अमित शाह यांच्या निवेदनाशिवाय लोकसभेचं कामकाज तहकूब; सभागृहात प्रचंड गदारोळ

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह जंतरमंतर आंदोलनावर संसदेत निवेदन देणार होते. मात्र, पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विरोधकांनी प्रचंड गदारोळ केल्याने कामकाज अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यात आले. पंतप्रधान मोदी आणि शाह उपस्थित असूनही विरोधकांच्या गोंधळामुळे शाह यांना बोलताच आले नाही.

अमित शाह यांच्या निवेदनाशिवाय लोकसभेचं कामकाज तहकूब; सभागृहात प्रचंड गदारोळ
amit shah
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 13, 2026 | 11:27 AM

जंतरमंतरवरील आंदोलनावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज संसदेत निवेदन देणार असल्याचं सांगितलं जात होतं. अमित शाह यांनीही मी चर्चेला तयार असल्याचं म्हटलं होतं. त्यामुळे लोकसभा अधिवेशनाच्या आज शेवटच्या दिवशी अमित शाह काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. पण अमित शाह यांच्या निवेदनाशिवाय आजचं संसदेचं कामकाज अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यात आलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह सभागृहात आल्यानंतर सदस्यांनी प्रचंड गोंधळ घातला. त्यामुळे आजचं कामकाज तहकूब करण्यात आलं.

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस होता. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये गेल्या काही दिवसांपासून सभागृहात तूतूमैमै सुरू होती. या आधीही संसदेच्या आत आणि बाहेर दोन्ही पक्ष आमनेसामने आले होते. विरोधकांकडून वारंवार सभागृहात गोंधळ घातला जात असल्याने संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी नाराजी व्यक्त केली होती. माझ्या 30 वर्षाच्या प्रदीर्घ कार्यकाळात मी विरोधक असे बेजबाबदारपणे वागताना पाहिले नाहीत, असं किरेन रिजिजू म्हणाले होते. तसेच संसदेच्या अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस असल्याने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह लोकसभेत आपली भूमिका मांडणार असल्याचं सांगितलं जात होतं. अमित शाह यांनीही तसे संकेत दिल्याचं बोललं जात होतं.

निवेदनाशिवायच सूप वाजलं

अमित शाह आज संसदेत आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदीही अखेरच्या दिवसाच्या कामकाजात भाग घेण्यासाठी लोकसभेत उपस्थित राहिले होते. मात्र, दोन्ही नेते सभागृहात येताच विरोधकांनी जोरदार हंगामा केला. प्रचंड गोंधळ घातला. त्यामुळे कामकाज करणं कठिण झालं. लोकसभा अध्यक्षांकडून आजच्या शेवटच्या दिवशी कामकाज शांततेत पार पाडण्यासाठी विरोधकांना वारंवार विनंती केली. पण विरोधकांचा गोंधळ काही केल्या थांबत नव्हता. त्यामुळे लोकसभा अध्यक्षांनी आजचं कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित केलं. अमित शाह यांच्या निवेदनाशिवायच अधिवेशनाचं सूप वाजलं.

विरोधकांचे निदर्शने

आज अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विरोधकांनी संसद सुरू होण्यापूर्वी संसदेच्या बाहेर जोरदार निदर्शने केली. सरकार विरोधात विरोधकांनी जोरजोरात घोषणा देऊन सरकारच्या कारभाराचा निषेध नोंदवला. 20 जुलैरोजी जंतरमंतरवर विद्यार्थ्यांवर झालेला लाठीमार आणि राम मंदिर चोरीच्या मुद्द्यावर केंद्रीय गृहमंत्री शाह यांनी निवेदन देण्याची मागणी केली जात होती. सकाळी 10.30 वाजताच मकर गेटजवळ ही निदर्शने सुरू होती.

मी चर्चेला तयार

दरम्यान, अमित शाह यांनी यापूर्वीच मी चर्चेला तयार आहे. संसदेतील कोणत्याही चर्चेला मी तयार आहे. पण विरोधकांचा उद्देश चर्चा करणे नाहीये. तर फक्त गोंधळ घालणे हाच आहे, असा दावा अमित शाह यांनी केला होता.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us