Mission Chandrayaan 2 : एक वर्षापर्यंत चंद्राचे फोटो ‘ऑर्बिटर’ पाठवणार

भारताचे चंद्रयान 2 (Mission Chandrayaan 2) मध्यरात्री चंद्रावर यशस्वीपणे लँड होणार होते. मात्र त्यापूर्वीच विक्रम लँडरचा संपर्क तुटला आहे. त्यामुळे सर्व शास्त्रज्ञांचा हिरमोड झाला आहे.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 8:42 AM, 7 Sep 2019
Mission Chandrayaan 2 : एक वर्षापर्यंत चंद्राचे फोटो 'ऑर्बिटर' पाठवणार

Mission Chandrayaan 2 बंगळुरु : भारताचे चंद्रयान 2 (Mission Chandrayaan 2) मध्यरात्री चंद्रावर यशस्वीपणे लँड होणार होते. मात्र त्यापूर्वीच विक्रम लँडरचा संपर्क तुटला आहे. त्यामुळे सर्व शास्त्रज्ञांचा हिरमोड झाला आहे. पण विक्रम लँडर 95 टक्के पूर्णपणे कार्यक्षम असल्याची माहिती इस्रोच्या (ISRO) एका अधिकाऱ्याने दिली आहे. इस्रो विक्रम लँडरशी संपर्क करण्याचा प्रयत्न करत आहे.

भारताने या मोहिमेसाठी 978 कोटी रुपये खर्च केले होते. मात्र संपर्क तुटल्याने सर्वकाही संपलं असं नाही. चंद्रयान 2 चा ऑर्बिटर भाग आपल्याला पुढील एक वर्ष चंद्राचे फोटो पाठवू शकणार आहे. चंद्रयान 2 मोहिम 95 टक्के कार्यक्षम असून चंद्राच्या बाजूने फिरत आहे, असं इस्रोच्या एका अधिकाऱ्याने नाव न देण्याच्या अटीवर एका वृत्तसंस्थेला सांगितले.

चंद्रयान 2 चे ऑर्बिटर एक वर्ष आपल्या अनेक फोटो पाठवू शकते. ऑर्बिटर लँडरचे फोटोही पाठवू शकतो. त्यामुळे त्याच्या अवस्थेबद्दल समजू शकते. असही अधिकारी म्हणाले.

चंद्रयान 2 चे तीन भाग

चंद्रयान 2 अंतरिक्ष यानाचे तीन खंड आहेत. ऑर्बिटर (2,379 किलोग्राम, आठ पेलोड), विक्रम (1,471 किलोग्राम, चार पेलोड) आणि प्रज्ञान (27 किलोग्राम, दोन पेलोड)

विक्रम 2 सप्टेंबरला ऑर्बिटरपासून वेगळा झाला होता. चंद्रयान 2 ला 22 जुलै रोजी भारताच्या हेमी रॉकेट जिओसिंक्रोनस सॅटेलाईट लाँच व्हिकल-मार्क 3 च्या (जीएसएलवी एमके 3) माध्यमातून लाँच केले होते.