चालना देण्यासाठी खर्च केला जात होता का, याचाही तपास सुरू आहे.




या नेटवर्कशी संबंधित इतर आयएसआय एजंट्सची माहिती मिळविण्यासाठी शहजादची आता न्यायालयीन कोठडीत चौकशी केली जात आहे. त्याला कोणाकडून किती पैसे मिळाले आणि कोणाला दिले हे जाणून घेण्यासाठी त्याच्या मोबाइल फोन आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांची फॉरेन्सिक तपासणी केली जात आहे.