
भारतात सर्वाधिक श्रीमंत आणि अब्जाधीश लोक कोणत्या शहरांमध्ये राहतात, याचा तपशील देणारी M3M हुरुन इंडिया रिच लिस्ट २०२५ नुकतीच जाहीर झाली आहे. या यादीनुसार, देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत आजही सर्वाधिक श्रीमंतांचे घर असल्याची माहिती समोर आली आहे. मुंबईने या यादीत आपले अव्वल स्थान कायम राखले आहे. तर महाराष्ट्रातील दुसरे शहर पुण्याने देखील टॉप 10 मध्ये स्थान निश्चित केले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील दोन नावांचा या यादीत समावेश झाल्याचे पाहायला मिळत आहे.
M3M हुरुन दरवर्षी भारतात सर्वाधिक श्रीमंत आणि अब्जाधीश कोणत्या शहरांमध्ये राहतात, याचा तपशील देणारी यादी जाहीर करत असते. यंदाही ही यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईने पुन्हा एकदा पहिला क्रमांक पटकावला आहे. मुंबईत तब्बल 451 श्रीमंत व्यक्ती राहतात. ज्यामुळे हे शहर देशातील सर्वात श्रीमंत लोकांचे मुख्य केंद्र ठरले आहे. २०२१ मध्ये ही संख्या २५५ होती. त्यात आता लक्षणीय वाढ झाली आहे. भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी आणि त्यांचे कुटुंब मुंबईत राहतात. मुंबईत एकूण ९१ अब्जाधीश राहतात. ज्यामुळे ही आर्थिक राजधानी अति श्रीमंतांसाठी सर्वात पसंतीची जागा बनली आहे.
मुंबईनंतर देशाची राजधानी नवी दिल्ली दुसऱ्या क्रमांकावर आहे. दिल्लीत 223 उच्च संपत्ती असलेल्या व्यक्ती राहतात. या सर्वात श्रीमंत लोकांमध्ये रोशनी नादर मल्होत्रा आणि त्यांचे कुटुंब आघाडीवर आहे. नवी दिल्लीत २२३ श्रीमंत लोक राहतात. २०२१ मध्ये ही संख्या १६७ होती. रोशनी नादर मल्होत्रा आणि तिचे कुटुंब या शहरातील सर्वात श्रीमंत लोकांपैकी एक आहेत. त्यापाठोपाठ तिसऱ्या क्रमांकावर आयटी हब म्हणून ओळखले जाणारे बंगळुरुचा समावेश होतो. बंगळुरुत ११६ श्रीमंत व्यक्तींसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. अझीम प्रेमजी आणि त्यांचे कुटुंब हे येथील सर्वात श्रीमंत आहेत.
| क्रमांक | शहर | उच्च संपत्ती असलेल्या व्यक्तींची संख्या | अब्जाधीशांची संख्या | शहरातील सर्वात श्रीमंत कुटुंब |
| 1 | मुंबई | 451 | 70 | मुकेश अंबानी आणि कुटुंब |
| 2 | नवी दिल्ली | 223 | 70 | रोशनी नादर मल्होत्रा आणि कुटुंब |
| 3 | बेंगळुरू | 116 | 31 | अझीम प्रेमजी आणि कुटुंब |
| 4 | हैदराबाद | 102 | 19 | मुरली देवी आणि कुटुंब |
| 5 | चेन्नई | 94 | 22 | वेणू श्रीनिवासन |
| 6 | अहमदाबाद | 68 | 16 | गौतम अदानी आणि कुटुंब |
| 7 | कोलकाता | 68 | 11 | संजीव गोएंका आणि कुटुंब |
| 8 | पुणे | 66 | 12 | सायरस एस. पूनावाला आणि कुटुंब |
| 9 | गुरुग्राम | 38 | 9 | निर्मल कुमार मिंडा आणि कुटुंब |
| 10 | सुरत | 32 | 4 | फारुखभाई गुलामभाई पटेल |
वेगाने वाढणारे व्यवसाय केंद्र असलेल्या हैदराबाद या यादीत चौथ्या क्रमांकावर असून इथे सध्या १०२ अब्जाधीश आहेत. मुरली देवी आणि त्यांचे कुटुंब याच ठिकाणी राहते. चेन्नईत ९४ अतिश्रीमंत लोक आहेत. २०२१ मध्ये ही संख्या केवळ ४३ होती म्हणजे चेन्नईतील संपत्तीत लक्षणीय वाढ झाली आहे. वेणू श्रीनिवासन हे शहरातील सर्वात श्रीमंतांपैकी एक आहेत. या यादीत अहमदाबाद सहाव्या क्रमांकावर आहे. या ठिकाणी ६८ श्रीमंत लोक राहतात. गौतम अदानी आणि त्यांचे कुटुंब याच शहरात वास्तव्यास आहे.
कोलकाता ६८ अतिश्रीमंतांसह ७ व्या क्रमांकावर आहे. संजीव गोएंका आणि त्यांचे कुटुंब शहरातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून ओळखले जातात. गेल्या काही वर्षांत पुण्यात संपत्तीत विक्रमी वाढ झाली आहे. सध्या पुण्यात ६६ अब्जाधीश वास्तव्य करतात. गुरुग्रामने यावर्षी प्रथमच यादीत प्रवेश केला आहे. हे शहर ३८ अब्जाधीशांसह ते नवव्या क्रमांकावर आहे. तर सुरतने या यादीत १० वे स्थान मिळवले आहे. हिरे आणि कापड उद्योगांमुळे सुरत पश्चिम भारतातील एक समृद्ध शहर बनले आहे. फारुखभाई गुलामभाई पटेल हे येथील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत.