
जम्मू-कश्मीरमधील शहीद दिवसावरुन सुरु झालेला वाद संपवण्यास तयार नाही. शहीद दिवसाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने अनेक नेत्यांना नजरकैदेत ठेवले होते. जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनीही फातिहा अदा करण्यापासून रोखण्यात आल्याचा आरोप आहे. मात्र, त्यानंतरही त्यांनी ख्वाजा बाजार, नवहट्टा येथे जाऊन मजार-ए-शुहादाच्या भिंतीवरून उडी मारून फातिहा अदा करण्यासाठी गेले. यादरम्यान पोलिसांसोबत त्यांची झटापट झाली.
मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी आरोप केला की, पोलिसांकडून माझा शारीरिक छळ करण्यात आला. पण मी दृढनिश्चयी होतो आणि थांबणार नव्हतो. मी काहीही बेकायदेशीर करत नव्हतो. कायद्याचे रक्षक म्हणणाऱ्यांनी स्पष्ट केले पाहिजे की, फातिहा वाचण्यापासून आम्हाला रोखण्याचा प्रयत्न का झाला. ही घटना पोलिसांची मनमानी आणि धार्मिक स्वातंत्र्याच्या उल्लंघन करणारी आहे. हा अनुभव खूप निराशाजनक आहे. मुख्यमंत्र्यांनी पोलिसांनी झटापट केल्याचा आरोपही केला आहे. पोलीस त्यांना थांबवत असल्याचा एक व्हिडिओ उमर अब्दुला यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे.
मुख्यमंत्री उमर अब्दुला यांनी सांगितले की, सर्वांना घरात नजरकैदेत ठेवण्यात आले. मी कंट्रोल रुमला मजार-ए-शुहादा येथे जात असल्याचे कळवले. त्यानंतर माझ्या घराबाहेर बंकर बनवण्यात आले. रात्री १२ वाजेपर्यंत ते काढले गेले नाही. त्यामुळे मी आज न सांगता आलो आहे. त्यानंतरही पोलिसांकडून मला थांबवण्याचा प्रयत्न झाला.
This is the physical grappling I was subjected to but I am made of sterner stuff & was not to be stopped. I was doing nothing unlawful or illegal. In fact these “protectors of the law” need to explain under what law they were trying to stop us from offering Fatiha pic.twitter.com/8Fj1BKNixQ
— Omar Abdullah (@OmarAbdullah) July 14, 2025
जम्मू आणि काश्मीरमध्ये १३ जुलै हा दिवस शहीद दिन म्हणून साजरा केला जातो. १९३१ मध्ये याच दिवशी डोगरा सैनिकांनी निदर्शकांवर गोळीबार केला होता. यामध्ये २२ जणांचा मृत्यू झाला होता. या दिवशी जम्मू आणि काश्मीरमधील राजकीय वातावरण तापलेले असते. त्यावेळी महाराजा हरिसिंह यांचे शासन होते. महाराजा हरिसिंह यांनी अनेक बंधने घातली होती. त्याविरोधात अब्दुल कादिर या युवकाने डोगरा शासन विरोधात भाषण केले होते. त्यानंतर त्याला अटक केली होती. त्याला विरोध करण्यासाठी मोठ्या संख्येने जमाव जमला होता. जेव्हा जमाव नियंत्रणाबाहेर जाऊ लागला तेव्हा सैनिकांना गोळीबार करण्याचे आदेश दिले होते. त्यात २२ जणांचा मृत्यू झाला होता.