भारतातलं असं एक गाव जिथे राहतात फक्त तीनच लोक, बर्फ वितळवून पाणी पितात आणि…
हिमाचल प्रदेशातील स्पीती खोऱ्यात वसलेले कागती गाव हे भारतातील एकमेव असे ठिकाण आहे, जिथे फक्त तीनच लोक राहतात. मायनस 20 अंश सेल्सियस तापमानात, बर्फ वितळवून पाणी पिण्याची त्यांची जीवनशैली थक्क करणारी आहे. अत्यंत दुर्गम परिस्थितीतही, पिढ्यानपिढ्या हे कुटुंब येथे आनंदाने राहते, निसर्गाशी जुळवून घेत जगावेगळा संघर्ष करत आहे.

गाव म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर गावाची वेस, गावातील हॉटेल, देवळं, घरं, जनावरं, बैलगाड्या, जत्रा, शेती, विहिरी असं चित्र उभं राहतं. पारावर बसलेली म्हातारी मंडळी डोळ्यासमोर चमकतात. एसटी पकडण्यासाठीची धावपळ दिसते. जत्रेतला गोंगाट आणि भज्यांचा घमघमाटाने पावलं जागच्या जागी थबकतात. पण आपल्या देशात असं एक गाव आहे, ज्या गावात या गोष्टी नावाला सुद्धा नाहीयेत. अत्यंत शांत असं हे गाव आहे. या गावात एसटी येत नाही, गाई गुरं नाहीत. जत्रा भरत नाही, एखादं दुकानही नाहीये. त्यामुळे या अनोख्या आणि जगावेगळ्या गावाची जोरदार चर्चा सुरू आहे.
हिमाचल प्रदेशातील स्पीती खोऱ्यात कागती नावाचं हे अनोखं गाव आहे. प्रसिद्ध युट्यूबर रविंदर बिश्नोई यांनी त्यांच्या युट्यूब चॅनलवर या अनोख्या गावाचा व्हिडीओ शेअर करून या गावाची माहिती शेअर केली आहे. त्यानंतर अनेकांना या गावाबद्दल जाणून घेण्याची इच्छा निर्माण झाली आहे.
स्पीती खोऱ्यात काजाच्या पुढे डोंगरांच्या मध्ये कागती गाव आहे. या गावात शेरिंग नावाचं कुटुंब आहे. विशेष म्हणजे या कुटुंबाची पाचवी पिढी या गावात राहतेय. शेरिंग यांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या कुटुंबात एकूण पाच सहा लोक राहतात. पण सध्या तीनच लोक राहतात. या ठिकाणी शेती आणि गुरं राखणं हा उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत आहे. शेतात जव, बटाटे आणि काळे वटाणे उगवले जातात. गरजे पुरतं धान्य स्वत:कडे ठेवून बाकीचं धान्य बाजारात नेऊन विकलं जातं, असं या कुटुंबाने सांगितलं.
मायनस 20 डिग्रीत राहतात?
कागती गावात प्रचंड थंडी पडते. या ठिकाणी मायनस 20 डिग्री सेल्सिअस तापमान असतं. हिमवृष्टी होत असल्याने रस्ते बंद होतात. पूर्वी आमच्या आजी आजोबांच्या काळात या ठिकाणी 8 ते 10 फूट बर्फ जमा व्हायचा. मात्र आता हवामानात बराच बदल झाला असून तेवढा बर्फ पडत नाही, असं शेरिंग म्हणाले. थंडी पडण्याच्या अनेक महिन्याच्या आधीपासूनच हे कुटुंब तयारी करत असतं. नोव्हेंबरमध्येच पाच सहा महिन्याचं रेशन आणि इंधन जमा करून ठेवलं जातं. रस्ते बंद झाल्यावर पायीच यावं जावं लागतं. एवढेच नव्हे तर थंडीत पाण्याची पाईपलाईनही गोठून जाते. त्यामुळे अनेकदा बर्फ वितळवून पाणी प्यावं लागतं.
स्नो लेपर्डची भीती, तरीही…
या कुटुंबाला आवश्यक गरजांसाठी स्वत:वरच अवलंबून राहावं लागतं. थंडीच्या दिवसात मेंढ्या आणि बकऱ्यांच्या लोकरीची शाल आणि गालिचे तयार केले जातात. या ठिकाणी जंगली प्राण्यांचा नेहमीच धोका असतो. एकदा हिम बिबट्या आमच्या घरात घुसला होता. त्याने गायीच्या बछड्याची शिकार केली होती. या प्राण्यांपासून वाचण्यासाठी आम्ही दुसऱ्या गावाच्या मदतीने आणि काही संस्थांच्या मदतीने घराच्या भोवती मोठ्या जाळ्या उभारल्या आहेत. भटकी कुत्री आणि जंगली प्राण्यांपासून वाचण्यासाठी हा उपाय केल्याचं शेरिंग सांगतात.
अनेक सुविधा नाहीत
कागती गावाचं सौंदर्य अप्रतिम आहे. चोहोबाजूने डोंगर, हिमवृष्टी, कलणारा सूर्य यामुळे हे गाव मनमोहक भासतं. मात्र, हे गाव सर्व सुविधांपासून वंचित आहे. तरीही या गावात हे तीन लोक आनंदाने राहत असतात.