लष्कर-ए-तोयबाच्या दहशतवाद्याला अटक, पोलिसांनी आवळल्या मुसक्या, ISI च्या इशाऱ्यावरून रचला मोठा कट
दिल्ली पोलिसांनी लष्कर-ए-तोयबाच्या शब्बीर अहमद लोनला अटक केली आहे. तो मेट्रो पोस्टर प्रकरणाचा सूत्रधार होता आणि भारतात आयएसआयसाठी नवीन दहशतवादी मॉड्यूल स्थापित करण्याचा प्रयत्न करत होता. बांगलादेशातून कार्यरत असलेला लोन, मोठ्या हल्ल्याची योजना आखत होता.

दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने लश्कर-ए-तोयबा (LeT) बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनेच्या एका दहशतवाद्याला अटक केली आहे. शब्बीर अहमद लोन असं त्याचं नाव आहे. मेट्रो पोस्टर प्रकरणात नुकतीच अटक करण्यात आलेल्या मॉड्यूलचा तो सूत्रधार होता. मिळालेल्या माहितीनुसार, दहशतवादी शब्बीर अहमद लोन हा संपूर्ण मॉड्यूल चालवत होता आणि मेट्रो पोस्टर प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींशी त्याचा थेट संपर्क होता. या कटाचं जाळं आणि इतर पैलूंचा तपास करण्यासाठी सुरक्षा यंत्रणा त्याची चौकशी करत आहेत.
बांग्लादेश कनेक्शन उघड
अटक करण्यात आलेला दहशतवादी लोन हा किस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयसाठी भारतात लश्कर-ए-तोयबाचे एक नवीन मॉड्यूल स्थापन करण्याच्या तयारीत होता, असं प्राथमिक तपासात उघड झालं. गुप्त माहितीच्या आधारे त्याला दिल्ली सीमेवर अटक करण्यात आली. अधिकाऱ्यांच्या सांगण्यानुसार, लोन हा बांगलादेशातून कार्यरत होता आणि भारतात हल्ला करण्याची योजना आखत होता.
अनेक ठिकाणी चिकटवण्यात आली भारताविरोधी पोस्टर्स
या दहशतवादी गटाने राजधानी दिल्लीपासून कलकत्त्यापर्यंत अनेक ठिकाणी बुरहान वानी आणि पाकिस्तानचा उल्लेख असलेले भारतविरोधी पोस्टर्स लावले होते. या पोस्टर्सवर, ठार झालेल्या जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी बुरहान वानीचे उदात्तीकरण करणारी चित्रे आणि “भारत, नरसंहार थांबवा आणि काश्मीरला मुक्त करा” यांसारख्या घोषणाही होत्या.
आधीही झाली होती अटक
याव्यतिरिक्त, आधार कार्डसारखी बनावट कागदपत्रं मिळवून त्यांना भारतात लपवून ठेवण्यात आले होते. एनक्रिप्टेड ॲप्सद्वारे संवाद साधला जात होता. दिल्ली आणि इतर शहरांमध्ये टेहळणीही करण्यात आली होती. शब्बीर अहमद लोनला 2007 साली देखील दिल्ली पोलिसांनी शस्त्रांसह अटक केली होती. त्याला शस्त्रास्त्र कायद्यांतर्गतही दोषी ठरवण्यात आले होते. मात्र नंतर तो जामिनावर सुटला आणि बांगलादेशात पळून गेला. तेथून त्याने दहशतवादी नेटवर्क पुन्हा सक्रिय करण्यास सुरुवात केली.
वेळीच कारवाई केल्यामुळे टळला मोठा हल्ला
हे मॉड्यूल भारतात मोठ्या दहशतवादी हल्ल्यांची तयारी करत होतं, असा तपास यंत्रणांचा विश्वास आहे. लाल किल्ल्यासारख्या संवेदनशील भागांना लक्ष्य करण्याची त्यांची योजना होती. अधिकाऱ्यांच्या सांगण्यानुसार, शब्बीर अहमद लोन हा बांगलादेशात राहणारा एक अनुभवी आणि प्रशिक्षित दहशतवादी असून, त्याने आयएसआय (ISI) आणि लष्कर-ए-तोयबाच्या (Laskar-e-Taiba) मदतीने भारतात एक दहशतवादी नेटवर्क स्थापन करण्याचा प्रयत्न केला होता. दिल्ली पोलिसांच्या कारवाईने या मोठ्या मॉड्यूलचा पर्दाफाश केला आणि एक संभाव्य मोठा हल्ला टाळला.