New GST Rates: दुकानदाराने जुन्या MRP वर वस्तू दिल्या तर काय करावं?

New GST Rates: जीएसटी कपातीच्या निर्णयानंतर जुन्या स्टॉकवरही दुकानदारांनी कमी केलेला दर ग्राहकांना द्यावा असे आदेश सरकारने दिले आहेत. परंतु जर दुकानदाराने तसं करण्यास नकार दिला काय करावं, हे जाणून घ्या..

New GST Rates: दुकानदाराने जुन्या MRP वर वस्तू दिल्या तर काय करावं?
GST
Image Credit source: Instagram
| Updated on: Sep 22, 2025 | 3:51 PM

New GST Rates: शारदीय नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून जीएसटीतील सुधारणा लागू झाल्या आहेत. यामुळे सर्वसामान्यांच्या दैनंदिन जीवनातील आवश्यक असलेल्या 99 टक्के वस्तू स्वस्त झाल्या आहेत. रविवारी देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 375 हून अधिक वस्तू स्वस्त झाल्याची घोषणा केली. यामध्ये तूप, चीज, स्नॅक्स, ड्रायफ्रूट्स यांसारख्या दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंचा समावेश आहे. तर टीव्ही, एसी, रेफ्रिजरेटर आणि वॉशिंग मशीनसारखी उपकरणंसुद्धा स्वस्त झाली आहेत. नवीन जीएसटी प्रणाली अंतर्गत आता फक्त 5% आणि 18% असे दोनच कर स्लॅब शिल्लक आहेत.

नवीन जीएसटी दर लागू झाल्यानंतर सर्वसामान्यांमध्ये अद्याप काही प्रश्न आहेत. कमी केलेल्या एमआरपीचा परिणाम बाजारात असलेल्या वस्तूंवर होईल का? कोणत्या उत्पादनांच्या किंमतीवर त्याचा परिणाम होणार नाही? दुकानदार आपल्याला पूर्ण सवलत देत आहे की नाही हे कसं कळेल? दुकानदार अजूनही जुन्या एमआरपीवर वस्तू विकत असेल तर आपण काय करावं? यांसारखे अनेक प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात आहेत. या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात..

आजपासून बाजारातील वस्तूंवर कमी केलेली एमआरपी दिसून येईल का?

उत्तर- नाही. कमी केलेली एमआरपी बाजारातील प्रत्येक वस्तूवर दिसणार नाही. कारण दुकानदारांकडे वस्तूंचा जुना साठा असेल. त्यामुळे त्यावर जुनी एमआरपी दिसून येईल. सरकारने असंही स्पष्ट केलंय की वस्तूंवर कमी किंमतीचं स्टिकर लावणं बंधनकारक नाही.

जुन्या स्टॉकमधून वस्तू खरेदी केल्यावर जीएसटी कपातीचा लाभ मिळणार नाही का?

उत्तर- सर्व ग्राहकांना जुन्या स्टॉकमधून वस्तू खरेदी केल्या तरी, जीएसटी कपातीचा पूर्ण फायदा मिळू शकेल. सरकारने असे निर्देश दिले आहेत की दुकानदारांनी 22 सप्टेंबरपासून जीएसटी दर कपातीमुळे स्वस्त झालेल्या वस्तू विकल्या पाहिजेत. म्हणजेच दुकानातील स्टॉक नवीन असो किंवा जुना, ग्राहकांना या कपातीचा फायदा मिळेल.

जुना साठा स्वस्त दरात विकून दुकानदाराचं नुकसान होईल का?

उत्तर- जुन्या वस्तू सवलतीच्या जीएसटी दराने विकल्याने दुकानदाराचं कोणतंही नुकसान होणार नाही. सरकारच्या मते, दुकानदार जीएसटी रिटर्न भरताना ही रक्कम त्यात अॅडजस्ट करेल.

कोणत्या वस्तूंच्या किंमतीवर परिणाम होणार नाही?

उत्तर- गहू, तांदूळ, पीठ, डाळी, फळे, ताज्या भाज्या, दूध, दही, ताक, मीठ, अंडी, नैसर्गिक मध आणि पिण्याचं पाणी (पॅकेज केलेल वगळून) यांच्या किमतीवर कोणताही परिणाम होणार नाही. शिवाय पेट्रोल, डिझेल, सिलेंडर, सोनं, चांदी, स्मार्टफोन आणि लॅपटॉपवरील कर समान राहतील.

दुकानदाराने आपल्याला पूर्ण सूट दिली आहे की नाही हे कसं कळेल?

उत्तर- जर दुकानदाराने वैध बिल तयार केलं तर ते नवीन दरांनुसार जीएसटी आकारला गेला आहे की नाही हे स्पष्टपणे दर्शवेल. तुम्ही त्याची तुलना जीएसटी दर कमी केलेल्या वस्तूंच्या यादीशी करू शकता. शिवाय तुम्ही दुकानदाराला थेट विचारू शकता. याचा अर्थ दुकानदाराने पूर्ण लाभ दिला आहे की नाही हे बिल स्पष्टपणे दर्शवेल.

दुकानदाराने जुन्या MRP वर वस्तू दिल्या तर काय करावं?

उत्तर- जर दुकानदाराने जुन्या एमआरपीवर वस्तू दिल्या तर 1800114000 किंवा 1915 या टोल फ्री क्रमांकावर कॉल करून तक्रार करा.
तुम्ही 8800001915 या मोबाइल क्रमांकावर एसएमएस किंवा व्हॉट्स अॅप मेसेज पाठवूनही तक्रार नोंदवू शकता.
तुम्ही NACH अॅपवरही तक्रार नोंदवू शकता आणि ती ट्रॅकदेखील केली जाऊ शकते.
ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या https://consumerhelpline.gov.in या वेबसाइटवर नोंदणी करून तुम्ही तिथे तक्रार दाखल करू शकता.