Kerala RSS | केरळमधील आरएसएसच्या ऑफिसवर बॉम्ब हल्ला, खिडकीच्या काचा फुटल्या

केरळमधील आरएसएसच्या ऑफिसवर अज्ञातांनी बॉम्ब फेकल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली.

Kerala RSS | केरळमधील आरएसएसच्या ऑफिसवर बॉम्ब हल्ला, खिडकीच्या काचा फुटल्या
Image Credit source: ANI
| Updated on: Jul 12, 2022 | 11:08 AM

केरळमधील (Kerala) कुन्नूर जिल्ह्यातील पय्यानूर गावात एक गंभीर घटना घडली आहे. नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार, येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयावर (RSS Office) बॉम्ब हल्ला (Bomb Blast) झाला. बाहेरून अज्ञातांनी कार्यालयावर बॉम्ब फेकला. त्यामुळे कार्यालयाच्या खिडकीच्या काचा फुटल्या आहेत. पय्यान्नूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळीच ही घटना घडली. या प्रकरणी तपास सुरु आहे. हा हल्ला नेमक्या कोणत्या उद्देशाने केला आहे, याचा तपास पयान्नूर पोलीस करत आहेत. मात्र सध्या हाती आलेल्या प्राथमिक माहितीनुसार, हल्ल्यात काहीही जिवितहानी झाली नाही. बाहेरून बॉम्ब फेकल्यामुळे खिडकीच्या काचा फुटल्या. तसेच यामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयातील खुर्च्या पडल्या. तसेच कार्यालयातील साहित्याचे नुकसान झाले आहे.

हल्ला दुर्दैवी- टॉम वडक्कन

केरळमधील आरएसएसच्या कार्यालयावर झालेला हा हल्ला दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया भाजप प्रवक्ते टॉम वडक्कन यांनी दिली आहे. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना कायदा आणि सुव्यवस्थेचा धाक राहिलेला नाही. सामाजिक संस्थांच्या कार्यालयांवर अशा प्रकारे बॉम्ब फेकण्यापर्यंत लोकांची मजल गेली आहे. समाजात हे कृत्य स्वीकारार्ह नाही. यापूर्वीदेखील आरएसएसच्या कार्यकर्त्यांवर हल्ले झाले आहेत. अशा कृत्यांवर लवकरात लवकर आळा घातला पाहिजे. स्थानिक पोलीस यासाठी जबाबदार असल्याची प्रतिक्रिया टॉम वडक्कन यांनी दिली.

पोलिसांचे दुर्लक्ष?

भाजप प्रवक्ते टॉम वडक्कन यांनी सदर हल्ल्यासाठी पोलिसांनाही तितकेच दोषी ठरवले आहे. अनेक ठिकाणी पोलिसांची कार्यलयं जवळच असूनही त्यांचे दुर्लक्ष होते.. कन्नूर सारख्या संवेदशनशील जिल्ह्यात अशा कार्यालयांना विशेष संरक्षण दिले पाहिजे. मात्र वारंवार पोलिसांनी याकडे दुर्लक्षच केले आहे. कोणत्याही राजकीय कार्यालयाला झालेल्या नुकसानीसाठी यापुढे राज्य सरकारलाच दोषी धरले जाईल, अशी प्रतिक्रिया टॉम वडक्कन यांनी दिल्याचे वृत्त ‘अमर उजाला’ने दिले आहे.