कोविड वॅक्सिनमुळे अचानक येतोय हार्ट अटॅक? AIIMS-ICMR च्या रिपोर्टमध्ये मोठा खुलासा

कोरोना प्रतिबंधक लस घेतल्यानंतर अचानक हार्ट अटॅकच्या प्रमाणात वाढ झाल्याचा दावा अनेकदा केला जात होता. त्यावर आता ICMR आणि AIIMS च्या रिपोर्टमधून मोठा खुलासा झाला आहे. कोविड लस आणि हार्ट अटॅकचे केसेस यात काहीच संबंध नसल्याचं त्यांनी म्हटलंय.

कोविड वॅक्सिनमुळे अचानक येतोय हार्ट अटॅक? AIIMS-ICMR च्या रिपोर्टमध्ये मोठा खुलासा
Covid Vaccine and heart attack
Image Credit source: Instagram
| Updated on: Jul 02, 2025 | 11:03 AM

कोविड-19 प्रतिबंधक लस आणि हृदयविकाराच्या झटक्यांमुळे अचानक होणाऱ्या मृत्यूंमध्ये कोणताही संबंध आढळला नसल्याचं आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने बुधवारी स्पष्ट केलं. इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) आणि ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (AIIMS) यांनी याबद्दल विस्तृत अभ्यास केला. कोरोनानंतर प्रौढांमध्ये अचानक होणाऱ्या मृत्यूंबद्दल त्यांनी हा अभ्यास केला असून त्याच्याच अहवालावरून मंत्रालयाने हा दावा केला आहे. कोरोना प्रतिबंधक लस घेतल्यानंतर हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू होण्याच्या प्रमाणात वाढ झाल्याचा दावा सतत केला जात होता. तरुण वयातही अचानक येणाऱ्या हृदयविकाराच्या झटक्यासाठी कोरोना प्रतिबंधक लस जबाबदार असल्याचे अंदाज वर्तवले जात होते. पण या दोघांमध्ये काहीच संबंध नसल्याचं या अभ्यासातून स्पष्ट झालं आहे.

“कोविडनंतर प्रौढांमध्ये अचानक होणाऱ्या मृत्यूंबद्दल ICMR आणि AIIMS यांनी विस्तृत अभ्यास केला. त्यातून कोविड प्रतिबंधक लस आणि अचानक होणाऱ्या मृत्यूंमध्ये कोणताही संबंध नसल्याचं स्पष्ट झालं आहे. ICMR आणि नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोल (NCDC) यांनी केलेल्या अभ्यासातून असं दिसून आलं आहे की भारतात कोविड-19 प्रतिबंधक लसी सुरक्षित आणि प्रभावी आहेत. त्यांचे गंभीर दुष्परिणाम अत्यंत दुर्मिळ आहेत”, असं मंत्रालयाने एका निवेदनात म्हटलं आहे.

मे ते ऑगस्ट 2023 दरम्यान देशातील 19 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील 47 रुग्णालयांमध्ये हा अभ्यास करण्यात आला आहे. हा अभ्यास अशा लोकांवर करण्यात आला, जे आधी पूर्णपणे निरोगी होते. परंतु ऑक्टोबर 2021 ते मार्च 2023 दरम्यान अचानक त्यांचा मृत्यू झाला. परंतु कोरोना प्रतिबंधक लसीमुळे तरुणांमध्ये हृदयविकाराचा धोका वाढलेला नाही, असं अभ्यासात दिसून आलं. तरुणांच्या अचानक मृत्यूचा आणि या लसीचा कोणताही संबंध नाही, हे या अभ्यासातून स्पष्ट झालं.

या निवेदनात त्यांनी असंही स्पष्ट केलंय की आनुवंशिकता, जीवनशैली, आधीपासून असलेल्या आरोग्याच्या समस्या आणि कोविडची लागण झाल्यानंतर निर्माण झालेली गुंतागुंत यांसह विविध घटकांमुळे अचानक हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू होऊ शकतो. “विविध कारणांमुळे अचानक हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. यामध्ये जेनेटिक्स, जीवनशैली, आरोग्याच्या आधीपासूनच्या समस्या आणि कोविड नंतरचे कॉम्प्लिकेशन्स यांचा समावेश आहे. कोविड प्रतिबंधक लसीकरण आणि हृदयविकाराच्या झटक्यांमुळे होणारे अचानक मृत्यू यांचा एकमेकांशी थेट संबंध जोडणं चुकीचं असल्याचं वैज्ञानिक तज्ज्ञांनी म्हटलंय. अशी विधाने खोटी आणि दिशाभूल करणारी आहेत”, असं या निवेदनात म्हटलंय.

नुकतंच अभिनेत्री शेफाली जरीवालाचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. वयाच्या 42 वर्षी तिने अखेरचा श्वास घेतला. त्याआधी अभिनेता श्रेयस तळपदे, सुष्मिता सेन यांसारख्या अत्यंत फिट आणि स्वत:च्या आरोग्याची, फिटनेसची नियमित काळजी घेणाऱ्या कलाकारांनाही हृदयविकाराचा झटका येऊन गेला होता. सुदैवाने वेळीच उपचार मिळाल्याने त्यांचे प्राण वाचू शकले आहेत. अशा केसेसनंतर कोविड प्रतिबंधक लस आणि कमी वयातच हृदयविकाराचा झटका येण्याचं प्रमाण वाढल्याचा निष्कर्ष अनेकांनी काढला.