Monsoon : हवामान विभागाचा अंदाज खरा ठरला, राज्यात धो-धो वरुणराजा बरसला, कुठे काय स्थिती? वाचा सविस्तर

| Updated on: Jul 05, 2022 | 9:44 AM

सोमवारपासून राज्यात सुरु झालेला पाऊस चित्र बदलणार आहे. आतापर्यंत कोल्हापूरलाही पावसाने वगळले होते. पण सोमवारी रात्रीपासून झालेल्या पावसाने पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. धरण क्षेत्रात झालेल्या दमदार पावसामुळे पंचगंगेची पाणी पातळी 23 फुटांवर गेली असून राजाराम बंधाऱ्यांसह 6 बंधारे पाण्याखाली गेले आहेत.

Monsoon : हवामान विभागाचा अंदाज खरा ठरला, राज्यात धो-धो वरुणराजा बरसला, कुठे काय स्थिती? वाचा सविस्तर
राज्यात मान्सून सक्रीय झाला असून पावसाचा जोरही वाढला आहे.
Follow us on

मुंबई : राज्यात (Monsoon) मान्सूनचे आगमन होऊन महिना उलटला तरी सर्वत्र पाऊस हा सक्रीय झालेला नव्हता. त्यामुळे (Kharif Season) खरीप हंगामाबाबत चिंता व्यक्त केली जात होती. मात्र, जुलै महिन्यात चित्र बदलेल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला होता. तर सोमवारपासून केवळ कोकण आणि मुंबईच नाहीतर राज्यात पाऊस सक्रीय होणार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार मुंबईसह उपनगरात आणि कोकणात कोसळधारा झाल्या आहेत. उर्वरित राज्यातही (Heavy Rain) पावसाने हजेरी लावली आहे. हंगामात प्रथमच सर्वत्र पाऊस झाला आहे. त्यामुळे पेरणी झालेल्या पिकांना तर नवसंजीवनी मिळणार आहेच पण ज्या क्षेत्रावरील पेरण्या रखडल्या होत्या त्याला देखील गती येणार आहे. एवढेच नाहीतर धरणांमधील पाणीपातळीही वाढू लागल्याने राज्यात सुरु असलेला पाऊस चित्र पालटून टाकणार असा विश्वास व्यक्त केला जात आहे. पुढील 5 दिवस मुंबई आणि कोकणाला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये हलक्या आणि मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोकणातील मात्र सर्वच जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा आहे.

  1. मुंबईसह उपनगरात पावसामध्ये सातत्य
    कोकण आणि मुंबईमध्ये वरुणराजाची कृपादृष्टी ही राहिलेली आहे. आतापर्यंत या विभागात पावसाचे सातत्य राहिले आहे तर सोमवारी मध्यरात्रीपासून पावसाचा जोर वाढला आहे. मुंबईसह उपनगरांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.मुंबई उपनगरात रात्री मुसळधार पावसाने हजेरी लावली असून वांद्र्यासह काही भागात अद्यापही पाणी साचले आहे. मुंबईच्या बोरिवली रेल्वे स्थानकाबाहेर मुसळधार पावसामुळे परिसरास तलावाचे स्वरूप आले असुन रस्ते जलमय झाले आहेत. वसई-विरार, नालासोपाऱ्यात पावसाचा जोर कायम असून वसई-विरारमध्ये अनेक भागात पाणी साचलं आहे. विरारच्या विवा कॉलेज परिसरातील रस्ता पाण्याखाली गेला आहे. पनवेल परिसरात कालपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. तर मंगळवारी सकाळीही रिमझिम पाऊस सुरुच होता. कल्याण पूर्व येथे हनुमाननगर टेकडीची दरड कोसळली आहे. दरड कोसळेल्या परिसरातील 5 कुटुंबाला सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.
  2. अमरावतीमध्येही हाहाकार, सूर्यगंगा नदीला पूर
    राज्यात सर्वत्रच पावासाचा जोर वाढत आहे. आतापर्यंत पावसाने हुलकावणी दिली होती. पण उशिरा का होईना दणक्यात पाऊस होत असल्याने बळीराजा सुखावला आहे. जिल्ह्यातील तिवसा तालुक्यात मुसळधार पाऊस झाला आहे. शिरजगावात तर नालीतले पाणी नागरिकांच्या घरात घुसले आहे. तर मोझरीमध्ये सूर्यगंगा नदीला पूर आला आहे. शिवाय सबंध जिल्ह्यात सतंतधार पाऊस होत असल्याने खरिपासाठी हा पाऊस पोषक मानला जात आहे. अमरावतीमध्ये अनेक घरांचेही नुकसान झाले आहे.
  3. कोल्हापूरातही जोर, पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत वाढ
    सोमवारपासून राज्यात सुरु झालेला पाऊस चित्र बदलणार आहे. आतापर्यंत कोल्हापूरलाही पावसाने वगळले होते. पण सोमवारी रात्रीपासून झालेल्या पावसाने पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. धरण क्षेत्रात झालेल्या दमदार पावसामुळे पंचगंगेची पाणी पातळी 23 फुटांवर गेली असून राजाराम बंधाऱ्यांसह 6 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे केवळ खरिपासाठीच नाहीतर पाणीपातळी वाढत असल्याने दिलासा मिळत आहे.
  4. नांदेडमध्येही सर्वदूर पाऊस
    नांदेडमध्ये मध्यरात्री पासून जोरदार पाऊस बरसतोय, यंदाच्या पावसाळ्यातला हा पहिलाच चांगला पाऊस आहे. या पावसामुळे नांदेड शहराच्या अनेक भागातील विद्युत पुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे नांदेडकरांना रात्र अंधारातच काढावी लागली. सर्वदूर झालेल्या या पावसाने शेतकऱ्यांना दिलासा मिळालाय तर पेरणी राहिलेले शेतकरी आता लगबग करताना दिसणार आहेत. रात्रभर कोसळलेल्या या आषाढ सरीमुळे वातावरणात आल्हाददायक गारवा निर्माण झालाय.
  5. बुलडाण्यात दुबार पेरणीचे संकट टळले
    पावसाने ओढ दिल्याने आता दुबार पेरणी करावी लागते की काय अशी स्थिती होती. पण रात्रीत झालेल्या पावसाने चित्र बदलले आहे. सोमवारी रात्रीपासून पावसाचा जोर वाढला असून रात्रभर पाऊस सुरूच होता. सकाळपासून पावसाची अद्यापही संततधार सुरूच आहे.पावसाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून दुबार पेरणीचे संकट टळलं आहे. पेरणीनंतर पावसाने उघड दिली होती तर काही भागात पेरणीयोग्य पाऊस झाला नव्हता. पण आता शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून दुबार पेरणीचे संकट टळलं आहे.