kohinoor Diamond: भारतात कधी वापस येणार कोहिनुर हिरा? भारत सरकारने दिले उत्तर

भारतातून ब्रिटिशांनी नेलेला कोहिनुर हिरा देशात परत येऊ शकतो का? याबद्दल अनेकांना उत्सुकता लागलेली आहे. यावर सरकारचे काय मत आहे?

kohinoor Diamond:  भारतात कधी वापस येणार कोहिनुर हिरा? भारत सरकारने दिले उत्तर
कोहिनुर हिरा
Image Credit source: Social Media
| Updated on: Oct 15, 2022 | 12:11 PM

मुंबई, भारतातील ब्रिटिश राजवटीत इंग्रजांनी अनेक मौल्यवान वस्तू आपल्या देशात नेल्या. या मौल्यवान वस्तूंपैकी एक म्हणजे कोहिनूर हिरा (Kohinoor Diamond). कोहिनूर ब्रिटिश राणीच्या मुकुटात बसविण्यात आला. भारतातून वेळोवेळी हा मौल्यवान हिरा आपल्या देशात परत (Bring Back to India) आणण्याची मागणी होत आहे तसेच त्याच्या परतीसाठी अनेकदा विशेष मोहीम देखील राबविण्यात आल्या. आता राणी एलिझाबेथ (Quin Elizabeth) यांच्या निधनानंतर कोहिनुर भारतात परत आणण्याच्या मागणीला पुन्हा जोर धरला आहे. कोहिनूर भारतात परत आणण्याची मागणी आणि त्यासंबंधीच्या इतर प्रश्नांबाबत भारत सरकारने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. परराष्ट्र मंत्रालयाने सूचित केले आहे की, ते युनायटेड किंगडममधून जगातील सर्वात मोठ्या हिऱ्यांपैकी एक कोहिनूर देशात  परत आणण्याचे मार्ग शोधत आहेत .

वृत्तसंस्था पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, कोहिनूर परत आणण्याच्या मागणीसंदर्भातील एका प्रश्नावर परराष्ट्र मंत्रालयाचे (एमईए) प्रवक्ते अरिंदम बागची यांनी काही वर्षांपूर्वी संसदेत या विषयावर सरकारच्या प्रतिसादाचा उल्लेख केला होता. यावर भारत सरकारने काही वर्षांपूर्वी संसदेत उत्तर दिले होते, असे ते म्हणाले. आम्ही हे प्रकरण वेळोवेळी यूके सरकारकडे मांडत आहोत तसेच या प्रकरणावर समाधानकारक तोडगा काढण्याचे मार्ग शोधत राहू असेही ते म्हणाले.

राणी एलिझाबेथ-द्वितीय यांच्या निधनानंतर कोहिनूर भारतात आणण्याची मागणी

1849 मध्ये महाराजा दुलीप सिंग यांनी 108 कॅरेटचा कोहिनूर रत्न व्हिक्टोरिया राणीला दिला होता. त्यानंतर राणीने 1937 मध्ये तो तिच्या मुकुटावर घातला. पुढील वर्षी 6 मे रोजी होणा-या समारंभात नवी राणी कॅमिलाला हा मुकुट घातला जाईल, अशी शक्यता ब्रिटीश माध्यमांमध्ये वर्तवली जात आहे. मात्र आंतराष्ट्रीय स्थरावर प्रसारित होणाऱ्या वृत्तानुसार कॅमीला या मुकुटात कोहिनुर हिरा वापरणार नसल्याचे कळते. काहींनी यासाठी भारताकडून होत असलेला तीव्र विरोध सांगितला आहे. महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या निधनानंतर, भारतातील मोठ्या संख्येने ट्विटर वापरकर्त्यांनी कोहिनूर भारतात परत करण्याची मागणी केली आहे.

अनेक देशांतून मौल्यवान वस्तू चोरल्या

विशेष म्हणजे ब्रिटनमध्ये कोहिनूरच नाही तर अशा अनेक अनमोल वस्तू आहेत, ज्यांचा दावा केला जात आहे की, ज्या देशांवर ब्रिटिशांचे राज्य होते  त्या देशांतून त्या चोरल्या गेल्या आहेत. भारताशिवाय ग्रीस, इजिप्त आणि आफ्रिकन देशांतील लोकही त्यांच्या मौल्यवान वस्तू परत करण्याची मागणी करत आहेत.

टिपू सुलतानची अंगठीही ब्रिटनमध्ये?

टिपू सुलतानच्या मौल्यवान अंगठीबद्दल असे म्हटले जाते की, ब्रिटिश सैन्याने टिपू सुलतान यांना युद्धात पराभूत केल्यानंतर ही अंगठी इंग्रजांनी चोरली होती. ब्रिटनमध्ये लिलावादरम्यान ही अंगठी विकल्याचा दावा काही वृत्त संस्थांनी केला आहे, मात्र ते कुणी विकत घेतले होते याबाद्दल कधीच माहिती मिळाली नाही.