
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जगभरात टॅरिफ वॉर सुरू केलं आहे, त्यांनी जगातील अनेक देशांवर टॅरिफ लावला. या टॅरिफमुळे अमेरिकेला मोठा नफा झाला असून, व्यापारातील घाटा तब्बल 78 टक्क्यांनी कमी झाल्याचा दावा ट्रम्प यांनी केला आहे. मात्र अमेरिकेचं टॅरिफ अस्त्र आता अमेरिकेवरच उलटताना दिसून येत आहे. अमेरिकेतून मोठी बातमी समोर आली असून, अमेरिकेला मोठा दणका बसला आहे. अमेरिका सध्या मोठ्या संकटात सापडली आहे. अमेरिकेच्या कृषीविभागानं दिलेल्या माहितीनुसार अमेरिकेत जनावरांची संख्या झपाट्यानं कमी झाली असून, ती 8.5 कोटींवर आली आहे. 1951 नंतर पहिल्यांदाच अशी वेळ अमेरिकेवर आली आहे.
अमेरिकेच्या कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार 1975 मध्ये अमेरिकेत जनावरांची संख्या 13 कोटी होती, ज्यामध्ये आता 4.5 कोटींची घट झाली आहे, तर गेल्या काही वर्षांमध्ये जनावारांची संख्या 1 कोटीने कमी झाली आहे. अमेरिकेत जनावरांची संख्या झपाट्याने कमी होत असल्यानं मांस आणि दुधाचे दर अमेरिकेत प्रचंड प्रमाणात वाढले आहेत. अमेरिकनं लोकं आपल्या आहारात मांसाचा मोठ्या प्रमाणात वापर करतात, मात्र आता मांस प्रचंड महाग झाल्यानं मध्यमवर्गीय लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे, एवढंच नाही तर काही ठिकाणी अमेरिकेनं कृषी उत्पन्नावर देखील टॅरिफ लावल्यामुळे अमेरिकेत दूध देखील प्रचंड महाग झालं आहे.
अमेरिकेनं लावलेल्या टॅरिफमुळे अनेक देशातून अमेरिकेत येणाऱ्या कृषी उत्पन्नाचे भाव देखील वाढले आहेत, हे उत्पादन घेणं नागरिकांना परवडत नसल्यानं अमेरिकेतील लोकांचे हाल सुरू आहेत. महागाईने उच्चांक गाठला असून, गेल्या वर्षीच्या जानेवारीच्या तुलनेत या वर्षी अमेरिकेतली महागाई तब्बल 15 टक्क्यांनी वाढली आहे. भाजीपाल्यापासून ते दैनंदिन गरजेच्या वस्तूंपर्यंत सर्वच प्रोडक्ट महाग झाले आहेत, अमेरिकेतील अनेक कंपन्यांना सरकारच्या या टॅरिफ धोरणाचा प्रचंड फटका बसत असून, अमेरिकेत अनेक वस्तुंचा तुटवडा निर्माण झाला आहे. दरम्यान तुटवडा जाणू लागल्यानंतर आता अमेरिकन सरकारने काही देशांच्या कृषी मालावर लावलेला टॅरिफ मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.