
दिल्ली विधानसभा निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांना एकामागून एक धक्के बसत आहेत. केजरीवाल यांच्या ‘आप’ची दिल्लीतून सत्ता गेली आहे. 10 वर्षानंतर ‘आप’ला सतेत्तून बाहेर जावं लागलं आहे. तर भाजपला 25 वर्षानंतर सत्ता मिळाली आहे. या धक्क्यातून सावरत नाही तोच आपचे नेते, उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया पराभूत झाल्याची बातमी येऊन धडकली. त्यामुळे केजरीवाल यांचं काय होणार अशी चर्चा असतानाच आता अरविंद केजरीवाल यांचाही पराभव झाल्याची बातमी येऊन धडकली आहे. ‘आप’साठी हा सर्वात मोठा धक्का असल्याचं सांगितलं जात आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर राजधानी दिल्लीत विधानसभा निवडणुका पार पडल्या. भाजप विरुद्ध आप अशा अटीतटीच्या लढतीत भाजपचा विजय झाला. नवी दिल्लीत भाजपने तब्बल 47 जागांवर मुसंडी मारली आहे. तर आम आदमी पक्षाला केवळ 23 जागांवर समाधान मानावे लागले आहे. विशेष म्हणजे या निवडणुकीत काँग्रेसला भोपळाही फोडता आलेला नाही. त्यामुळे तब्बल 27 वर्षानंतर नवी दिल्लीत भाजपचे कमळ फुलले आहे. या निकालानंतर दिल्लीत भाजपची एकहाती सत्ता येणार असल्याचे निश्चित झाले आहे.
दिल्ली विधानसभा निवडणुकीत अनेक दिग्गजांचा पराभव झाला आहे. दिल्लीचे माजी मुख्यमंत्री व आपचे संस्थापक अरविंद केजरीवाल हे पराभूत झाले आहे. भाजपच्या परवेश वर्मा यांनी 3186 मतांनी केजरीवाल यांचा पराभव केला आहे. त्यामुळे आपच्या गोटात मोठा भूकंप झाला आहे. अरविंद केजरीवाल यांच्यासोबतच मनीष सिसोदिया यांचाही पराभ झाला आहे.
आम आदमी पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांचा पराभव झाला आहे. जंगपुरा मतदारसंघात भाजपाच्या तरविंदर सिंग मारवाह यांचा 600 मतांनी विजय झाला आहे. तसेच राजेंद्र नगर मतदारसंघातून आपचे दुर्गेश पाठक यांचाही पराभव झाला आहे. मनीष सिसोदिया यांनी त्यांचा पराभव मान्य केला आहे. जे जिंकले आहेत त्यांचं मी अभिनंदन करतो. नेमकं काय घडलं त्याबाबत आत्मपरीक्षण करु, असं मनीष सिसोदिया म्हणाले.
तसेच पराभवाच्या छायेत असलेल्या दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांचा विजय झाला आहे. त्या कालकाजी मतदारसंघातून विजयी झाल्या आहेत. आतिशी यांनी शेवटच्या फेरीत आघाडी घेतली आणि त्या 2700 मतांनी विजयी झाल्या. त्यांनी भाजपच्या रमेश बिधुरी यांचा पराभव केला आहे. तर मालवीय नगरमधून आपच्या सोमनाथ भारती यांचाही पराभव झाला आहे.
दरम्यान दिल्लीत झालेल्या या पराभवानंतर आपच्या सर्वच कार्यालयात शुकशुकाट पाहायला मिळत आहे. दिल्ली निवडणुकीत खराब कामगिरीमुळे आपने कार्यालयाला आतून टाळे ठोकले आहे. आपच्या पक्ष कार्यालयात प्रवेश बंद करण्यात आला आहे. तर दुसरीकडे भाजपाकडून जल्लोषाला सुरुवात झाली आहे.