क्रूरकर्मा औरंजेबाची अधूरी प्रेमकहाणी…कोण होती ती गणिका, कुणाची दृष्ट लागली या प्रेमा?
Aurangzeb Love Story : मुघल बादशाह औरंगजेब याचे तीन लग्न झाले होते. पण त्याचे पहिले प्रेम एक गणिका होती. त्याला ती आवडायची. तिच्या सौंदर्यावर तो भाळला होता. तिच्या अदा, तिचे नखरे सर्वच त्याला आवडले. पण ही प्रेम कहाणी अपूर्ण राहिली.

मुघल बादशाह औरंगजेब हे इतिहासातील सर्वात क्रूर पात्र आहे. सत्तेसाठी हापलेल्या औरंगजेबाचे कारनामे अत्यंत क्रूर आहे. तो इतिहासातील सर्वात मोठा खलनायक आहे. त्याच्या समकालीन इतिहासकारांनी त्याचा नीचपणा, धर्मांधता, हेकेखोरपणा, नालायकी, पाताळयंत्री, क्रूर, धूर्तता याविषयी भरभरून लिहले आहे. पण त्याच्या या काळ्या बाजूतच एक हळवी प्रेमकहाणी पण दडली आहे. औरंगजेबाचे तीन लग्न झाले होते. पण त्याचे पहिले प्रेम एक गणिका होती. त्याला ती आवडायची. तिच्या सौंदर्यावर तो भाळला होता. तिच्या अदा, तिचे नखरे सर्वच त्याला आवडले. पण ही प्रेम कहाणी अपूर्ण राहिली.
या महिलेने दिली नाही किंमत
औरंगजेबाला पहिले प्रेम तो बादशाह नसताना झाले. त्यावेळी तो सैन्यात उमेदवारी करत होता. दरबारी आणि मैदानावरील गोष्टी आत्मसात करत होता. त्यावेळी त्याला बादशाह होण्याचे कोणतेही स्वप्न नव्हते. एकीकडे संघर्ष तर दुसरीकडे एका गणिकेच्या तो प्रेमात पडला होता. पण तिने कधी त्याला स्वीकारले नाही. कायम झिडकारले. तरीही औरंगजेबाचे तिच्यावरील प्रेम तसूभरही कमी झाले नाही. त्याला ती मनापासून आवडायची.




कोण होती ती गणिका
औरंगजेब तरुण वयात कोठ्यांचे उंबरे झिजवायचा. त्या ठिकाणी तवायफ, गणिका आपल्या दिलखेचक अदांनी समोरच्याला रिझवायच्या. आपल्या बटांमध्ये, डोळ्यांच्या इशाऱ्यांवर धनिकांना वेड लावायच्या. हरिणासारख्या चालीने, खुदकन हस्याने त्याच्या काळजात घर करायच्या. या अदांवर फिदा होऊन अनेक मनचले, दिलजले या कोठ्यांवर अमाप पैसा उधळायचे. संध्याकाळी त्यांची पावलं इकडं वळायचीच.
तर अशाच एका खास कोठीवर औरंगजेबला हिराबाई जैनाबादी ही गणिका भेटली. ती ख्रिश्चन धर्म मानणारी होती. ती अत्यंत लोभस, नितांत सुंदर आणि आकर्षक होती. तिचा आवाज तर सोन्यावर सुहागा होता. तिच्या आवाजावर अनेक जण मोहित झाले होते. पण ती औरंगजेबाच्या मामाच्या हरम, खास गणिका होती. त्याला हिराबाईचा मोह सुटत नव्हता.
दिल्ली दरबारात दारा शिकोह हा बादशाह होणार याची चर्चा होती. तो शाहजहांचा लाडका पुत्र होता. तर औरंगजेबला दिल्लीतील राजकारणाचा वीट आला होता. त्याला पुन्हा दख्खनच्या स्वारीवर पाठवण्यात आल्याने त्याचे मन खट्टू झाले होते. अशातच त्याला हिराबाईच्या रुपाने मनावरील औषध मिळालं. दख्खनमध्ये आपल्याला तर हिरा सापडला असं त्याला वाटू लागलं. औरंगजेब हा त्याच्या मामा-मामीचा लाडका होता. बुऱ्हाणपूर आणि जैनाबाद येथे त्याचे जाणे येणे वाढले.
अशी झाली पहिली भेट, मग कसोटी
या भागातील हिरण उद्यान त्यावेळी गणिकांसाठी प्रसिद्ध होते. तिथेच हिराबाईशी त्याची पहिली भेट झाली. ती इतर मैत्रिणींसोबत या बागेत आली होती. तिथे त्यांनी बागेतील आंबे तोडले. त्यानंतर हिराबाईने असा काही सूर लावला की जणू पशू पक्षी सुद्धा ते ऐकण्यास थांबले. तिचा गाण्याचा अंदाज, तिचे जादूई सौंदर्य, दिलखेचक अदांनी औरंगजेब हिराबाईपुढे मन हरखून गेला.
दरबारी, प्रशासकीय कामकाज संपले की तो अगोदर हिराबाईकडे येऊ लागला. या ना त्या कारणाने तिच्याशी गुप्तगू करू लागला. त्याला केवळ हिराबाईचाच सहवास हवा हवासा वाटू लागला. हिराबाई अल्लड वयातील तरुणी होती. सुरुवातीला तिने औरंजेबाला भाव दिला नाही. तिने त्याच्या प्रेमाची चांगलीच कसोटी घेतली. तिने त्याला झिडकारले. पण औरंगजेबाने तिला सोडले नाही.
अन् हिराबाई कायमची गेली…
एक दिवस तिने औरंगजेबाला दारूचा पेला दिला आणि तो पिण्यास सांगितला. औरंगजेबाला दारूचा तिटकारा होता. पण आपल्या प्रियेसाठी त्याने दारुचा पेला तोंडाला लावला. त्यावेळी हिराबाईने तो पेला दूर सारला आणि त्याच्या प्रेमाचा स्वीकार केला. ते दोघे प्रेमात अखंड बुडाले. या प्रेमाची चर्चा बुऱ्हाणपूरहून थेट दिल्लीपर्यंत पोहचली. शाहजहांच्या कानावर ही वार्ता पोहचली. पण पुढे एका आजारपणाचे निमित्त झाले नि हिराबाई त्यात वाचू शकली नाही. औरंगजेबाने तिच्यासाठी हकीम, वैद्य आणले. पण तो तिला वाचवू शकला नाही. त्याच्या प्रेमकथेला विराम मिळाला. पण त्याच्या कौर्याला आणि अमानुषतेला त्याच्या मरणापर्यंत कधीच विराम मिळाला नाही.