शेतकरी आंदोलनातील वृद्ध महिलेवरील टिप्पणीबद्दल कंगना यांनी मागितली माफी

शेतकऱ्यांच्या निषेधादरम्यान एका वृद्ध महिलेबाबत केलेल्या टिप्पणीप्रकरणी खासदार कंगना राणौत यांनी कोर्टात माफी मागितली आहे. कोणालाही दुखावण्याचा माझा हेतू नव्हता, असं तिने स्पष्ट केलं. हे प्रकरण नेमकं काय आहे, ते सविस्तर जाणून घ्या..

शेतकरी आंदोलनातील वृद्ध महिलेवरील टिप्पणीबद्दल कंगना यांनी मागितली माफी
Kangana Ranaut
Image Credit source: Instagram
| Updated on: Oct 27, 2025 | 6:06 PM

हिमाचल प्रदेशातील मंडी इथल्या भाजप खासदार आणि बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत यांनी शेतकऱ्यांच्या निषेधादरम्यान एका वृद्ध महिलेबद्दल केलेल्या टिप्पणीप्रकरणी अखेर माफी मागितली आहे. सोमवारी भटिंडा न्यायालयात हजर राहून कंगना यांनी त्यांच्या टिप्पणीबद्दल दिलगिरी व्यक्त केली. “प्रत्येक आई, मग ती पंजाबची असो किंवा हिमाचलची.. माझ्यासाठी आदरणीय आहे. मी कोणत्याही विशिष्ट व्यक्तीवर टिप्पणी केली नव्हती. मी फक्त एक मीम रिपोस्ट केली होती”, असं कंगना न्यायालयात म्हणाल्या. पीडित महिलेला उद्देशून त्यांनी माफीदेखील मागितली. “माझ्या वक्तव्यामुळे तुमच्या भावना दुखावल्या असतील तर मी माफी मागते”, असं त्या म्हणाल्या.

नेमकं काय होतं प्रकरण?

कंगना राणौत यांनी शेतकऱ्यांच्या निषेधादरम्यान पंजाबमधील एका वृद्ध महिलेबद्दल सोशल मीडियावर टिप्पणी केली होती, तेव्हाचं हे प्रकरण आहे. एका 87 वर्षीय वृद्ध शेतकरी महिलेला कंगना यांनी 100 रुपयांसाठी निषेधात सहभागी झालेली महिला असं म्हटलं होतं. भटिंडा जिल्ह्यातील बहादूरगड जांडियन गावातील रहिवाली असलेल्या या वृद्ध महिलेनं कंगना यांच्यावर थेट मानहानीचा खटला दाखल केला होता. यानंतर पंजाबच्या अनेक भागात शेतकरी आणि सामाजिक संघटनांनी कंगना यांच्या वक्तव्याचा तीव्र विरोध केला होता.

खटला रद्द करण्याची कंगना यांची याचिका फेटाळली

गेल्या काही वर्षांपासून हा खटला न्यायालयात प्रलंबित होता. काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने कंगना यांची खटला रद्द करण्याची याचिका फेटाळली होती. सर्वोच्च न्यायालयाने कंगना यांना भटिंडा न्यायालयात हजर राहून कार्यवाहीला सहकार्य करण्याचे निर्देश दिले. या आदेशानंतर कंगना यांनी आज (सोमवार) न्यायालयात हजेरी लावली.

गेल्या काही वर्षांत हा खटला अनेक कायदेशीर टप्प्यांमधून गेला आहे. कनिष्ठ न्यायालयाने कंगना यांना अनेकदा समन्स बजावले होते. परंतु त्यांनी कोणताच प्रतिसाद दिला नव्हता. तिने व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणीत सहभागी होण्याची विनंती केली होती. परंतु ती विनंतीसुद्धा नाकारण्यात आली होती. पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने आणि नंतर सर्वोच्च न्यायालयाने खटला रद्द करण्यास नकार दिला. त्यामुळे कंगना यांना आज सुनावणीसाठी न्यायालयात हजर राहणं भाग होतं.

कंगना यांनी फक्त एक पोस्ट शेअर केली नव्हती तर संबंधित वृद्ध महिलेला लक्ष्य करणारी स्वत:ची टिप्पणीदेखील जोडली होती, असं सर्वोच्च न्यायालयाने नमूद केलं होतं. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंर कनिष्ठ न्यायालयाने कंगना यांना 27 ऑक्टोबर रोजी प्रत्यक्ष न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले होते.