बघताय काय आश्चर्यानं, दीड वर्षाच्या मुलासाठी वाघाला मात दिलीय माऊलीनं…

| Updated on: Sep 07, 2022 | 10:38 AM

उमरिया जिल्ह्यातलं बांधवगड टायगर रिझर्व्हचा भाग आहे. त्यामुळे इथे हिंस्र पशुंचा नेहमीच वावर असतो. भूक लागली की जनावरांवर हल्ले होतात. रविवारी माणसांवर हल्ला झाला.

बघताय काय आश्चर्यानं, दीड वर्षाच्या मुलासाठी वाघाला मात दिलीय माऊलीनं...
Image Credit source: ANI
Follow us on

उमरीया (म.प्र): पोटच्या पोराला सोडवण्यासाठी तिनं खरच वाघाच्या जबड्यात हात घातला. दीड वर्षाच्या राजवीरवर वाघानं झडप घातली. तशी माऊलीत अचानक शक्ती संचारल्यागत झालं. थेट भिडली. जिवाच्या आकांतानं किंचाळू लागली. गावकरी आले. डोळ्यासमोरचं चित्र श्वास थांबवणारं होतं. वाघानं जवळपास दोघांनाही कवेत घेतलं होतं. आईच्या मानेत नखं खुपसली होती. पण तिचा टाहो इतका भयंकर सुरु होता की त्या आवाजानं वाघाचंही मस्तक खवळलं होतं.

मध्य प्रदेशातल्या उमरीया जिल्ह्यातल्या एका खेडेगावतली ही घटना आहे. रविवारी सकाळी पावणे दहाच्या सुमारासची. आई अर्चना चौधरी दीड वर्षाच्या राजवीरला घेऊन कामासाठी बाहेर पडली. बाजूलाच झुडपात वाघ दडला होता. आई-लेकरू दिसताच काटेरी झुडुपातून झेप घेत पुढ्यात आला अन् राजवीरला पकडलं.

एखाद्याला भोवळच आली असती, पण आई जिद्दीनं उभी राहिली. थेट भिडली. वाघाच्या जबड्यातून राजवीरला सोडवण्यासाठी झुंज सुरु झाली. वाघानं तिलाही पकडलं. नखं मानेत घुसवली. ती जोरजोरात ओरडू लागली. किंचाळू लागली.

महिलेच्या किंकाळ्या ऐकून गावकऱ्यांना अंदाज आला. लाठ्या-काठ्या घेऊन पोहोचले. डोळ्यासमोरचं चित्र भितीदायक होतं. तिच्या मानेत घुसलेली वाघनखं. पण कंठातून निघणारा आकांत.

या आवाजानं वाघाचंही मस्तक खवळलं होतं. समोर आलेले गावकरी अन् मातेचा अखंड प्रतिकार पाहून वाघही नरमला. दोघांनाही तिथेच सोडून निघून गेला.

उमरिया जिल्ह्यातलं बांधवगड टायगर रिझर्व्हचा भाग आहे. त्यामुळे इथे हिंस्र पशुंचा नेहमीच वावर असतो. भूक लागली की जनावरांवर हल्ले होतात. रविवारी माणसांवर हल्ला झाला.

अर्चना आणि राजवीर यांना सार्वजनिक आरोग्य केंद्रात पाठवण्यात आलं. वाघाशी झुंज देताना अर्चनाच्या मानेला गंभीर इजा झाली आहे. तिला जबलपूरला पाठवण्यात आलंय. राजवीरची प्रकृतीही स्थिर आहे.