मार्च 2027 पर्यंत देशात… नितीन गडकरी यांची सर्वात मोठी घोषणा; काय घडणार?
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी मार्च 2027 पर्यंत देशातील सर्व टोल प्लाझा बॅरियर-फ्री करण्याची घोषणा केली आहे. ANPR (ऑटोमॅटिक नंबर प्लेट रिकग्निशन) आणि FASTag तंत्रज्ञानाचा वापर करून वाहनांना न थांबता टोल भरणे शक्य होईल. यामुळे प्रवाशांचा वेळ व इंधन वाचेल, वाहतूक कोंडी कमी होईल आणि सरकारचा महसूल वाढणार आहे.

टोल प्लाजामुळे अनेकांची दिवसाची सुरुवातच वाईट होते. सामान्य नागरिकांना लांबच लांब रांगांमध्ये अडकून बसावं लागतं. त्यामुळे प्रवासाला ब्रेक बसतो. मात्र, आता ही समस्या लवकरच इतिहास जमा होणार आहे. सरकारने यावर आता रामबाण उपाय शोधला आहे. सरकार अशी सिस्टिम आणत आहे, ज्यामुळे तुम्हाला टोल प्लाजावर जाताना गाडीचा स्पीड कमी करण्याची गरज भासणार नाही. केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी या बाबतची घोषणा केली आहे. येत्या काळात फास्टटॅगसहीत ऑटोमॅटिक नंबर प्लेट रिकक्गनेशन (ANPR) तंत्राचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात येणार आहे, असं नितीन गडकरी यांनी स्पष्ट केलं आहे.
ग्लोबल फिनटेक फेस्ट 2026 मध्ये नितीन गडकरी यांनी ही घोषणा केली आहे. सरकार नॅशनल हायवेवरील सर्व टोल बूथला बॅरियर फ्री बनवण्याच्या योजनेवर वेगाने काम करत आहे. या वर्षी डिसेंबरच्या अखेरीपर्यंत 70 टक्क्याहून अधिक टोल बूथ बॅरियर फ्रि होणार आहेत. मार्च 2027 पर्यंत हे टार्गेट ठेवलं असून 100 टक्क्यांपर्यंत काम पूर्ण केलं जाणार आहे, अशी माहिती नितीन गडकरी यांनी दिली. सध्या देशात 13 कोटीहून अधिक फास्टटॅग जारी करण्यात आले आहेत. नॅशनल हायवेवर 98 टक्के फास्टटॅगचा वापर होतो.
वाहन न थांबवता…
सर्वात मोठा प्रश्न म्हणजे बॅरियर शिवाय टोल कसा पार केला जाईल? त्याचं थेट उत्तर म्हणजे मल्टी लेन फ्री फ्लो (MLFF) टोलिंग सिस्टिम. ही महत्त्वाची टेक्निक यावर्षीच 11 मे 2026 रोजी मुंबईच्या एका टोल प्लाजावर टेस्ट करण्यात आली आहे. या नव्या सिस्टिममध्ये टोल प्लाजावर जुन्या पद्धतीने बॅरिअर राहणार नाही. तुमची गाडी टोल झोनवरून गेल्यावर तिथे लावण्यात आलेले खास हायटेक कॅमेरे तुमच्या गाडीची नंबर प्लेट स्कॅन करेल. त्यानंतर थेट तुमच्या लिंक्ड अकाऊंटमधून पैसे कापले जातील. परिणामी टोल प्लाजावरील भयंकर वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे.
जनतेचा थेट फायदा काय?
या नव्या सिस्टिममुळे सर्वाधिक फायदा सामान्य नागरिकांना होणार आहे. गडकरी यांच्या मते, पूर्वी टोल प्लाजावर एक गाडी सरासरी 12 मिनिटापर्यंत थांबायची. नवीन सिस्टिम लागू झाल्यानंतर आता शून्य वेळ लागणार आहे. त्यामुळे नागरिकांचा वेळ वाचणार आहे. वाहनांचं इंधनही वाचणार आहे. एका स्टडीचा संदर्भ देऊन गडकरी यांनी हा मुद्दा अधिक स्पष्ट केला. टोलवर गाड्याच थांबल्या नाही तर दर वर्षी सुमारे 5,250 कोटी रुपयांच्या इंधनाची बचत होणार आहे. म्हणजे जनतेचा मोठा पैसा वाचणार आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
तिजोरी भरणार
या नव्या तंत्रज्ञानाचा सामान्य नागरिकांप्रमाणेच सरकारलाही मोठा फायदा होणार आहे. फास्टटॅगचा वापर वाढल्याने टोल कलेक्शनमध्ये आधीच 10 टक्क्याने वाढ झाली आहे. त्यामुळे सरकारला 7,000 कोटी रुपयांचा अतिरिक्त महसूल मिळाला आहे. एकूण टोल रेव्हेन्यू आता 82,000 कोटीवर गेला आहे. ही संपूर्ण सिस्टिम लाईव्ह होणार आहे. त्यामुळे सरकारला दर वर्षी 20,000 ते 25,000 कोटी रुपये थेट फायदा होणार आहे. टोल बूथ चालवण्याचा खर्चही 12 टक्के कमी होऊन तो केवळ 2-3 टक्क्यांवर येणार आहे, अशी माहिती गडकरी यांनी दिली आहे.