
लग्नाच्या अवघ्या दोन महिन्यांतच कानपूरच्या शुभम द्विवेदीने पहलगाममध्ये झालेल्या दहशवादी हल्ल्यात आपले प्राण गमावले. शुभम त्याच्या कुटुंबीयांसोबत काश्मीरला फिरायला गेला होता. बैसरन पठारावर पत्नीसोबत फिरत असताना दहशतवाद्यांनी त्याला धर्म विचारून त्याच्यावर गोळी झाडली होती. शुभमच्या मृत्यूनंतर त्याची पत्नी एशान्या आणि इतर सर्व कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. ‘मदर्स डे’ला शुभमविषयी बोलताना, आठवणी सांगताना त्याच्या आईचा कंठ दाटून आला. “शुभम आणि पहलगाम हल्ल्यातील इतरांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी आज सीमेवर कित्येक आईंची मुलं धैर्याने, हिंमतीने उभी आहेत. देव त्या सर्वांचं रक्षण करो”, अशी प्रार्थना त्यांनी केली आहे.
‘लाइव्ह हिंदुस्तान’शी बोलताना त्या म्हणाल्या, “आपल्या मुलाला गमावल्याचं दु:ख फक्त एक आईच समजू शकते, जिने तिच्या मुलाला गमावलंय. इतर कोणीच या वेदनांना समजू शकत नाही. आता आयुष्यभर मला हे दु:ख सहन करायचं आहे. माझं दुर्दैव असं होतं की मुलाच्या मृत्यूची बातमी समजल्यानंतरही मी त्याचा चेहरा पाहू शकले नाही.”
22 एप्रिल रोजी हल्ल्याच्या दिवशी शुभम आणि त्याचे कुटुंबीय पहलगामला ट्रेकिंगला गेले होते. “आम्ही जेव्हा वर पहलगामला जात होतो, तेव्हा मधूनच आम्ही खाली उतरलो. मी त्याला विचारलं की, शुभम खाली येशील का? तेव्हा त्याने घोडेवाल्याला विचारलं की, भैय्या.. वर नेटवर्क असेल का? घोडेवाल्याने सांगितलं की वर नेटवर्क असेल. त्यानंतर शुभमने वर बैसरनला जायचं ठरवलं होतं. जर त्या घोडेवाल्याने सांगितलं असतं की वर नेटवर्क नसतं, तर कदाचित आज माझा मुलगा माझ्यासोबत असता”, अशा शब्दांत शुभमची आई सीमा यांनी भावना व्यक्त केल्या.
पहलगाममधील बैसरन पठारावर दहशतवाद्यांनी शुभमला कुराणमधील कलमा बोलून दाखवण्यास सांगितलं. शुभमला ते म्हणता न आल्याने अतिरेक्यांनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या होत्या. “शुभम आणि एशान्या हे घोडेस्वारी करत परिसरात फिरत होते, तेव्हाच दहशतवाद्यांनी हल्ला केला. सैन्याच्या वेशात असलेल्या एका अतिरेक्याने शुभमला विचारलं की, तू मुस्लीम आहे का? तर दुसऱ्याने त्याला कलमा म्हटल्यास सांगितलं. त्यावर शुभमने कलमा येत नसल्याचं सांगताच त्याला गोळी झाडली”, अशी माहिती शुभमचा चुलत भाऊ सौरभने दिली होती.