राष्ट्रवादीत मोठे फेरबदल, कुणाकडे कुठली जबाबदारी?; शरद पवार यांची खेळी की मास्टरस्ट्रोक?

| Updated on: Jun 10, 2023 | 2:11 PM

शरद पवार यांनी या नियुक्त्या जाहीर करताना प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे यांच्यावर महत्त्वाच्या जबाबदाऱ्या दिल्या आहेत. तसेच दोघांच्या कामाची विभागणीही करून दिली आहे.

राष्ट्रवादीत मोठे फेरबदल, कुणाकडे कुठली जबाबदारी?; शरद पवार यांची खेळी की मास्टरस्ट्रोक?
praful patel
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

नवी दिल्ली : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पक्षात भाकरी फिरवण्याची घोषणा मध्यंतरी केली होती. त्यानंतर पवार यांनीच स्वत: पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन सर्वांना बुचकळ्यात टाकलं होतं. त्यानंतर पवारांनी राजीनामा मागेही घेतला होता. त्यामुळे आता राष्ट्रवादीत सर्व काही अलबेल असल्याचं सांगितलं जात होतं. मात्र, शरद पवार यांनी आज पक्षात मोठे फेरबदल करत मास्टरस्ट्रोक लगावला आहे. पवारांनी थेट प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे यांच्याकडे पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदाची जबाबदारी दिली आहे. तर अजित पवार, छगन भुजबळ, एकनाथ खडसे यांच्यासारख्या बड्या नेत्यांवर काहीच जबाबदारी न दिल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. पवारांच्या या खेळीमागचे कारण काय? असा सवाल या निमित्ताने केला जात आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसने 25 व्या वर्षात पदार्पण केलं आहे. त्या निमित्ताने दिल्लीत राष्ट्रवादीचा मेळावा पार पडला. या मेळाव्याला संबोधित करताना शरद पवार यांनी भाजपवर जोरदार हल्ला केला. त्यानंतर भाषण संपल्यावर शरद पवार यांनी एक कागद काढला आणि थेट पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांची घोषणाच केली. पवार यांनी पक्षाच्या स्थापना दिनाचा मुहूर्त साधून नव्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. विशेष म्हणजे पवार यांनी या नियुक्त्या जाहीर करताना प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे यांच्यावर महत्त्वाच्या जबाबदाऱ्या दिल्या आहेत. तसेच दोघांच्या कामाची विभागणीही करून दिली आहे.

हे सुद्धा वाचा

कुणाकडे काय जबाबदारी?

सुप्रिया सुळे – कार्यकारी अध्यक्ष, महाराष्ट्र, हरियाणा, पंजाब राज्यांची जबाबदारी, महिला आणि युवा विंगची जबाबदारी, तसेच लोकसभेतील समन्वयाची जबाबदारी

प्रफुल्ल पटेल – कार्यकारी अध्यक्ष, मध्यप्रदेश, राजस्थान, गोवा राज्याची जबाबदारी

सुनील तटकरे – राष्ट्रीय महासचिव, ओडिशा, पश्चिम बंगालची जबाबदारी, शेतकरी आणि अल्पसंख्यांक विभागाचे प्रभारी

नंदा शास्त्री – दिल्लीच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्त

फैसल – तामिळनाडू, तेलंगना, केरळ राज्यांची जबाबदारी

अजित पवारांकडे मोठी जबाबदारी

शरद पवार यांनी सुप्रिया सुळे यांच्याकडे महाराष्ट्राची जबाबदारी सोपवली आहे. तूर्तास अजित पवार यांच्याकडे कोणतीही जबाबदारी देण्यात आलेली नहाी. मात्र, लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका पाहता येणाऱ्या काळात अजित पवार यांच्याकडे मोठ्या जबाबदाऱ्या देण्यात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच राज्यात राष्ट्रवादीची सत्ता आल्यास अजित पवार यांच्याकडे मुख्यमंत्रीपद सोपवलं जाऊ शकतं. त्यामुळेच अजितदादांकडे कोणतीच जबाबदारी दिली नसावी, असं सांगितलं जात आहे.