2019 साली जेटलींचे निधन, 2020 साली कृषी कायदे आले, मग जेटलींनी तुम्हाला कसं धमकावलं? भाजपचा राहुल गांधींना सवाल

राहुल गांधी यांनी भाजपचे दिवंगत नेते अरुण जेटलींबाबत मोठं विधान केलं होतं. मी कृषी कायद्यांविरुद्ध लढत होतो त्यावेळी अरुण जेटलीजींनी मला धमकावले होते असं त्यांनी म्हटलं होत, यावरून आता राजकारण तापले आहे.

2019 साली जेटलींचे निधन, 2020 साली कृषी कायदे आले, मग जेटलींनी तुम्हाला कसं धमकावलं? भाजपचा राहुल गांधींना सवाल
Rahul Gandhi
| Updated on: Aug 02, 2025 | 4:02 PM

काँग्रेसचे खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी दिल्लीत एका परिषदेत वकिलांना संबोधित केले. यावेळी राहुल गांधी यांनी भाजपचे दिवंगत नेते अरुण जेटलींबाबत मोठं विधान केलं होतं. मी कृषी कायद्यांविरुद्ध लढत होतो त्यावेळी अरुण जेटलीजींना मला धमकावण्यासाठी पाठवण्यात आले होते असा आरोप राहुल गांधींनी केला आहे.

राहुल गांधी याबाबत बोलताना म्हणाले की, मला जेटलींनी थेट सांगितले की जर तुम्ही कृषी कायद्यांना करत असलेला विरोध थांबवला नाही तर तुमच्याविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल. त्यानंतर मी त्यांच्याकडे पाहिलं आणि म्हटलं की, कदाचित तुम्हाला माहित नाही की तुम्ही कोणाशी बोलत आहात?’

राहुल गांधींच्या या विधानावर दिल्ली सरकारचे मंत्री मनजिंदर सिंग सिरसा यांची भाष्य केलं आहे. सिरसा म्हणाले की, राहुल गांधी खालच्या पातळीचे राजकारण करत आहेत. अरुण जेटलीजींसारख्या नेत्याचे नाव कृषी कायद्यांशी जोडणे हे खोटे आहे, हा देशाचा अपमान आहे. जेटलीजी यांनी प्रामाणिकपणे देशाची सेवा केली. त्यांच्यावर असे आरोप केल्याबद्दल राहुल गांधी यांनी माफी मागायला हवी.

रोहन जेटलींचेही प्रत्युत्तर

राहुल गांधींच्या आरोपावर अरुण जेटली यांचे पुत्र रोहन जेटली यांनीही भाष्य केलं आहे. जेटली म्हणाले की, ‘राहुल गांधींनी माझे दिवंगत वडील अरुण जेटली यांनी कृषी कायद्यांवरून धमकी दिल्याचे म्हटले आहे. मी राहुल यांना सांगतो की, माझ्या वडीलांचे 2019 मध्ये निधन झाले आणि कृषी कायदे 2020 मध्ये आले होते. आणखी एक बाब म्हणजे माझे वडील कधीही विरोधकांना धमकावत नव्हते. ते लोकशाही विचारसरणीचे होते. राजकारणात मतभेद असणे स्वाभाविक आहे, मात्र त्यांनी आदराने मतभेद स्वीकारले असं रोहन जेटली यांनी म्हटलं आहे.

रोहन जेटली यांनी पुढे बोलताना, ‘माझे वडील आता या जगात नाहीत. मी राहुल गांधींना विनंती करतो की जे लोक हयात नाहीत त्यांच्याबद्दल बोलताना थोडी सावधगिरी बाळगावी. त्यांनी मनोहर पर्रिकर यांच्यासोबतही असेच काही करण्याचा प्रयत्न केला होता असं विधान केलं आहे.